
विकास कांदोळकर
पर्यटन कला प्राचीन संस्कृतींपासून सुरू आहे. प्रवासाची स्मृतिचिन्हे शोधताना त्यात हस्तनिर्मित मातीकाम, कापड आणि जगातील अनेक प्रांतांतील सांस्कृतिक ओळख दाखवणारी चित्रे, इत्यादींचा समावेश असे. पर्यटनकलेतून प्रवाशांच्या अर्थपूर्ण, कलात्मक आठवणींच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. पर्यटक विविध संस्कृती-पाककृती-परंपरांचा अभ्यास करण्यासाठी, नैसर्गिक चमत्कार आणि ऐतिहासिक खुणा पाहण्यासाठी, साहस किंवा विश्रांतीचा अनुभव घेण्यासाठी आणि आपले दृष्टिकोन विस्तृत करण्यासाठी, आठवणी निर्माण करण्यासाठी, इतरांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि जागतिक समुदायाशी जोडण्यासाठी पर्यटन करतात.
गोवा हे नैसर्गिक समुद्रकिनारे, चैतन्यशील संस्कृती आणि ‘सुशेगाद’ आकर्षणासाठी भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ. नैसर्गिक आकर्षणाबरोबर गोव्याने पर्यटनकलेच्या माध्यमातून, स्थानिक कारागिरी, वसाहती प्रभाव आणि आधुनिक सर्जनशीलतेच्या मिश्रणातून, समृद्ध इतिहास आणि वैश्विक भावनेचे जतन केले आहे. गुंतागुंतीच्या कोरीवकाम केलेल्या लाकडी शिल्पांपासून, रंगीबेरंगी चित्रांपासून ते हस्तनिर्मित दागिने आणि कपडे डिझाइनपर्यंत, गोव्यातील पर्यटनकलेमध्ये एक भरभराटीचा उद्योग बनण्याची क्षमता आहे. तथापि सरकारी गैरव्यवस्थापनामुळे, कारागिरांच्या संघर्षांमुळे सांस्कृतिक अर्थव्यवस्था खुंटली आहे.
गोव्याची पर्यटनकला त्याच्या बहुसांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेली आहे. १९६१पर्यंत पोर्तुगीज वसाहत म्हणून राज्याच्या इतिहासाने त्याच्या कलात्मक परंपरांना एका विशिष्ट ‘इंडो-पोर्तुगीज’ आधारासह जपले. स्थानिक कारागिरांनी राज्याच्या किनारी वातावरणातून प्रेरणा घेत शंख-आधारित दागिने, मासेमारी आणि इतर स्थानिक कलांचे चित्रण केले. गोव्यातील चर्च-देवळांचा गवगवा होऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे पर्यटन कला गोव्याच्या आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाचा भाग बनली.
तरीही, पद्धतशीर दुर्लक्ष आणि खराब प्रशासनामुळे हा आशादायक उद्योग कमकुवत झाला आहे. लहान, अनियंत्रित ‘सेटअप’मधून काम करणाऱ्या कारागिरांना त्यांचे कार्य-कौशल्य सुधारण्यास मदत करू शकतील अशा आधुनिक साधने किंवा प्रशिक्षणाची समर्पित कला-केंद्रे किंवा अनुदानित कार्यशाळा स्थापन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राजस्थानसारख्या राज्यांनी संघटित बाजारपेठा आणि निर्यात प्रोत्साहनांद्वारे त्यांच्या हस्तकला उद्योगांना यशस्वी केल्याचे दिसते.
पर्यटनकला जेव्हा एक प्रामाणिक सांस्कृतिक अनुभव म्हणून ‘प्रमोट’ केली जाते तेव्हा ती भरभराटीला येते. गोवा सरकारने राष्ट्रीय किंवा जागतिक व्यासपीठावर आपल्या कारागिरांना समोर आणण्यासाठी फारसे काही केलेले नाही. केरळमध्ये राज्य पर्यटन मंडळ सक्रियपणे त्यांच्या ‘कॉयर’ उत्पादनांचे आणि कथकली-प्रेरित स्मृतिचिन्हांचे मार्केटिंग करते. एकात्मिक धोरणाच्या अभावामुळे गोव्याच्या पर्यटनकलेवर सांस्कृतिक मूल्य कमी असलेल्या, सामान्य, कारखान्यात बनवलेल्या वस्तूंचा प्रभाव पडला आहे.
पर्यावरणीय गैरव्यवस्थापनामुळे बहुतेक कलाकृतींना प्रेरणा देणारे गोव्याचे समुद्रकिनारे-जंगले, अनियंत्रित बांधकाम, प्रदूषण आणि अतिपर्यटनामुळे खराब होत आहेत. निसर्गर्हासामुळे पर्यटक प्रामाणिक अनुभवाला मुकले आहेत. समुद्रकिनारे खाजगी लोकांच्या घशात गेल्यामुळे शंख, लाकूड किंवा रंग यासारख्या नैसर्गिक साहित्यांवर अवलंबून असलेल्या कारागिरांना त्रास होऊन, विकास आणि संवर्धनाचा समतोल साधण्यात सरकारच्या असमर्थतेमुळे, हस्तकला उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल आणि प्रेरणा, अप्रत्यक्षपणे गळून पडली आहे. राज्याच्या पर्यटन धोरणांमध्ये हॉटेल्स, कॅसिनो आणि समुद्रकिनाऱ्यावरील ‘शॅक्स’ना प्राधान्य दिल्यामुळे सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बाजूला सारले गेले. भ्रष्टाचार आणि नोकरशाहीच्या लाल फितीमुळे या क्षेत्रातील खाजगी गुंतवणूकदेखील रोखली जाऊन, कलाकारांना वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत बचाव करणे मुश्कील झाले.
बायणातील झोपड्या पाडल्या गेल्या पण ‘हाय प्रोफाइल अनैतिक व्यावसायिक’ गोवाभर पसरले त्याचे काय? पर्यटन विभाग देवळांचे-गिरिजाघरांचे सरकारी पैशातून विस्तारीकरण करत आहे. भविष्यात सरकारने या धार्मिक स्थळांवर आपला हक्क सांगितला तर? किंवा गिरिजाघरात ‘सत्यनारायण पूजा’ आणि देवळात ‘तेर्स’ करण्याची कुणी सर्वधर्मसमभाव इच्छा प्रकट केली तर?
समुद्रकिनारे खाजगी लोकांच्या ताब्यात गेल्यामुळे अंत्यसंस्कार, गणपती-विसर्जन, अस्थी-विसर्जन, ‘सीमेवयलो-बकरो धावडणे’ वगैरे धार्मिक-विधींना बाधा होत आहेत, हे धार्मिक पुरस्कार करणाऱ्या सरकारला शोभते काय? कासव संवर्धनाला मानाचे स्थान मिळेल काय? प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक सिटीच्या माध्यमातून ‘आरसेनिक’सारखे विषारी पदार्थ समुद्रात वाहू लागले तर पर्यटनाचे काय होणार? किनाऱ्यावरील होणाऱ्या शूटिंगचे प्रमाण कमी का झाले? स्मार्ट-सिटी पणजीतील मच्छीबाजार भागात कुठलाही पर्यटक नाकाला रुमाल न धरता दहा मिनिटे उभा राहू शकेल काय? पूर्वी लोक गोव्याचे सृष्टिसौंदर्य पाहण्यास येत, आता कशाला येत आहेत?
लहानपणी शहरात जाताना नदीतून फेरीबोट, होडी किंवा पोहूनसुद्धा जावे-यावे लागे. तेव्हा वाटायचे पूल झाले तर काय मज्जा येईल! ‘काय’ म्हणणारे शिक्षित पेडणेकर ‘किंदें’ म्हणायला शहरात गेले ते परतलेच नसल्यामुळे त्यांच्या मूळ साथीदारांना वाली नसल्यामुळे, बेसावध पेडणेकरांच्या जागा ‘टुरिझम’ आणि ‘डेव्हलपमेंट’ची स्वप्ने दाखवून सरकारने आणि इतरांनी हडप केल्या. ‘सुजलाम-सुफलाम-आत्मनिर्भर-निसर्गसुंदर’ पेडण्याचा विकासाच्या नावाने ‘सत्यानाश’ होताना पाहून कोलवाळ आणि शिवोली पूल झालेच नसते तर फार बरे झाले असते, असे उपहासाने म्हणावे लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.