Goa: 1962 मध्ये 'इंटक'ची स्थापना, वासुदेव गावस यांच्या कष्टांमुळे गोव्यात 'कामगार चळवळी'ला मिळाली नवी उभारी

Vasudev Gawas labour leader: गोव्यात कामगार चळवळ तशी पोर्तुगीज सरकार असतानाच सुरू झाली होती. १९४७च्या दरम्यान शेख हमीद यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील रेल्वेमध्ये कामगार संघटना स्थापन झाली होती.
Vasudev Gawas
Vasudev GawasDainik Gomantak
Published on
Updated on

कल्पना गावस गावकर

गोव्यात कामगार चळवळ तशी पोर्तुगीज सरकार असतानाच सुरू झाली होती. १९४७च्या दरम्यान शेख हमीद यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील रेल्वेमध्ये कामगार संघटना स्थापन झाली होती. ही कामगार संघटना व्ही. व्ही. गिरी यांच्या युनियनशी संलग्न होती, असा उल्लेख गोव्यातील कामगार चळवळीच्या दस्तऐवजात सापडतो. त्यानंतर काही काळ ‘आयटक’ या संघटनेनेही गोव्यात कामगार चळवळ चालवली.

पण गोव्यातील कामगार चळवळीचा खरा विस्तार झाला तो गोवा मुक्तीनंतर १९६२साली, ज्यावेळी ‘इंटक’ या कामगार संघटनेची गोव्यात स्थापना झाली. गोव्यात कामगार संघटना बांधून काढण्यासाठी इंटकच्या केंद्रीय समितीचे कार्यकर्ते असलेले वासुदेव अर्जुन गावस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्याचे ठरविले आणि मुंबईतून त्यांना गोव्यात पाठवून दिले. गावस यांनी गोव्यातील खेड्यापाड्यात जाऊन कामगारांच्या संघटना तयार केल्या. त्यामुळे गोव्यातील कामगार संघटनांचे जर खऱ्या अर्थाने जनक म्हणायचे असेल तर ते वासुदेव गावस यांना म्हणता येईल.

इंटकच्या दस्तऐवजात जो उल्लेख सापडतो त्याप्रमाणे १९६२च्या जानेवारी महिन्यात मुंबई प्रांताचे तत्कालीन कामगार मंत्री एस. शहा यांच्या मलबार हिलवरील बंगल्यात बैठक झाली. त्या बैठकीला एस. आर. वासवाडा, पी. के. सावंत यासारखे काँग्रेस नेते उपस्थित होते.

Vasudev Gawas
Goa Crop Damage: मिरची उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाईचे आश्वासन

याच बैठकीत वासुदेव गावस यांच्यावर गोव्याची जबाबदारी देण्याचे ठरविले. नंतर २५ मे १९६२ रोजी त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. १ जून १९६२पासून त्यांनी गोव्यात इंटकचे कार्य सुरू करावे, असे सांगून त्यांना गोव्यात पाठविण्यात आले. त्यावेळी खाण कामगार, बंदर कामगार, सिनेमा आणि हॉटेल क्षेत्रात काम करणारे कामगार यांच्या संघटना बांधण्याचे काम गावस यांनी हाती घेतले. इंटकचे गोव्याचे हेडक्वॉटर्स त्यावेळी सावर्डे येथे सुरू करण्यात आले होते.

नंतर बांदोडकर सरकारात कामगार मंत्री झालेले अँथनी डिसोझा हे त्यावेळी इंटकचे सक्रिय कार्यकर्ते होते. गोवा मुक्ती चळवळीत असलेले आल्फ्रेड आफोन्सो, नागेश करमली, मुरलीधर राणे आदी नेते इंटकच्या कामात सक्रिय होते. आजच्या कामगार दिनानिमित्त गोव्यातील कामगार चळवळीचा आढावा घेणे म्हणजे एक इतिहासाचे पान उघडण्यासारखे आहे. वासुदेव अर्जुन गावस यांना गोव्याच्या कामगार चळवळीत अग्रगण्य स्थान होते.

कामगारांबद्दल खरीखुरी आस्था असणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते. गोवा मुक्त झाल्यानंतर लगेचच गोव्यात येऊन त्यांनी गोवा इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना केली. १९६२ ते २००० असा प्रदीर्घ काळ ते या युनियनचे सर्वेसर्वा होते. गोव्यातील कामगारांना कामगार युनियनची ओळख करून देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान कुणीही विसरू शकणार नाही.

गोवा स्वतंत्र झाल्याबरोबर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व आस्थापनातील कामगारांना एकत्र करून कामगार संघटना घडविण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. त्या कार्यात ते एवढे गुंतून गेले होते की बऱ्याचवेळा त्यांचे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष व्हायचे. गोव्यातील सर्व खाणीतील कामगार म्हणजे साखळी ते सावर्ड्यापर्यंतचे खाण कामगार, मद्रास रबर फॅक्टरीतील कामगार, मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील कामगार तसेच महाराष्ट्रातील रेडी येथील कामगारांना त्यांनी संघटित करून युनियनची स्थापना केली. जवळजवळ गोव्यातील सगळ्याच आस्थापनात त्यांनी आपले युनियन स्थापन केले आणि कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले.

Vasudev Gawas
Goa Crime: मडगावमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली कर्नाटकात, आरोपीला अटक

ते केपे येथे राहायचे. शेल्डे-केपे येथील सुत गिरणीतही त्यांनी युनियन स्थापन केले. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर कामगार संघटना प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली. गोवा त्यावेळी पोर्तुगिजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला होता. आतासारखी त्यावेळी दळणवळणाची सोय नव्हती. ये-जा करायला गाड्या नव्हत्या. अशा परिस्थितीतही त्यांनी त्यावेळी डोंगर दऱ्यांतून पायी चालत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गोव्यात कामगार चळवळ उभी केली आणि आयुष्यभर कामगारांचे प्रश्न धसास लावण्यास झटले.

महात्मा गांधी यांच्या तत्त्वांवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या गावस यांनी गोव्यातील कामगार चळवळीतही गांधी तत्त्व रुजवले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. एरव्ही कामगार चळवळ म्हणजे, तोडफोड अशी एकंदर परिस्थिती असताना गावस यांचा मात्र गांधी तत्त्वानुसार अगदी शांततेच्या मार्गाने कोणतीही तोडफोड न करता न्याय मिळवून देण्यात हातखंडा होता.

Vasudev Gawas
Goa News: कृष्णा रॉयला ७ दिवसांची पोलिस कोठडी

ते अगदी सत्यवचनी, कनवाळू आणि सत्शील वृत्तीचे होते. त्यांच्या कामगाराबद्दल असलेल्या जिव्हाळ्याचे इथे कितीही सांगितले तरी थोडेच. आजही त्यांच्या कारकिर्दीतील हयात असलेले काही कामगार अजूनही म्हणताना आढळतात की, गावस साहेबांसारखा कामगारांची कळकळ असलेला कामगार नेता होणे नाही! अशा या कामगार नेत्याला आजच्या या कामगार दिनी शतशः विनम्र अभिवादन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com