गोमंतकीय मातीतलं 'ख्रिस्तपुराण'! जेव्हा येशूची जन्मकथा ओवीबद्ध मराठीत अवतरली...

जगभरात पसरलेल्या ख्रिस्ती धर्मात येशूला मुक्तिदाता म्हणून महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. २५ डिसेंबरचा दिवस त्याचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
Jesus
JesusDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

जगभरात पसरलेल्या ख्रिस्ती धर्मात येशूला मुक्तिदाता म्हणून महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. २५ डिसेंबरचा दिवस त्याचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोव्यातल्या तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तिन्ही तालुक्यांत पोर्तुगीज सत्ताधीशांबरोबर आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी स्थानिकांचे ख्रिस्तीकरण केले आणि त्यामुळे नव्या धर्माच्या नव्या संकल्पना इथे रुजल्या. त्यानुसार येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा गोव्यात निर्माण झाली.

नव्या धर्मात रुजू झालेल्या लोकांवर पूर्वापार पुराणांचा प्रभाव पडलेला असल्याकारणाने, त्यांना त्यांच्या धार्मिक सोयीखातर पुराणांची निर्मिती करण्याची गरज होती. त्याला अनुसरूनच जेजुईट पंथाची दीक्षा घेऊन, ब्रिटनहून गोव्यात (Goa) ख्रिस्ती धर्म प्रसारार्थ सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांनी गोव्यात तत्कालीन लोकमानसात रूढ असलेल्या मराठी संतांनी रचलेल्या पुराणांतून प्रेरणा घेऊन १६१४साली ‘ख्रिस्तपुराण’ या महाकाव्याची निर्मिती केली. परंतु त्याची छापील आवृत्ती तांत्रिक कारणामुळे रोमन लिपीत १६१६साली रायतूर येथे प्रकाशित करण्यात आली. दहा हजारावर सुरस स्थानिक प्रचलित शब्दांचा भरणा असलेल्या मराठी भाषेत ओवीबद्ध असलेल्या या महाकाव्यात येशूच्या जन्माची कथा मांडण्यात आलेली होती.

वो नमो विस्वभरिता ।

देवा बापा सर्व-समरथा।

परमेस्वरा सत्यवंता ।

स्वर्गे प्रथुविचआ रचणारा ॥

तूं रिधी-सिधीचा दातारु ।

ऋ्रुपानिधी करणाकर

तूं सर्वे सुखाचा साघरुँ ।

आदि अंतू नातोडे ।२॥

अशा प्रकारे सुरू होणाऱ्या या महाकाव्यात ख्रिस्त जन्मोत्सवाचे वर्णन करण्यात आलेले आहे.

ख्रिस्त पुराणाच्या निर्मितीमुळे नवख्रिस्ती धर्मीयांना पारंपरिक पुराणाचा पर्याय फादर स्टिफन्सने उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून येण्यास मदत झाली. ख्रिस्त पुराणाच्या वाचन, मनन, चिंतनाद्वारे त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचला.

गोव्यातल्या जुन्या काबिजादीतल्या धर्मांतरित झालेल्या समाजाला पूर्वाश्रमीच्या धर्मातल्या भजन, कीर्तन, पुराण कथनाचा पर्याय फादर स्टिफन्ससारख्या धर्मगुरूंनी उपलब्ध करून दिला. त्यामुळे इथे प्रचलित असलेली उत्सवप्रियवृत्ती गोव्यात येशु ख्रिस्ताचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याच्या परंपरेत आपसूक रूढ होत गेली.

येशूचा जन्म नक्की कधी झाला, हे माहीत नसल्याने पूर्वीच्या काळी निरनिराळ्या देशांत वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात असे. काही ठिकाणी डिसेंबर, तर काही ठिकाणी जानेवारीत; इतकेच नव्हे तर मे महिन्यापर्यंतही साजरा केला जात असे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या मध्यापर्यंत बऱ्याच देशांनी येशूचा जन्मदिन सहा जानेवारी मानून तो दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा करण्यास प्रारंभ केला होता. परंतु इसवी सनाच्या ३५३मध्ये रोमच्या धर्माध्यक्षाने २५ डिसेंबर हाच येशूचा जन्मदिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला आणि तेव्हापासून हाच दिवस ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा करण्याची पद्धत रूढ झाली.

प्राचीन काळी रोमन आणि इतर लोकांत २५ डिसेंबर सूर्याचा जन्मदिन म्हणून साजरा करत होते. सूर्य जसा प्रकाशदायी तसेच येशूने आपल्या जन्माने जीवनात खऱ्या ज्ञानाचा प्रकाश आणल्याची भावना रूढ झाली आणि त्यासाठी याच दिवशी येशूचा जन्मोत्सव साजरा करण्याचे निश्चित झाले आणि कालांतराने २५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात येऊ लागला. २४ डिसेंबरच्या रात्री जवळच्या चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती धर्मीय पारंपरिक

भक्तिगीतांचे गायन करतात आणि २५ डिसेंबरपासून बाल येशूच्या प्रतिमेला पाळण्यात घालतात त्याची माता मेरी आणि दर्शनाला आलेले मेंढपाळ, गाई, बैल, मेंढ्या आदी प्रतिमा ठेवतात . झोपलेल्या मुलांना जागे करण्यासाठी नाताळ वृक्षावरती खेळणी, चित्रे, पताका, दिवे लावतात. सांता क्लॉजचे यावेळी खेळणी, मिठाई वाटत होणारे आगमन लहानांसाठी आनंददायी अनुभव असतो. येशूच्या जन्माने आणि शिकवणुकीमुळे आपल्या जीवनातला अज्ञान, अंधश्रद्धा यांचा अंधार दूर झाल्याची धारणा झाल्याने त्याला परमेश्वराचा पुत्र मानून त्याच्यासमोर नतमस्तक होणे हे ख्रिस्ती धर्मीयांनी आपले कर्तव्य मानले. त्यामुळे गोव्यात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतलेल्या लोकांसाठी २५ डिसेंबर हा दिवस देवपुत्राचा जन्मोत्सव ठरला.

गोव्यात या उत्सवासाठी ‘नाताळ’ शब्द प्रचलित झाला आणि त्यामुळे नाताळाचा सोहळा केवळ ख्रिस्ती धर्मीयांसाठीच नव्हे तर अन्य समाजांसाठीही तो उत्साहवर्धक करण्यात आला. त्यामुळे गोव्यात हा सण, त्याचा उत्साह आणि आनंद यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. गेल्या तीन शतकांपेक्षा जादा काळापासून साजरा करण्यात येणारा हा नाताळाचा सोहळा, गोव्यातल्या ख्रिस्ती धर्मीयांसाठी चक्क आनंदोत्सवाची अपूर्व अशीच पर्वणी असते आणि त्यामुळे नाताळातला सोहळा आगळावेगळा व्हावा म्हणून ‘धोदेल’, ‘बिबिंका’ ही खास मिठाई माडाच्या गुळाचा वापर करून बनवण्याबरोबर एकापेक्षा एक रुचकर पदार्थ तयार केले जातात. गोव्यात झालेला पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य संस्कृतीचा मिलाफ जसा इथल्या ख्रिस्ती प्रार्थनामंदिराच्या वास्तुकलेवरती पाहायला मिळतो तसाच तो खाण्याजेवण्याच्या पद्धतीत अनुभवायला मिळतो. येशूचा जन्मोत्सव दरवर्षी संस्मरणीय व्हावा यासाठी गोव्यातील ख्रिस्तधर्मीय प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com