
वेगवेगळे पेहराव करून विविध पोझमध्ये आकर्षक फोटो काढायला कोणाला आवडत नाही? मात्र त्यासाठी वेळ कोणाकडे असतो? यावर मात म्हणून, जेमिनी ‘एआय नॅनो बनाना फीचर’च्या मदतीने रेट्रो साडीतील फोटो तयार करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू झाला आहे.
फेसबुक, व्हाट्सअप्प, इंस्टा आदि सोशल मीडियावर या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. हे फीचर वापरुन विंटेज, पिंटरेस्ट, रेट्रो आदी पारंपारिक, 3 डी तसेच इतर लुक्समधील फोटो तयार करण्यासाठी, सोशल मीडिया वापरणारे लाखो चेहरे, आपले विविध ढंगातील फोटो तयार करत आहेत. केवळ मुली आणि स्त्रियाच नव्हे तर आता पुरुषही आपले धोती, सदरा, कुर्ता आदी पारंपारिक वेशातील फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.
मात्र शंतनू नायडू याने केलेल्या विधानामुळे या ट्रेंडला काही प्रमाणात लगाम बसला आहे. शंतनू म्हणतो, तुम्ही भारतात आहात, अमेरिकेत नाही. तुमच्या कपाटात नक्कीच 15 साड्या तरी असणार. मग त्या साड्या घालून तुम्ही का फोटो काढत नाहीत? तुमच्या नवीन साड्यांमधील फोटो तयार करण्यासाठी तुम्ही एआयला आपला फोटो का देत आहात? तुम्ही इतक्या आळशी झाल्या आहात का?
शंतनूच्या या विधानावर काही स्त्रिया नाराज आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की आमच्या कपाटात जारी ढीगभर साड्या असल्या तरी त्या नेसून, नट्टा-पट्टा करून फोटोशूट करायला इथे कोणाला वेळ आहे आणि मुख्य म्हणजे आमचे वेगवेगळ्या ढंगातले फोटो काढणार कोण? रोज सकाळी दिवस कसं उजाडतो आणि कसा मावळतो हे कामाच्या डबघाईत समजत नाही.
काही जणांचे म्हणणे असे आहे की गूगल तुमचे हे फोटो कसेही वापरुन त्याचा विपरीत परिणामही करू शकतो. एका युवतीचे विधान याला पुष्टता देते. ती म्हणते, तिच्या खांद्यावरचा तीळ तिने अपलोड केलेल्या फोटोमध्ये दिसत नव्हता तरी ही जेमिनी एआयकडून प्राप्त झालेल्या तिच्या फोटोमध्ये हा तीळ दिसत आहे.
यावर नेटकरी म्हणतात की, तुम्ही अपलोड केलेल्या सर्व फोटोंमधून माहिती गोळा करणे हे एआयचे काम आहे आणि जेंव्हा तुम्ही जेमिनी एआयला तुमची प्रतिमा तयार करायला सांगता, तेंव्हा ते तुमच्या अपलोड केलेल्या जुन्या माहितीचाही वापर करू शकते. इंटरनेटवर शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती एआय गोळा करत असते. तेच एआयचे काम आहे त्यामुळे अपलोड केलेल्या फोटोची वेगळी इमेज बनवताना त्याला तुमच्याबद्दल सर्व माहिती असतेच.
सोशल माध्यमाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न हा नेहमी उपस्थित असतो आणि हे फीचरही त्याला अपवाद नाही. इतर कोणत्याही डेटाप्रमाणे, तुम्ही इथे अपलोड केलेले तुमचे किंवा आप्तस्वकीयांचे फोटो डेटा लिक होऊन उघड होऊ शकतात. थोडक्यात सांगायचे तर एखाद्या गोष्टीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असतात आणि हा निसर्ग नियम इथेही लागू होतो. आता हे जेमिनी एआय फीचर कसे वापराचे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. हो की नाही?
कविता आमोणकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.