उत्तर गोवा किनारी भागांत माफियाराज मातलंय; उच्चाटनासाठी सरकार इच्छाशक्ती दाखवणार का?

Goa Beach Shack Regulations: गुन्हेगारी वाढली, कारण पोलिस वा पर्यटन खात्याचा कुणाला धाक वाटत नाही. स्वत:चे खिसे भरण्याची सोय पाहून सरकारी यंत्रणांनी बोटचेपी भूमिका घेतल्यास किनारपट्टीवरील दहशत बळावतच राहील.
Goa Beach Shacks Crime Ratio
Goa Beach Shack RegulationsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach Shacks Crime Ratio

लोकांसमोर अपमान होऊ नये म्हणून लहान मुलाच्या चुका पदरात घेऊन त्याला पाठीशी घालणाऱ्या आईचा ‘लाडका’ पुढे गावगुंड बनतो. त्याच्या हातून खून घडतो. न्यायालयात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते तेव्हा ‘तो’ आईला भेटायची इच्छा व्यक्त करतो.

मुलगा आईला जवळ बोलावतो आणि काहीतरी सांगण्याच्या निमित्ताने आईचा कान जोरात चावतो. आई विव्हळते, ती आश्चर्यचकित होऊन मुलाकडे पाहते, त्यावर तो उत्तरतो- ‘माझ्या चुका पदरात घेण्यापेक्षा वेळीच मला दोन धपाटे घातले असतेस तर आज मी तुरुंगात नसतो’. या कथेचे तात्पर्य - अति तेथे माती.

जे गोवा सरकार, पर्यटन खात्याला अद्याप कळलेले दिसत नाही. गेले चार महिने गोव्यातील पर्यटनाचे धिंडवडे निघाले, तरी सुधारणेचा लवलेश दिसलेला नाही. पैशांसाठी चटावलेल्या लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर किनारपट्ट्यांवर शॅकचालकांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे, ज्यातील बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यांची अरेरावी, मुजोरी असह्य बनली आहे.

समुद्राला खेटून टाकलेले बेकायदा बेड्स हटविण्यास सांगितल्याने एखाद्याचा खून केला जातो, ही अराजकता झाली. लाठ्या, काठ्यांनी आता स्थानिकांचे मुडदे पडायला लागले आहेत. आणखी काय पाहायचे राहिले आहे? मागील दोन महिन्यांत शॅकचालकांनी किरकोळ कारणावरून पर्यटकांना जीवघेणी मारहाण केल्याचे तीन प्रकार घडले, त्यात दोघे मृत्यू पावले, काही जण गंभीर जखमी झाले.

बदनामी झाल्यावर शॅकचालकांनी कळंगुटला ९ जानेवारीला ‘यापुढे पर्यटकांना देवासमान वागवू व कोणतेही दुष्कृत्य हातून घडणार नाही’, अशा शब्दांत क्षमायाचना केली होती; मात्र ते मगरीचे अश्रू होते हे हरमलच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. काही घडले की बैठकांचा फार्स होतो, खुर्च्या उबवल्या जातात व परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’च राहते. यातून मार्ग काढायचा असल्यास समस्येच्या मुळाशी जावे लागेल.

हरमल परिसरात स्थानिकांनी मिळवलेले बहुतांश शॅक हिमाचल प्रदेशातील लोकांच्या कह्यात आहेत. मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश संगीत तेथे नित्याचे. कुणी तक्रारीचा सूर आळवला तरी ‘जीत’ आपलीच हा दृढ विश्वास शॅकवाल्यांना असतो. शॅकसमोर पंधरा मीटर अंतरात वीस बेड ठेवण्याची कायदेशीर तरतूद आहे; परंतु शॅकपासून दूर, समुद्राच्या निकट जाऊन शंभर-शंभर बेड लावले जातात आणि तेथे कोणीही कारवाईस धजावत नाही.

पर्यटन खात्याचे अधिकारी कारवाईसाठी आल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांना जाब विचारत असल्याचा व्हिडिओ हल्लीच एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झाला होता. तो ‘गोमन्तक’कडेही उपलब्ध आहे. ही तऱ्हा असेल तर शिस्त कोण कुणाला लावणार आणि तशी अपेक्षा कुणाकडून बाळगणार?

Goa Beach Shacks Crime Ratio
Arambol Murder Case: गोव्यात शॅकवर आणखी एक खून, महिन्याभरात दुसरी घटना; खुर्च्या हटवल्या म्हणून स्थानिकाचा घेतला बळी

त्यामुळेच हरमल, मांद्रेच नव्हे तर उत्तरेतील किनारी भागांत माफियाराज मातले आहे. ज्यावर नियंत्रण मिळवणे सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जिथे मऊ मिळेल तेथे खणले जाते. अपप्रवृत्तींवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास यंत्रणेला गृहीत धरले जाते. शॅकचालकांकडून जे हल्ले झाले, त्यातील संशयित कामगार हे परराज्यांतील आहेत.

त्यांना इथे येऊन कुणाला मारण्याची हिंमतच कशी होते? असे प्रकार एकाएकी नाही घडत. यापूर्वी त्यांची दादागिरी पचली गेली असावी आणि त्यामुळेच निर्ढावलेल्या प्रवृत्तीने हरमलात बळी घेतला. गुन्हेगारी वाढली, कारण पोलिस वा पर्यटन खात्याचा कुणाला धाक वाटत नाही. स्वत:चे खिसे भरण्याची सोय पाहून सरकारी यंत्रणांनी बोटचेपी भूमिका घेतल्यास किनारपट्टीवरील दहशत बळावतच राहील.

Goa Beach Shacks Crime Ratio
Goa Beach Shacks: आदेशाचे उल्लंघन पडले महागात; कळंगुट बागा समुद्र किनाऱ्यावरुन नियमबाह्य शॅक्स पोलिसांनी हटवल्या

पर्यटन क्षेत्र चरण्याचे कुरण कसे बनले आहे, यावर आम्ही याच स्तंभातून भाष्य केले आहे. त्याची पुन्हा उजळणी गरजेची नाही. किनारी भागातील पर्यटन खरेच सुधारायचे असेल तर लोकप्रतिनिधींना आतबट्याचे व्यवहार बंद करावे लागतील. शॅक असो वा पर्यटनाचे इतर प्रकार हे स्थानिकांच्या फायद्यासाठीच आहेत, ही मूळ धारणा लक्षात घ्यावी. बेलगाम शॅकचालकांना व त्यांच्या मूळ मालकांना वठणीवर आणावे लागेल.

त्यांना रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेली व्‍यवसाय मुभा तत्काळ बंद करायला हवी. डॉक्टरांनाही पाच वर्षानंतर पुन्हा ‘रजिस्ट्रेशन’ करावे लागते. त्याचप्रमाणे सर्व पर्यटन परवान्यांची पुन्हा तपासणी व्हावी. ‘सौजन्य’, ‘नम्रता’ हे गुण अंगी बाणवले जाणे गरजेचे आहे, त्यासाठी ठोस योजना हवी. पर्यटनाला आणखी किती गालबोट लावून घेणार? किनारी भाग लूटमार आणि गळेकापूंचा अड्डा बनतो आहे. किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com