
आपल्याकडे पुराण पोथ्या लिहिणाऱ्यांनी या सौम्य धर्म विद्रोही राज्यव्यवस्थेच्या नोंदी ठेवल्या नाहीत. या मौर्य राजदरबाराने चाणक्यनीतीचा भाग म्हणून महादेवाच्या लोकपुत्राला देवता म्हणून पुढे आणले. चंद्रगुप्त स्वत: गुराखीचा गटनेता. महादेवाचे पुत्र श्रीगणेश अशाच टोळीचा नेतृत्व करीत होता म्हणून तो गणाचा नेता म्हणून गणपती, जसे सेनेचा नेता तो सेनापती.
जसे आमच्या पिढीने टीव्हीवरील रामायण महाभारताला माथ्यावर घेतले. तसे ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटाला हल्लीच्या काळातील बालपिढीने डोक्यावर घेतले. आजच्या घडीच्या तिन्ही लोकात सर्वांत जास्त लोकप्रिय हिंदू देव म्हणजे आपला गणपतीबाप्पा! आज तिन्ही जगतातील लोकात त्याचा डंका आहे.
आजची तीन जगते म्हणजे, पुराणात सांगितलेले जग, वास्तविक जग व आभासी जग. आपले गणपती बाप्पा फक्त एकाधर्मापुरते मर्यादित नसून बौद्ध व जैन धर्मीयही लोक त्यांना मानतात. त्यामुळे, बाकीच्या हिंदू देवतांचे भाविक जास्तीतजास्त सव्वाशे कोटी असतील पण बाप्पांचे भाविक दीडशे कोटींवर जाऊ शकतात. तेहेतीस कोटी देवांपैकी या एकमेव देवात असे काय काहीतरी विशेष असावे ज्याच्यामुळे आपण ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत त्याला डोक्यावर घेतो आहे.
प्रबोधनकार ठाकरेचा असा एक दावा होता की गणपतीला दैवत स्वरूपात पुढे आणण्याचे काम चंद्रगुप्त मौर्यच्या राजदरबारातील एका गटाने केले. दीड दशकात मौर्य राज्य विस्तारले तसे मौर्य सम्राटाला ‘चंद्रगुप्त’ मौर्य म्हणण्याऐवजी ‘गणपती गुप्त’ मौर्य म्हणण्याची प्रथा सुरू झाली. पुढे ‘गणपतीबाप्पा मोरया’ हा गजर पुढेही सुरू राहिला, असे प्रबोधनकार ठाकरेंचे मत होते. आज एकविसाव्या शतकातही गजर घोषणा बाप्पाची ‘टॅग लाइन’ झाली आहे.
येथे मी गणपतीबाप्पाला ‘पोप्युलर’ हा यासाठी म्हणतो की ‘पोप्युलर’ या शाब्दाच्या मराठी अनुवादातून तीन विशेषणे तयार होतात. ‘लोकप्रिय’ ‘लोकाचा’ व ‘लोकांकरिता’ अशी ती विशेषणे. बाप्पांना ही तीनही विशेषणे लागू पडतात. प्रबोधनकार ठाकरेचा दावा खरा आहे असे मानल्यास गणपती हे वैदिक दैवत म्हणून लोकांपुढे आणण्याची सुरुवात पाचव्या शतकात चंद्रगुप्त मौर्यांनी सुरुवात केली व आज दोन हजार वर्षांनी मागे पाहता तो ‘लोकाचा देव’ या लौकिकाला पोहोचला आहे. वारकरी संताच्या प्रयत्नामुळे आज पंढरीचा विठ्ठल आज बहुजनी लोकाच्या श्रद्धेचा राजा झाला आहे तसा.
बौद्ध धर्मात श्रीगणेशाला मानले जाते सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्या राज्यात श्रीगणेश व्रत चालू राहिले. याचा बाप्पाच्या आजच्या लोकप्रियतेशी संबंध जोडणे सहज शक्य आहे. मौर्य राज्याचा कालखंड इसापूर्व ३०० ते १५० या दरम्यानचा. आपल्या पूर्वेकडे, बुद्ध व जैन या धर्माचे निर्मिती होऊन दोनशे वर्षे आधी झाली होती तर तर पश्चिमेकडे ख्रिस्ती धर्माची निर्मिती व्हायला अजून १५० वर्षाचा अवधी होता.
इस्लाम धर्म निर्माण व्हायला अजून आठशे नऊशे वर्षाचा अवधी होता. आतापर्यंत सभ्यता व नागरीकरण बऱ्यापैकी आकार घेत होते. संस्कृती आक्रमणाचा पुढचा टप्पा आकार घेत होता. ग्रीक राजा आलेक्झांडर द ग्रेट मोठ्या सैन्यासकट राज्य आक्रमण करीत भारतात पोहोचला होता. जगभरात राजा कुणीही असला तरी सत्तेचा धाक कट्टर धर्म संस्थेकडे होता. अशा कट्टर धर्म संस्थेकडे दोन हात करीत नवे पंथ तयार होण्याचा जवळजवळ एक हजार वर्षाचा काळ.
आधी म्हटल्याप्रमाणे पूर्वेकडे बुद्ध व जैन पंथ जन्माला आले तसे पश्चिमेकडे ख्रिस्ती व इस्लाम धर्म निर्माण झाला. पूर्वेकडील आदिसंस्कृतीत आत्मसंतुष्टता नेहमी होती, म्हणून येथे निर्माण झालेले बुद्ध व जैन पंथ शांततेच्या मार्गाने जात आहे तर पश्चिमेकडे ख्रिस्ती व इस्लाम या पंथांनी आपला मूळ आक्रमणाचा गुण सोडलेला नाही. मौर्य साम्राज्याच्या कार्यकाळात कट्टर धर्मसंस्थांना राज्यव्यवहारात हस्तक्षेप करू दिला नाही. देवावर सर्वांचा समान हक्क आहे अशी धारणा याच काळात रुजविली. याचा परिणाम असा झाला की आपल्याकडे पुराण पोथ्या लिहिणाऱ्यांनी या सौम्य धर्म विद्रोही राज्यव्यवस्थेच्या नोंदी ठेवल्या नाहीत.
या मौर्य राजदरबाराने चाणक्यनीतीचा भाग म्हणून महादेवाच्या लोकपुत्राला देवता म्हणून पुढे आणले. चंद्रगुप्त स्वत: गुराखीचा गटनेता. महादेवाचे पुत्र श्रीगणेश अशाच टोळीचा नेतृत्व करीत होता म्हणून तो गणाचा नेता म्हणून गणपती, जसे सेनेचा नेता तो सेनापती. आता गणेश चतुर्थी हा एक व्रत आहे, जो आज उत्सव झाला आहे. या व्रतात, शेतातील चिकण मातीतून श्रीगणेश प्रतिमा तयार करायची, तेथेच त्याचे पूजन करायचे व दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या आधी त्याचे तेथील वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे.
पहिल्या दिवसाचा सूर्योदय ते दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय असा एक दिवस व दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय ते सूर्यास्त असा अर्धा दिवस म्हणून दीड दिवस. आज गोव्यातील आदिवासी गणेश चतुर्थीला व्रत करता आले नाही तर पुढच्या चतुर्थीला हे व्रत करतात व सूर्यास्त होण्याआधी प्रतिमेचे विसर्जन करतात. या मौर्य साम्राज्यात व्रतसंस्कृतीला राजाश्रय दिला. बहुजनात व्रतसंस्कृतीला राबविण्यास कट्टर धर्म व्यवस्थेचा नेहमी विरोध असायचा व तो राजद्रोह मानला जायचा. मौर्य साम्राज्यात ही व्रतसंस्कृती राजदारबारपासून सुरू केल्याने ती बहुजन रयतेत रुजली.
दोन तीन पिढ्या चालत राहिल्याने, हे व्रत आपण केल्याने देवाचा कोप होत नाही असा विश्वास लोकांमध्ये रुजला. सत्यनारायण व्रत, संतोषीमाता व्रत, भागीरथी तीर्थ पूजन हे सगळे व्रत गणेशचतुर्थीसारख्या व्रतस्वातंत्र्यातून समोर आले आहे. मौर्य राजदरबाराने श्रीगणेशाला दैवत म्हणून का पुढे आणले असावे याविषयी प्रबोधनकारांचा एक अंदाज होता. पुराण पोथ्या स्वरूपात आर्यसंस्कृती येथे रुजवण्यात सुरू झाली तेव्हा नव्याने आलेल्याचे पूर्वजांना हे अति नैसर्गिक शक्ती असलेले सभ्यतेचे आदर्श असे ‘देवत्व’ दिले तर येथे आधीपासून असलेल्या पूर्वजांना अति नैसर्गिक शक्ती असलेले पण सभ्यतेची उणीव दाखवत ‘असुरत्व’ दिले.
या असुरात सर्वांत शक्तिशाली तो ‘महाअसुर’. या महा असुरच्या वंशजाशी दोन हात करून येथे टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर या ‘महाअसुर’ला ‘महादेवा’चा दर्जा देऊन ‘महाअसुर’च्या वंशजाचा विरोधाची धार कमी केली. जन्मजात विसंगतीमुळे गजमुखसम चेहरा असलेल्या त्याच्या मुलाला सौम्य देवत्व दिले. महाभारताचे पुराण पुढे आणताना व्यासासाठी त्याने ‘स्टेनोग्राफर’चे काम केले याची जोड लावली.
महाभारत व रामायण यातील मुख्य फरक हा की रामायण ‘देव’ व ‘असुर’ या कथित सभ्य व असभ्य यांच्यातील संघर्षातील आठवण आहे तर महाभारत कथित सभ्य लोकातील ‘सभ्य व असभ्य’ स्वभाव गुणातील संघर्ष होता. प्रबोधनकारांच्या तर्काला वास्तवाशी जोड देता येते. आज भारताच्या कानाकोपऱ्यात महादेवाची मंदिरे आहेत व त्याची पूजा अर्चा करायला आधीच्या लोकाचा म्हणजे बहुजनी समाजा सहभाग असतो.
मौर्य साम्राज्य व शिवराज्य यातील समान धागा हा की प्रजासस्थेचा गाभा येथे होता. या दोन्ही राजांना त्यावेळच्या धर्म पंडितांनी आपले नाही मानले. स्वातंत्र्य चळवळीच्या चालनेसाठी महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढल्यानंतर बहुजणी समाजाकडून दहा दिवस शिवजयंती उत्सव सुरू झाला.
टिळकांनी पुण्यात भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रसिद्धीस आणण्यात शिवजयंती उत्सवाच्या लोकप्रियतेला कट शाह होता फुलेकरी चळवळीचे लोक मानतात. आज शिवजयंती व गणेशोत्सव तेवढ्याच दणक्यात साजरे होत आहे. येथे एखादी संस्कृती रुजवायची असेल तर येथे बहुजनांना दूर ठेवून चालत नाही, हे त्याचे तात्पर्य आहे.
आधी मौर्य साम्राज्याने महादेव पुत्राला गौरवणाऱ्या ‘गणपतीबाप्पा मोरया’ या उत्सवी घोषणारूपी गजराला अजरामर केले तर पुढे शिवरायांनी ‘हर हर महादेव’ या आदिसंस्कृतीच्या नायकाला गौरवणाऱ्या घोषणेला अजरामर केले. या अशा आदिसंस्कृतीचा पुरावा असलेल्या या पितापुत्राचा रहिवास आजपासून कमीतकमी दोन दिवस आपल्याकडे राहणार आहे. त्यांना आमुचे नमन व सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. या लेखाचा उत्तरार्ध पुढच्या आठवड्यात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.