

भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. निसर्गाच्या लहरींशी जुळवून घेत त्यात घडणारे बदल मानवी समाजाला आकर्षित करत आलेले आहेत. भूमीशी एकरूप असलेल्या विविध घटकांनाच नव्हे तर त्यापासून दूर असलेल्या पर्जन्यवृष्टीबरोबर कित्येक मैल अंतरावर तरंगत असलेल्या सूर्य, चंद्र व तारकांनासुद्धा मानवाने सण उत्सवांमध्ये सहभागी केले.
जंगली वृक्षवेलींनी समृद्ध असलेली जंगले निसर्गातील सजीवमात्रांसाठी नैसर्गिक अधिवास असतो. कोणत्या वनस्पतीवर खाण्यायोग्य पाने, फुले, कंदमुळे कधी उपलब्ध असतील याचे ज्ञान काही तृणहारी प्राण्यांबरोबर पक्षी, फुलपाखरे व कृमी कीटक यांना असते.
आपण निसर्गाचाच एक घटक आहोत हे ओळखून आपल्याबरोबर जीवन व्यतीत करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पशुपक्ष्यांच्या विविध हालचाली, आवाज व खाण्याच्या आवडी व सवयी याकडे त्यांचे बारीक लक्ष होते.
ऋतूनुसार होणारा बदल त्यांना फळे, फुले व पानांनी भरभरून नटलेल्या वृक्षांकडे जाण्यास प्रेरित करतात. या सर्व गोष्टींचे अनुकरण करत आपल्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळे प्रयोग करून कोणती झाडे औषधी गुणधर्माने युक्त आहेत व कोणती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात याचे उत्तर त्यांनी शोधले.
गोव्यातील निसर्गाच्या सांनिध्यात असलेल्या काही गावांमधील लोकमानसामध्ये आजही जंगलातून मोठमोठ्या झाडांकडे बघत, मैलभर चालत विविध झाडाझुडपामधून औषधी गुणधर्म प्राप्त करण्याची ओढ दिसून येते. ऋतूनुसार येणाऱ्या विविध सण-उत्सवांद्वारे गोव्यातील कष्टकरी समाजात निसर्गातील एका एका घटकाचा कशाप्रकारे वैविध्यपूर्ण उपयोग होऊ शकतो याचे मनोज्ञ दर्शन घडते.
गोव्यातील जंगलात आढळणाऱ्या वृक्षाच्या प्रजातींबरोबर पशू पक्ष्यांच्या नावावरून विविध ठिकाणांना स्थलनाम व ग्रामनाम प्राप्त झाले. सत्तरीतील पर्ये येथील चिंचमळ व तुळशीमळ, धारबांदोड्यातील मोले येथील खैरीमळ, सांगे येथील पणसायमळ, केपे येथील अंबावली, डिचोली येथील म्हावळिंगे, पेडणे येथील कोरगाव यांसारखी नावे वृक्षांवरून आलेली आहेत.
आदी रचला आकार,
मगे रचली गायत्री,
मगे रचली धरतरी,
गायत्री शेणान धरतरी.
पावसाचे एकंदर चार महिने सुरू असलेली रिमझिम थांबते तेव्हा साजऱ्या होणाऱ्या विविध उत्सवांप्रसंगी या सोकारात गीताची प्रचिती येते.
दसऱ्यापासून सुरू होऊन नरक चतुर्दशी, गोरवा पाडवा, धेणलो, धिल्लो ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत साजऱ्या होणाऱ्या विविध उत्सवांत गाईबरोबर तिच्या शेणाला विशेष महत्त्व लाभलेले दृष्टीस पडते. गोमंतकातील तुळशीवृंदावनाची रचना मातीपासून करण्याची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. पाऊस ओसरू लागल्यावर नदीतील पाण्याच्या स्तर हळूहळू कमी होतो तेव्हा त्याच्या कडेला आढळणारी पिवळ्या रंगाची माती काढून त्याचा लेप तुळशीवर काढल्याने ती जणू सोनेरी रंगाने खुलून उठते.
शेतमळ्याच्या वाटेने जात असताना कित्येकदा आढळणाऱ्या शेणाकडे बघून आपल्याला त्याचा रंग काळा असल्याचा दृष्टीस पडतो. परंतु तुलसीविवाहाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मृण्मय तुळशीवृंदावनाला शेणाचा लेप लावला जातो तेव्हा मात्र त्याच्यात हिरव्या रंगाशी जवळीक असलेला रंग दृष्टीस पडतो. त्यामुळे तुळशीवर लावलेला लेप म्हणजेच तिने हिरव्यागार रंगाची साडी परिधान केलेली असल्याचे सांगितले जाते.
गोरवा - पाडव्याला शेणाचे पोळे करून सुकविण्यासाठी ठेवल्यावर काही दिवसांनी ते चुलीत आग करण्यासाठी उपयुक्त पडतात. धिल्लो उत्सवात शेणाचा गोळा करून तुळशीसमोर ठेवून त्याला झेंडूच्या फुलांनी सजवले जाते. केप्यातील काजुर येथे तर वारुळाची माती आणून, दगड बाजूला करून पाण्यात भिजवून त्यात शेण एकत्र केले जाते.
पावसाळ्यानंतर येणारा कालखंड हा आल्हाददायक असला तरी दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश प्रखर असतो. अगदी याच क्षणाचा फायदा घेत गावातील लोक या वेळेत आढळणाऱ्या औषधी घटकांना गोळा करून त्यांना वाळवण्यासाठी अंगणात ठेवतात. त्याचबरोबर काकडीसारख्या फळांच्या बियादेखील वाळवायला ठेवलेल्या पाहायला मिळतात.
पाऊस ओसरल्यावर कित्येक भाज्यांचा आस्वाद आपण मुळीच घेऊ शकत नाही; परंतु कुरडू नामक भाजीला या कालखंडात गुलाबी पांढरी फुले येतात. या फुलांमध्ये विशेष औषधी गुण असल्यामुळे ती गोळा करून एकत्र वाळवायला टाकलेली पाहायला मिळतात. सकाळच्या वेळी या फुलांना पाण्यात घालून ते प्याल्याने अनेक आजार दूर होऊ शकतात.
सत्तरीतील वांते येथे साजऱ्या होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेतील दीपोत्सवात शेणाचा उपयोग चिकटपट्टी म्हणून केला जातो. हा उत्सव पूर्णपणे तळ्याच्या शीतल पाण्यात साजरा होतो. कारण येथे असलेली गणपतीची प्रतिमा बारमाही वाहणाऱ्या झऱ्याच्या कुशीत मानवनिर्मित गुंफेत कोरलेली आहे. त्यामुळे या जागेला ‘तळ्यातला गणपती’ असे नाव प्राप्त झाले.
पौर्णिमेच्या दिवशी बारमाही तळ्याच्या सभोवताली व पाण्यापासून काही अंतरावर लाकडी खांबाच्या आधारे ठेवलेल्या फळीवर हजारो दिवे पेटवले जातात. प्रत्येक पेटलेला दिवा जेव्हा खाली असलेल्या पाण्यात प्रतिबिंबित होतो तेव्हा त्याचे मनमोहक स्वरूप पाहून येथे जमलेल्या भाविकांमध्ये हर्ष द्विगुणित होतो.
फळीवर ठेवलेले दिवे कधीच आपल्या जागेवरून हालत नाही कारण त्यांना तेथेच घट्ट चिकटवण्यासाठी काही शेण फळीवर ठेवून त्यावरती एक एक दिवा ठेवला जातो. या उत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी आणि महत्त्वाची असलेली दीपमाळ तळ्याच्या मध्यभागी उभारली जाते. ही दीपमाळ पूर्णपणे नैसर्गिक घटकांनी बनवलेली असते.
केळीच्या गभ्याचा एक खांब तळ्यात उभा केला जातो. या खांबाला अगदी खालून ते वरच्या टोकापर्यंत अतिशय कल्पकतेने लहान मोठ्या आकाराच्या सुपारीच्या लाकडाच्या फळ्या लावून त्यावरती दिवे ठेवले जातात. यालाच ‘त्रिपुर’ असे म्हणतात.
गोव्यातील दिवाळी हा सण प्रकाशपर्व असल्याचा आज साक्षात्कार होतो. गोव्यात ठिकठिकाणी अर्ध चंद्रकार रांगोळी काढण्याची परंपरा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे धारबांदोडा येथील उधळशे या गावात सूर्य, अर्ध चंद्र व सात नक्षत्र दर्शवणारी रांगोळी तांदळाच्या पिठापासून घातली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसणाऱ्या या कृत्तिका नक्षत्रांचे दर्शन घेतल्यानंतर काही दिवस विराम घेतलेल्या शेतातील कामाला पुन्हा प्रारंभ होतो.
परस्पर असलेल्या अनुबंध आणि जिज्ञासेमुळे आपल्या दृष्टीत येणाऱ्या कित्येक घटकांबद्दल माणसाला प्रचंड ज्ञान प्राप्त झाले. निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध घटकांतील औषधी गुणधर्माबरोबर भूक शमविण्यासाठी चवदार खाद्यपदार्थ प्राप्त होत असल्याने मानवाने त्याचे जतन करत हे ज्ञान एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचवावेत यावर विचार करून प्रत्यक्षात आणले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.