Konsachem Fest: 1510 साली पोर्तुगीज बिठ्ठोणमध्ये अडकले, ताळगावच्या मच्छीमारांनी त्यांना धान्य पुरवले; गोव्यातील नवान्न पूजनाची परंपरा

Navyache Fest Goa: ‘नवे’ विधियुक्त पुजण्याची तसेच नवान्न अर्पण करण्याचा विधी आणि ‘कणसाचे फेस्त’ आम्हांला इथल्या धर्मसंस्कृतीची निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची कृतज्ञता अभिव्यक्त करत असते.
Goa navyache konsachem fest
Goa navyache konsachem festDainik Gomantak
Published on
Updated on

अ न्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. दऱ्याखोऱ्यांत पोटाची भूक भागवण्यासाठी आदिमानव जंगली श्वापदांची शिकार करून त्यांचे कच्चे मांस भक्षण करून किंवा झाडांची पिकलेली फळे खाऊन आपली भूक भागवायचा. परंतु शेतीचा शोध लागला तेव्हा त्याच्याकडून अन्नाची पैदास होऊन, कालांतराने त्याला अन्न संचय करणे शक्य झाले.

त्यामुळे त्याच्या आदिम जीवनात धर्माचा उद्गम झाला. वनस्पतीला अन्नाच्या दाण्यांनी युक्त कणसे येणे हे त्याला अचंबित करून टाकणारी निसर्गातली चमत्कृती ठरली होती. त्यासाठी कणसातले धान्याचे दाणे आपण दैनंदिन जीवनात वापरण्यापूर्वी ते दैवी शक्तीला तिची कृपादृष्टी लाभावी म्हणून अर्पण करण्याची परंपरा निर्माण झाली. त्यातून कृषिप्रधान भारतीय संस्कृतीत नवान्न प्रथम आपल्या आराध्य दैवताला अर्पण केले जाऊ लागले.

गोव्याची भूमी कृषिप्रधान असल्याकारणाने कुमेरीत नाचणी, वरी, पाखड, उडीद, कुळीथ, राळो करणाऱ्या कष्टकऱ्याने कालांतराने इथे भाताच्या लागवडीला प्राधान्य दिले. त्याच्या दैनंदिन जेवणातील त्यामुळे ‘शीत’ हा महत्त्वाचा घटक ठरला.

गोव्यात नवान्नास भक्तिभावाने देवतेला अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. विविध जाती जमातींत आणि भागांत नवान्नाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी विधींचे आयोजन केले जाते. नवान्नभक्षण समारंभपूर्वक मार्गशीर्ष महिन्यात सूर्याने वृश्चिक राशीच्या चौदाव्या अंशात प्रवेश करण्यापूर्वी केले जाते.

ब्रह्मा, सर्परूपी अनंत व दिक्पाल यांचे पूजन केले जाते. धान्याला जीवपोषक आणि ऊर्जादायक असल्याने धनाच्या बरोबरीने त्याला भारतीय धर्मात स्थान दिलेले आहे. त्यासाठी धान्यदान, धान्यधेनूसारख्या परंपरा पाळल्या जातात. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी तृणधान्ये, उडीद, तूर, मूग यासारखी द्विदल धान्ये भारतीय लोकधर्माने महत्त्वपूर्ण मानलेली आहेत.

गोव्यातील आदिवासी वेळिपात भाताची कापणी झाल्यावर तेथील शेतजागेतल्या अदृश्य शक्तीला नव्या धान्याचे जेवण अर्पण केले जाते. त्याला ‘भारो’ म्हटले जाते. कुमेरीत मिरची, फळभाज्या, फुले तयार झाल्यावर तेथील शक्तीला आणि कुलदेवाला नवान्न अर्पण केले जाते त्याला ‘उष्टण’ म्हणतात.

गोव्यात श्रावण पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा या कालखंडात भाताच्या लोंब्या काढून पाटावर ठेवून पूजा करतात त्याचप्रमाणे आंब्याची पाने आणि बांबूच्या कामट्यात नवीन कणसे ठेवून घराच्या प्रवेशद्वारावर लावली जातात. बऱ्याच ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पंचमीस नवीन कणसे दारावर लावतात, तर काही ठिकाणी भाताच्या कणसाला विणकाम करून तयार झेले माटोळीत लावतात .

कोकणात शरदातली पहिली पौर्णिमा म्हणजे कोजागिरी ‘नवान्न पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. भात हे प्रमुख पीक कोकणात चतुर्थीनंतर कापतात आणि भात उखळात सडून नवान्न पौर्णिमेला देवाला गूळ, नवान्न आणि खोबरे एकत्रित करून तयार गोड पदार्थ अर्पण करतात. विजयादशमीला काही ठिकाणी घराच्या प्रवेशद्वारावर भाताची लोंबी आंब्याची पाने कुरडू आणि झेंडूची फुले एकत्रित करून बांधतात.

सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे कृषिप्रधान महाल जिंकून घेतल्याने नवख्रिस्त्यांना नवान्न पूजनाच्या परंपरेपासून दूर करणे चर्चला शक्य झाले नाही.

१५१०साली तिसवाडी जिंकल्यावर पोर्तुगीज सैन्य आफोंस द अलबुकर्कसह आग्वादला वाळूचा पट्टा निर्माण झाल्याने बिठ्ठोण येथे जेव्हा अडकून पडले होते तेव्हा ताळगावच्या मच्छीमारांनी आदिलशाही सैन्यांची नजर चुकवून त्यांना धान्याची रसद पुरवली होती.

त्याविषयीची कृतज्ञता म्हणून तिसवाडी तालुक्यातल्या ताळगावच्या गावकारांना ‘कणसाचे फेस्त’ साजरे करण्याची परवानगी देण्यात आली. ही कणसे समारंभपूर्वक सेंट मायकलची उत्सव मूर्ती खांद्यावर घेऊन शेतातून कणसे कापून आणतात.

ही कणसे जुने गोवे येथील से कॅथेड्रलच्या पवित्र वेदीवरती अर्पण करण्याचा मान १६ सप्टेंबर १५२६च्या सरकारी आदेशाने त्यांना लाभला होता. फेस्ताचा अध्यक्ष ताळगावच्या नऊ गावकऱ्यांना पोहे भेट देतो. हे पोहे पॅरिश प्रिस्टला देतात. भाताची कणसे आर्च बिशप आणि राज्यपालांना भेट देण्याची परंपरा आहे.

दक्षिण गोव्यातला राय हा कृषिप्रधान गाव ख्रिस्ती झाल्यावर १६९९साली तेथे अवर लेडी ऑफ स्नोजची चर्च बांधली. त्या गावाला राज्यातले सर्वप्रथम ‘कणसाचे फेस्त’ साजरे करण्याचा मान लाभला. त्यामुळे ५ ऑगस्टला होणाऱ्या फेस्ताचे आशीर्वचन झाल्यावर पाद्री अवरलेडी ऑफ स्नोज सायबिणीच्या शेतजमिनीतील भाताची कणसे कापतात.

Goa navyache konsachem fest
Konsachem Feast - तालीगाव येथे 'कणसाचे फेस्त' मोठ्या उत्साहात साजरा | Gomantak TV

त्यानंतर या नवान्नापासून गूळ खोबरे आणि तांदूळ एकत्रित करून तयार केलेल्या गोडशाचा आस्वाद घेतला जायचा. गोव्यातल्या बऱ्याच भाताची मुबलक पैदास केल्या जाणाऱ्या गावांत ‘कणसाच्या फेस्ता’ची एकेकाळी परंपरा इथल्या समृद्ध कृषी परंपरेचा वारसा सांगत होती.

कालापूर, अस्नोडा, कळंगुट आदी गावे कृषिप्रधान होती इथले शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची पैदास करायचे. पावसात खाजन आणि हिवाळ्यात वायंगण शेती केली जायची. खोचरी, दामगो, शिट्टो, कोरगुट, आसगो, बेळो आदी भाताच्या प्रजाती कष्टकऱ्यांना पौष्टिक सुग्रास अन्न द्यायच्या. आपणाला जे अन्न लाभलेले आहे त्यामागे परमेश्वरी वरदहस्त लाभलेला आहे अशी श्रद्धा त्यांच्यात रूढ होती .

Goa navyache konsachem fest
Purumentachem Fest: शिरवळ्या ते खारे नुस्ते, कपियाळी ते गावठी घोटां; गोव्यातील पावसापूर्वीचा सांस्कृतिक ठेवा

त्यामुळे ग्रामदेवी सांतेर -भूमिका याबरोबर रवळनाथ ही दैवते आणि त्यांची कृपा भूमी ‘सुजलाम् आणि सुफलाम्’ करण्यास कारणीभूत असल्याची त्यांची भावना होती आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर समस्त आराध्य देवतांना नवान्न अर्पण करण्याची लोकपरंपरा रूढ होती. कृषीच्या शोधामुळे मानवी जीवनात शांती आणि स्थैर्य आले. त्याच्या जगण्यात धर्म आणि संस्कृतीचे आगमन झाले आणि त्यासाठी कष्टाद्वारे शेतात पैदास झालेली पहिली कणसे, नवान्न दैवी शक्तीला अर्पण केली जाऊ लागली.

गोव्यातील ‘नवे’ विधियुक्त पुजण्याची तसेच नवान्न अर्पण करण्याचा विधी आणि ख्रिस्ती लोकांत प्रचलित ‘कणसाचे फेस्त’ आम्हांला इथल्या धर्मसंस्कृतीची निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची कृतज्ञता अभिव्यक्त करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com