
सत्तरी: भारतीय धर्म-संस्कृतीत गजलक्ष्मीची उपासना शेकडो वर्षांपासून प्रचलित असून, या देवतेची एकापेक्षा एक सुंदर शिल्पे देशभरातल्या मंदिरात पाहायला मिळतात. हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरेत गजलक्ष्मीचे रूप पूज्यनीय असून तिच्या काष्ठ, धातू, पाषाणात कोरलेल्या मूर्तीची समृद्ध वारसा अनुभवायला मिळतो.
हत्तीसह असणारी आणि कमळात विराजमान झालेल्या या देवीला गजलक्ष्मी अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. बऱ्याच मूर्ती-शिल्पांत ही देवी पद्मासनात बसलेली चित्रित केलेली असून चतुर्भुजा स्थितीत आहे. तिच्या एका हाती कमळ आणि दुसरा हात अभयमुद्रेत दाखवलेला असतो. तिच्या दोन्ही बाजूला दोन किंवा चार हत्ती उभ्या स्थितीत आपल्या सोंडेतून देवीवरती अभिषेक करताना चित्रित केलेले असतात. काही ठिकाणी हत्तींच्या सोंडेत पाण्याने भरलेले कलश देवीच्या मस्तकावरती ओतत असलेले दाखवलेले आहे. भारतीय धर्मात लक्ष्मीची उपासना ही समृद्धी आणि एेश्वर्याची देवता म्हणून केलेली आहे. तिचा संबंध पृथ्वीशी आणि हत्तीचा संबंध ढगाशी जोडलेला असल्याने तिला पर्जन्याची देवता म्हणूनही मानलेले आहे.
औरंगाबाद (संभाजीनगर) येथील वेरूळच्या कैलास लेण्यांच्या प्रवेशाजवळच त्रिमितीचा भास करणारे शिल्प गजलक्ष्मीच्या नितांत सुंदरतेचे दर्शन घडवते. अांध्र प्रदेशातील आलमपूरपासून तेे मध्यप्रदेशातील सांचीपर्यंत गजलक्ष्मीच्या सुंदर मूर्तींचे दर्शन पहायला मिळते.
ऋग्वेदातल्या सूक्तात ‘हस्तिनाद प्रबोधिनी’ म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी जागृत होणारी देवता म्हणून वंदनीय ठरलेली आहे. इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून तिचे संदर्भ आढळतात. कौशांबीच्या नाण्यांवर गौतम बुद्धाच्या जन्माचे निदर्शक म्हणून ही देवी कोरलेली आढळते.
इसवीसनाच्या सहाव्या-सातव्या शतकातील ताम्रपटावर गजलक्ष्मी राजमुद्रा कोरलेली पहायला मिळते. गोवा-कोकणात गजलक्ष्मी शिल्पाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा असून तिला केळंबिका, केळमेची माया, काळम्मो, केळबाय आदी नावांनी ओळखली जाते.
आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि गजलक्ष्मी अशी तिची आठ रूपे प्रसिद्धीस पावलेली आहेत. परंतु गोव्यात आणि कोकणात ही गजलक्ष्मी विशेष लोकप्रिय असून गावोगावी असलेल्या पंचायतनात पाषाणी मूर्तीच्या रूपात तिची स्थापना केलेली पाहायला मिळते.
गोव्यात केळबाय, केळमेची माया, भावकाई या नावांनी परिचित असलेली ही देवी महत्त्वाची मानलेली असून, तिला सृजन, सर्जन, संतान, समृद्धी, सुखदायिनी स्वरूपात पुजले जाते. गोमंतकाचे सांस्कृतिक इतिहासकार अनंत धुमे यांनी ‘केळबाय’ या शब्दातील ‘केळ’ वृक्षाशी आणि ‘बाय’ कुमारिका स्त्रीशी संबंधित असल्याचे म्हटलेले आहे. गोव्यात गजलक्ष्मीची एकापेक्षा एक विलोभनीय शिल्पे आढलेली आहेत.
सत्तरीत आज हणजुणे धरणाच्या जलाशयाखाली गेलेल्या गुळ्ळे गावात गोवा कदंब राज- घराण्याचे चिन्ह असलेल्या सिंहाच्या मुद्रा असलेल्या दोन मूर्ती आढळलेल्या असून, या दोन्ही पाषाणी मूर्तीच्या स्वरूपावरून इथल्या लोकधर्मात गजलक्ष्मी उपासनेचे प्राचीनत्व स्पष्ट होते. गोव्याच्या एका टोकाला जे काणकोणात लोलये गाव आहे तेथून महाराष्ट्राच्या सीमेशी संलग्न असणाऱ्या पेडण्यातील हणखणेपर्यंत गजलक्ष्मीची वैविध्यपूर्ण शिल्पे आढळली आहेत.
परंतु पश्चिम घाटातल्या सत्तरीतल्या करंझोळ, झर्मे, वेळूस, सावर्डे, केरी, पर्ये, होंडा येथील गजलक्ष्मीची शिल्पे अत्यंत देखणी आणि लक्षणीय अशीच आहे. सत्तरी तालुक्याचे मुख्यालय आणि नगरपालिका क्षेत्र असणाऱ्या वाळपई शहराचा एक प्रभाग असणाऱ्या वेळूस येथील गजलक्ष्मीची चार शिल्पे या गावात शेकडो वर्षांपासून या देवतेच्या समृद्ध उपासना परंपरेची प्रचिती आणून देत आहेत.
वाळपई-कोपार्डे मुख्य मार्गावरून उजव्या बाजूला वळणाऱ्या एका छोटेखानी रस्त्यालगत असणाऱ्या बसव्याचे मळ येथील घोटींग वृक्षाखाली असलेली गजलक्ष्मीची मूर्ती केवळ धार्मिक, सांस्कृतिक इतिहासच नव्हे तर या परिसरातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परंपरेतल्या गतवैभवाची प्रचिती देत आहे.
पाव शतकापूर्वी वेळूस गावातील ‘बसव्याचे मळ’ ही जागा महाकाय वृक्षवेलींनी नटलेली होती आणि त्यामुळे मातीत पुरलेल्या स्थितीत असलेल्या मूर्तीचे पूर्ण दर्शन घेता येत नव्हते. परंतु आज वाळपई शहर नागरीकरणाच्या बेशिस्त विळख्यात सापडलेले असल्याने, इथले जंगल कधीच इतिहासजमा झालेले आहे. सध्या ही मूर्ती घोटींगाच्या महाकाय वृक्षाखाली ऊन, पाऊस, वादळ-वारा झेलत उपेक्षित स्थितीत आहे.
सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगात उगम पावणाऱ्या असंख्य जलस्रोतांना कवेत घेऊन मासोर्डे येथे मुख्य म्हादईशी एकरूप होणाऱ्या ‘वेळसाच्या न्हंय’च्या काठावर वसलेला वेळूस गाव तेथील श्रीरवळनाथ आणि महादेव देवस्थानांमुळे नावारूपाला आला होता, त्यामुळे विजयनगरच्या संगम राजघराण्यातील हरिहर राजाच्या कारकिर्दीत प्रतिहस्त नराना गोसावी यांच्यावतीने इथला राज्यकारभार पहाणाऱ्या माई शेणवी वागळे यांनी मसवट गावाचा महसूल देण्यासंदर्भातले १४०२ आणि १४०८ या काळातले शिलालेख उभारलेले आहेत.
गोवा कदंब, विजयनगर आदी राजवटीत केळघाट, चांदसुर्या घाटाच्या मार्गात येणारा वेळूस गाव भरभराटीला आला होता आणि ऐश्वर्य, समृद्धी यांच्या देवतेचा वरदहस्त आपणाला अनंतकाळ लाभावा म्हणून या गजलक्ष्मीची निर्मिती केली असावी.
वेळूसच्या बसव्याचे मूळ येथे असलेल्या या गजलक्ष्मीच्या मूर्तीत स्थानिक लोकधर्म, समाजजीवन, प्रचलित परंपरा यांचे विविध पैलू मूर्तिकारांनी मोठ्या कौशल्याने कोरले आहेत. या मूर्तीचे आगळेवेगळेपण संशोधकांना, संस्कृती अभ्यासकांना अचंबित करणारे ठरले आहे.
दोन्ही बाजूंना लक्ष्मीच्या मस्तकी जलाभिषेक करणारे हत्ती, त्यांच्यासोबत असणारे फळांनी लगडलेले कर्दळी वृक्ष, त्यांचा आस्वाद घेणारे माकड, युद्धतत्पर आणि शस्त्रसज्ज योद्धे, खांद्यावरती कलश धारण करून महापुरुषाला वाद्यवृंदाच्या संगीत साथीवरती चाललेली मिरवणूक आदींचे सुरेखपणे चित्रण करणारी ही पाषाणी मूर्ती मूर्तिशास्त्राचा आणि गोव्याला पूर्वापार लाभलेल्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक संचितांच्या विविधांगी पैलूंचा अभ्यास करणाऱ्यासाठी अनमोल असा खजिनाच आहे. कर्दळीने युक्त असणारी वेळूसची ही गजलक्ष्मीची मूर्ती तिच्या गोवा-कोकणातल्या रूढ असणाऱ्या केळबायच्या उन्नयन प्रक्रियेची साक्ष देणारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.