
श्रीनिवास कामत
राजकारण्यांना घोषणा करायला खूप आवडते. केलेली घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती यांची तुलना करता बरीच तफावत जाणवते. याच पार्श्वभूमीवर १००% साक्षरतेच्या घोषणेस पडताळून पाहणे आवश्यक आहे.
यापूर्वी आम्ही गोवा १००% हगणदारीमुक्त झाल्याची व त्यानंतर सर्व घरांसाठी १००% नळजोडणी झाल्याची घोषणाही झाली. ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडणार्यांना रामप्रहरी बाटल्या घेऊन झुडपांनी जाणारे स्थलांतरित, परप्रांतीय दररोज दिसतात. नळ शंभर टक्के घरांमध्ये असणे आणि त्या नळांना पाणी येणे यात फरक आहे.
अनेक गावांमधून अगदी दमयंतीनेही केली नसेल एवढी नळाची प्रतीक्षा ग्रामीण भागांतील लोक करतात. गेले सहा दिवस बार्देश पाण्यावाचून झुरतोय. काही वर्षांपूर्वी अहोरात्र पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हे कोणालाच माहीत नाही. १०० टक्के नळ म्हणजे १०० टक्के पाणी, असे निकष लावल्यास एकवेळ १००% साक्षरता कागदोपत्री दाखवणे शक्य आहे. प्रत्यक्षात विद्यालयातून विद्या लयास गेलेलीच आढळायची!
जे पाण्याचे, हगणदारीमुक्त होण्याचे व शिक्षणाचे तेच पणजी ‘स्मार्ट’ होण्याचेही झाले आहे. पणजीचे काम तर कागदावर दाखवता येण्याजोगेही झाले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पुरातत्त्व स्थळांची नासधूस झाली आहे आणि शहर आपत्तीग्रस्त दिसू लागले आहे.
दीर्घ काळापासून शहरात वास्तव्य असलेल्या लुईस डायस यांनी अलीकडेच पेपरमध्ये आपली व्यथा मांडली आहे. ‘माझे शहर किती हिरवे आणि सुंदर होते! शहराच्या सद्गुणांची स्तुती, गुणगान करण्यासाठी भूतकाळातच जावे लागते’. या शहराची वर्तमान स्थिती एवढी वाईट आहे की, फुटपाथवरून चालणेही नकोसे झाले आहे. पणजी कशी आहे, हे पाहिल्यावर कशी असेल, असा प्रश्नच कुणाला पडत नाही.
असे प्रश्न पडू नयेत याची उत्तम सोय सरकारने करून ठेवली आहे, तीही एकामागोमाग सण, उत्सव, महोत्सव साजरे करून! दरदिवशी एवढे उत्सवी वातावरण असते की, शहराची दुरवस्था कुणाला जाणवतही नाही. वाइन, फिश - एक्वा, विशेष लोकांसाठी, संगीत, खाद्यपदार्थ, लोकोत्सव इत्यादींचे एवढी रेलचेल की, काही विचारू नका! उत्सवात एवढे रममाण व्हा की समस्यांचे स्मरण चुकूनही होणार नाही, हे सरकारी धोरण आहे.
गोव्यात पर्यावरण, कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारी या प्रमुख समस्या आहेत ज्यामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. एका गुन्हेगाराला पोलीस तुरुंगातून बाहेर काढण्यास मदत करतात आणि त्याच्या वाहनाने हुबळीला नेऊन पोहोचवतात.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतात. रस्त्यांवर अपघात होऊन इतके लोक मरतात की, त्याची दखल नितीन गडकरी यांनाही घ्यावीशी वाटते. दक्षिण गोव्यातील खाजगी मालमत्तेतून रेल्वे मार्ग बांधले जात आहेत ज्यामुळे सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत होत आहे. याशिवाय नोकरभरती घोटाळा, पर्यटकांसोबत मारामार्या, शॅक्समध्ये हत्या, रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी नाइटक्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, ड्रग्ज, वेश्याव्यवसाय आहेतच. या सगळ्याची यादी लांबतच जाईल. पण, दुर्दैवाने त्याचे कुणालाही काहीही पडलेले नाही. उत्सवी मग्न राजा आणि प्रजा!
नुकताच गोवा मुक्ती दिन आणि जनमत कौल दिन साजरा झाला. समाजातील दिग्गजांनी तेच सांगितले जे त्यांनी गेल्या वर्षी आणि प्रत्येक मागील वर्षी आधी सांगितले होते. या सगळ्या दिग्गज विचारवंतांना जेव्हा समस्यांबद्दल कुणी विचारलेच तर ते त्यांची अगतिकता व्यक्त करून मोकळे होतात आणि पुढच्या भाषणाच्या तयारीस लागतात. सामान्य लोकांचे एकवेळ ठीक आहे, पण ज्यांनी दिशा दाखवायची तेच दिशाहीन झालेले पाहिले की वाईट वाटते. राजकारण्यांना विचारवंत फक्त भाषणे ठोकण्यापुरते हवे असतात. विचारवंतांचे मार्गदर्शन, चळवळ अजिबात नको. गोमंतकीय विरोध करणेच विसरला आहे.
सुरेश भट विचारतात,
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी
असा कसा जो ते येथे होतसे खरेदी?
पण, या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. अपार दु:खांची चाललेली ही दलाली बंद करावी लागेल. ही काळरात्र संपवायला पुन्हा एकदा आयुष्यांच्या मशाली पेटवाव्याच लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.