Goa Opinion: भविष्यात गोव्याची ओळखच गमावली जाईल याची भीती ‘नीज गोंयकारांना’ वाटू लागल्यास, नवल ते काय..

Goa biodiversity conservation: नैसर्गिक संवर्धनामुळे पर्यावरणीय समतोल घडून, हवामान बदलाचा सामना करताना, वृक्षारोपण आणि जंगलांच्या जतनामुळे, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होते.
Goa biodiversity conservation
Goa biodiversity conservationDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

संवर्धन कला निसर्ग, संस्कृती आणि मानवी वारशाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. पर्यावरणीय समतोल राखतानाच ती सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून, विज्ञान-कला-मानवता यांचा सुंदर संगम, उज्ज्वल भविष्यासाठी घडवते. मानवजातीला आणि पृथ्वीला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संवर्धनातून जैवविविधता, जंगले, नद्या, हवामान आणि माती यांचे संरक्षण; तर सांस्कृतिक संवर्धनातून ऐतिहासिक स्थळे, प्राचीन वास्तू, हस्तकला, लोककथा आणि परंपरांचे जतन महत्त्वपूर्ण आहे.

नैसर्गिक संवर्धनामुळे पर्यावरणीय समतोल घडून, हवामान बदलाचा सामना करताना, वृक्षारोपण आणि जंगलांच्या जतनामुळे, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होते. आपली ओळख आणि इतिहास जपण्यासाठी सांस्कृतिक संवर्धनाचा मोलाचा वाटा आहे. गोव्यातील कदंब-मुघल-पोर्तुगीजकालीन वास्तूंच्या संवर्धनातून, भारतातील अजिंठा-एलोरासारख्या प्राचीन गुहा, देवळे, स्तूप, मनोरे, किंवा ताजमहालसारख्या वास्तू, तसेच ग्रीक-इजिप्त-पर्शिया-चीनसारख्या देशातील समृद्ध सांस्कृतिक वारशांच्या संवर्धनाने, भूतकालीन महत्त्वपूर्ण माहितीचे आकलन मानवाच्या पुढील पिढ्यांना शक्य झाले आहे.

विविध तंत्रांचा समावेश असलेली संवर्धन कला, एक सर्जनशील आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक संवर्धनासाठी पुनर्वनीकरण, जलसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण, यासारख्या पद्धतींचा वापर होतो तर सांस्कृतिक संवर्धनासाठी पुरातत्त्व शास्त्रीय पुनर्स्थापना, संग्रहालये, आणि डिजिटल दस्तऐवजीकरण यासारख्या पद्धती वापरल्या जातात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) खात्याद्वारे प्राचीन स्मारकांचे संरक्षण होते, तर युनेस्कोच्या माध्यमातून जागतिक वारसा यादीतील स्थळांचे विशेष संवर्धन होते. ड्रोन, थ्रीडी स्कॅनिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा संवर्धन कलेसाठी प्रभावी आणि अचूक वापर झाला आहे.

जगात युद्धामुळे तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक सांस्कृतिक वारशाला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः हवाई हल्ल्यांमुळे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना नुकसान होण्याची शक्यता आहे. संग्रहालये, ग्रंथालये आणि पुरातत्त्व स्थळांचे संरक्षण धोक्यात आले आहे. यांच्या संवर्धनासाठी आवश्यक संसाधने, निधी आणि लक्ष कमी होणे साहजिक आहे. सांस्कृतिक वारशाचे प्राथमिक रक्षक असलेल्या स्थानिक समुदायांवर, मानसिक आणि आर्थिक दबाव वाढला आहे.

राज्यकर्ते, जनता आणि जाणकार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे गोव्यात वर्तमानकाळात संवर्धन कलेच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत.

डोंगरकापणी, नदी-खाजन क्षेत्रात भराव, शहरीकरण, औद्योगिकीकरण, पाण्यातील कॅसिनो, पाणी-हवा प्रदूषण, विविध खाणी, बेसुमार रेती उपसा, अवैध वृक्षतोड, स्मार्ट सिटी, रसायनांचा अतिवापर, यामुळे जैवविविधता धोक्यात आहे. गोव्यातील पारंपरिक शेती स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

खाऱ्या पाण्याच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खाजन जमिनींचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. खाजन जमिनींच्या बांधांची दुरुस्ती, पाण्याचे व्यवस्थापन आणि स्थानिक पिकांच्या जातींचे संरक्षण यासाठी स्थानिक समुदाय, सरकार आणि शास्त्रज्ञांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.

खरीप हंगामात विविध जातींचे भात, नाचणी, पाखड, उडीद, कुळीथ, वरी, तीळ यांसारखी पिके घेतली जातात. स्थानिक पिकांच्या बिया जतन करणे आणि पावसाळी शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे महत्त्वाचे आहे.

गोव्यात मासेमारी उद्योगाला टिकवण्यासाठी मत्स्य जातींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. ‘मानशी’, खाजन यांचे रक्षण करणे, पारंपरिक मासेमारीला प्रोत्साहन देणे, अवैध मासेमारीवर बंदी, मत्स्य संवर्धन केंद्रे स्थापन करणे आणि स्थानिक मच्छीमारांना प्रशिक्षण देणे यामुळे मत्स्यसंपदा टिकेल. खारफुटी जंगले (मँग्रोव्ह) जपल्यास माशांच्या प्रजनन क्षेत्रांचे संरक्षण होईल.

Goa biodiversity conservation
Olive Ridley: किनाऱ्यावर पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे, गाड्यांमुळे कासवे परत गेली? वागातोरला 'टर्टल नेस्टिंग साईट'ची गरज

गोव्यातील मोरजी आणि गालजीबाग किनारपट्टी, ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे. कासव संवर्धनासाठी सरकार, स्थानिक मच्छीमार, स्वयंसेवक, पर्यटक एकत्र येऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. रात्रीच्या पर्यटनावर नियंत्रण आणि किनाऱ्यावरील प्रदूषण कमी केल्यास कासव संवर्धनास मदत होऊ शकते. तुये गावातील इंडस्ट्रियल इस्टेट आणि होऊ घातलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’मुळे ‘आर्सेनिक’सारख्या रसायनांमुळे शापोरा नदी प्रदूषित होऊन मत्स्यपैदास व जगप्रसिद्ध ऑलिव्ह रिडले कासवांसाठी धोका संभवतो.

समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दुर्लक्ष, शहरीकरण आणि नैसर्गिक क्षय यामुळे पुरातत्त्वीय स्थळांचा विध्वंस होत आहे.

Goa biodiversity conservation
Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

प्राचीन मंदिरे, वसाहतकालीन चर्च आणि शतकानुशतके जुन्या दगडी कोरीवकामांचे अपरिवर्तनीय नुकसान झाले आहे. अनेक स्थळे असुरक्षितता व अतिक्रमण यांना बळी पडताहेत. किनारपट्टीची धूप झाल्यामुळे समुद्राजवळील स्मारकेदेखील धोक्यात आली आहेत. अनियंत्रित पर्यटनामुळे ‘नाजूक’ संरचनांवर दबाव वाढत आहे.

गोव्याचे ऐतिहासिक महत्त्व असूनही, संवर्धनाचे प्रयत्न अनेकदा विकासाच्या हितांपेक्षा मागे पडतात. पुरातत्त्व विभाग तसेच कला आणि संस्कृती खाते यांचे काय चाललेय हे त्यांनाच ठाऊक! अचूक संवर्धन उपाययोजना आणि जनजागृतीशिवाय, भूतकाळाला जोडणारे दुवे कायमचे नष्ट होऊन भविष्यात गोव्याची ओळखच गमावली जाईल याची भीती ‘नीज गोंयकारांना’ वाटू लागल्यास, नवल ते काय!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com