माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire: हंडीभर ओतून वाया गेल्यावर थेंबाथेंबाचे हिशेब करत जे प्रत्येक सरकारी खाते फडफडत आहे, ते पाहताना त्यांच्या सामर्थ्याची नव्याने जाणीव होऊ लागली आहे.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

हंडीभर ओतून वाया गेल्यावर थेंबाथेंबाचे हिशेब करत जे प्रत्येक सरकारी खाते फडफडत आहे, ते पाहताना त्यांच्या सामर्थ्याची नव्याने जाणीव होऊ लागली आहे. क्षमता, तत्परता, कारवाई करण्याची धमक हे गुणी प्रशासनात होते याचा सुगावा त्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसही नव्हता. ही तडफड, हडफडे अग्निकांडामुळे देशभर नाचक्की झाल्यानंतर होतेय ती वेळ राहता केली असती तर थोडी तरी शिल्लक उरली असती.

आता उरली सुरली इभ्रत राखण्यासाठी कारवाईची जी मोहीम सुरू झालीय तो गोमंतकीयांसाठी अचंबित करणारा दुर्मीळ अनुभव आहे. वागातोरमधील ‘रोमिओ लेन’चा बेकायदा झालेला विस्तार पाडण्याचा उच्च न्यायालयाने (High Court) आदेश देऊनही वेळ न मिळालेल्या पर्यटन खात्याला धावपळ करून बुलडोझर चालवावा लागला. कारवाईचा आदेश देऊनही ऐटीत उभे राहिलेले क्लब, आस्थापने वा इतर गैरप्रकारांना समाज माध्यमांवर अमाप प्रसिद्धी मिळतेय. मिम्स व्हायरल होताहेत. खिल्ली उडवली जातेय. त्यामागे लोकांच्या मनातील खदखद आहे. त्याची दखल घेतल्यावाचून गत्यंतर नाही, हे प्रशासन जाणून आहे.

Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

उगीच नाही घाम गाळून अधिकाऱ्यांनी क्लब्स, हॉटेल्स आणि पब्सच्या ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी सुरू केली! कर थकवलेल्या दोन कॅसिनोंचे परवाने रद्द करून सूचक इशारा दिलाय. काही मंत्र्यांना आता हात झटकावेसे वाटू लागलेत. पडद्याआड राहिलेले अधिकारी आपण गळाला लागणार की काय, या विवंचनेत घुसमटताहेत. कर्तव्यपूर्तीसाठी सरसावण्यास हडफडेतील क्लबची दुर्घटना कारणीभूत ठरावी हे मोठे दुर्दैव आहे. दिवसागणिक नवे खुलासे समोर येत आहेत. क्लब बेकायदा होता हे यंत्रणांना ठाऊक होते.

कारवाईचा प्रयत्न केल्यास आयपीएस अधिकारी रोखत होते, असा स्थानिक पोलिस दबक्या आवाजात दावा करताहेत. कोण हे आयपीएस अधिकारी? याचा सरकार शोध घेणार का? बरेच सनदी अधिकारी हे मौजमजेसाठीच गोव्यात (Goa) येतात, अशी धारणा आधीच दृढ बनली आहे. आसगाव घर पाडण्याचे प्रकरण लोक विसरलेले नाहीत. आयपीएस अधिकाऱ्याने बाऊन्सरच्या साक्षीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यात घर पाडण्यास उत्तेजन दिले होते. हे असे अधिकारी मंत्र्यांना हवे असतात. ते वाटेल ती बेकायदा कामे करण्यास तयार होतात. त्या बदल्यात अधिकारी आपले उखळ पांढरे करतात.

Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

अशा उखळ पांढरे करून घेतलेल्यांचे चेहरेही पांढरेफटक पडू लागल्याचे पाहून लोकांना बरे वाटू लागले आहे. पण, अशीच तत्परता अपघात रोखण्यासाठी, महामार्गावरील ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी; वाहतूक परवाने देताना काटेकोर पाहणीमध्ये; ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत, नागरी सेवांमध्ये दाखवल्यास ते हिताचे ठरेल. आता सुशासनाचे सोवळे सोडू टाकले व ओवळे सापडेनासे झाल्यावर थयथयाट करून काय लाभ? लज्जारक्षण काही केल्या होईनासे झाले तेव्हा सल्लजता आठवून काही फायदा नसतो.

Arpora Nightclub Fire
Arpora Fire News: शॉर्ट सर्किटमुळे हडफडे गेस्ट हाऊसमध्ये आग, 70 हजारांचे नुकसान

आता प्रशासनाने कितीही झाकायचा प्रयत्न केला, तरी उघडे पडायचे पडलेच. या सगळ्यांत प्रश्‍न पडतो, तो फार महत्त्वाचा आहे; तत्परतेने काम करण्यासाठी एखादी दुर्घटनाच का घडावी लागते? घालून दिलेल्या नियमांनुसार वेळेत काम करणे, हा नित्यक्रम असला पाहिजे. त्यासाठी २५ लोक जळून मरायची वाट पाहणे केवळ क्रूरतेचेच नव्हे तर माणुसकीशून्य कोडगेपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. आता सुरू झालेली तत्परता, अशीच कायम टिको.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com