अग्रलेख: थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली; ही आग खूप दूरवर लागेल...

Goa Nightclub Fire: थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली आहेत. सरकारी पैसे वाटून त्याची भरपाई होणार नाही.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली आहेत. सरकारी पैसे वाटून त्याची भरपाई होणार नाही. सगळ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. ही आग खूप दूरवर लागेल; ठिणगी हडफड्यात पडली आहे.

शंभर दुश्मन परवडले पण कपटी, वरवर आपलेपणा दाखवणारे, मतांसाठी हपापलेले लोकप्रतिनिधी आणि वरदहस्त असलेली व्यवस्था नको रे बाबा!

कसं भावनाहीन होऊन जगता येतं या लोकांना? या लोकप्रतिनिधींचे, व्यवस्थेचे कुठलं रूप, दृष्टिकोन की अवगुण स्वीकारायचे? हजार चांगल्या गोष्टींचा आज अंत झाला. सरकारी नोकरी ‘कॅश फॉर जॉब’ म्हणत विकत घ्यायची. ‘सरकारी नोकर म्हणजे सरकारचा सर्वश्रेष्ठ आधार’ व्हायचे सोडून लोकप्रतिनिधींची कुबडी व्हायचे. ओरबाडा ह्यांचे खरे मुखवटे, खोटे चेहरे स्पष्ट होऊ देत!

Goa Nightclub Fire
Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

पंचवीस जणांचे हे गुन्हेगार आहेत. कोण गेलं होतं ह्यांच्या अंत्ययात्रेला की खांदा घ्यायला? ते पुण्य होतं, की प्रायश्‍चित्त? त्यात अनपेक्षित विचार आला तो ५ लाख देण्याचा. दुखावलेलं मन, रिकामा खिसा, त्यात त्यांची ठरवली गेलेली किंमत हा मृतांचा अपमान.

भट्टीत भाजलेले ते जिवांचे मोल ठरवणारा हा आकडा कुठून आला? जी संपत्ती भोगवादातून जमा केलीत त्यापेक्षा तुम्हा सर्वांची विचारांची दारिद्र्यरेषा जरा जास्त होती. किळस आली. आत्तापर्यंत बक्कळ पैसा केला, असे गावचा सरपंच बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो. तो अढळ आहे, अडखळत नाही. दाद देते त्याच्या हिमतीची.

आरोप आहे तर सिद्ध करा. पण ते होत नाही. कारण लिखित आहे. जे पचवलेत त्यातील काही कर्माची फळे म्हणून द्या. ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडून वसूल करून मृतांच्या कुटुंबीयांना द्या. आमच्या कराच्या पैशातून जमा झालेल्या सरकारी खजिन्यावर डल्ला का? कोण जाणे ते मृत व्यक्तीच्या कुटुंबांपर्यंत पोहोचतील की नाही. विश्वासघात एकदा झाला आता जादूगार होऊ नका.

हा ‘रोमिओ लेन’ ज्याच्या नावात सुगंध आहे आणि आडनावात मासाचा तुकडा आहे त्याने व्यवस्थेपुढे कितीतरी तुकडे टाकले, व्यवस्थापन सांभाळले. २२ शहरे आणि ४ परदेशात आस्थापने असलेला हा अवलिया म्हणे गोल्ड मेडल इंजिनिअर. कुठल्या युनिव्हर्सिटीमधून पास झाला ज्याला आपली बुद्धी नाही की बांधकाम आणि परवाने घेण्याचं भान नाही. ह्यांना पुरस्कार देतात. अर्थात तो व्यवस्थापन करण्यात कमी पडला नाही. संत्री, मंत्री वाजंत्री ह्यांचा आदर करून इतर चार आस्थापने लावून घेतली. पापाचा हिस्सेदार सर्वांना केले. त्याने अनेक जाळी विणली . इतक्या पैशांचा तो भागीदार आहे. मग सरकार त्याला भागीदार पैसे देऊन का करते? की परतफेड करते?

संस्कारी सरकार वेदनाहीन नाही. दुःख आणि जबाबदारी त्याचा ताळमेळ ठेवा. काढा खिरापत बाहेर. सरकारी चुका असतील म्हणून स्वीकार हा न्याय नाही. सगळे टॅक्स भरतात. त्या कुटुंबीयांसाठी सहानुभूती सरकारपेक्षा अनेक पटींनी सामान्य जनतेला असेल; पण ते सरकार चालवत नाहीत ही खेदजनक बाब आहे. आज गोंयकार आगीच्या बॉम्बवर बसला आहे. २५ खून करून शांत बसू असे वाटत असेल तर ही घोडचूक. ‘कॅश फॉर जॉब’ विझला नाही.

सगळे पचून जाईल असे होत नाही. खून, बलात्कार, लईराईची चेंगराचेंगरी, बाणस्तारी अपघात, खून सर्व कुठल्यातरी कमिटीत गायब केली गेली. किती शाप जमा कराल? आज २५ की त्यावर माहीत नाही, घरात अन्न शिजले नाही. ही आग उद्या आपल्या घरात लागू शकते. तेव्हा सहन करायची तयारी ठेवा! मालक आणि कामगार दोघेही ‘भायले’. पण पोटभरू गोवेकर म्हणून सर्वांनी हिणवले. संयम संपला की हार पत्करली? पैसा महान ठरला.

Goa Nightclub Fire
Goa Politics: मये मतदारसंघात कार्यकर्त्यांना धमक्या, 'गोवा फॉरवर्ड'चा आरोप; सत्ताधारी भाजपवर साधले शरसंधान

शेवटी, थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली आहेत. सरकारी पैसे वाटून त्याची भरपाई होणार नाही. सगळ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. ही आग खूप दूरवर लागेल; ठिणगी हडफड्यात पडली आहे!

- नीना नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com