
भावी पिढ्यांचा शाश्वत वारसा तगवण्यासाठी भविष्यातील गोव्यातील खाणकामाला उत्तरदायित्व आणि पर्यावरणीय दृष्टिकोन स्वीकारून आणि समर्पित वृत्तीने चालना दिली पाहिजे. गोव्यातील खाण क्षेत्राने गेल्या दोन दशकापासून आपल्या नशिबात अनेक चढउतार पाहिले.
पोर्तुगीजांनी कायमस्वरूपी दिलेल्या वसाहती भाडेपट्ट्यापासून, 2000 च्या दशकात अवैध खनिज उत्खननाच्या उन्मादी परिस्थितीचा अनुभव खाणपट्ट्यांनी घेतला आहे. न्यायालयीन हस्तक्षेपामुळे सध्याच्या लिलाव आधारित प्रणालीपर्यंत हा उद्योग आता येऊन पोहोचला आहे.
हा खाणपट्टा 'गोव्याचे पोट' आहे ज्याचे स्वरूप अनियंत्रित हिंसक उत्खननाने प्रचंड खड्ड्यांमध्ये बदलून गेले आहे. पाण्याचे विषारी स्त्रोत आणि कधीही दुरुस्त न होऊ शकणारी तिथली पर्यावरणीय व्यवस्था या खाणकामाने मागे ठेवलेल्या गोष्टी आहेत.
पश्चिम घाट गोव्याच्या डोक्याचे (उंच भागाचे) प्रतिनिधित्व करतो तर मधला भाग- खाणपट्टा- पोटाचे प्रतिनिधित्व करतो. पोटाच्या या भागात सर्व मौल्यवान खनिजे आहेत आणि खालच्या भागात किनारी मैदाने आहेत जिथे आम्हाला आता खरोखरच काहीतरी निर्माण करायचे आहे.
खाणीच्या नव्हे तर खाण धोरणाच्या नावाखाली चाललेल्या लुटीच्या विरोधात आम्ही आहोत. 2004 ते 2012 या काळात गोव्यातून 88 हजार कोटी रुपयांचे खनिज निर्यात झाले पण गोव्याला त्यातून केवळ 3000 कोटी रुपयेच मिळाले. म्हणजे प्रत्येक शंभर रुपयांमध्ये फक्त पाच रुपये!
खनिजे संपत्ती ही कोणत्याही सरकारची खाजगी मालमत्ता नसते, ती जनतेची, विशेषतः भविष्यातील पिढ्यांची सामूहिक वारसा संपत्ती असते.
खनिजाला सामूहिक वारसा संपत्ती म्हणून मान्यता देणे, शून्य आर्थिक नुकसान होईल अशा प्रकारे उत्खनन करणे, खनिज विक्री मधून मिळणाऱ्या नफा कायमस्वरूपी निधीत रूपांतरीत करणे, सर्व नागरिकांना त्याचा लाभांश मिळवून देणे आणि या संपूर्ण प्रक्रियेत सार्वजनिक नियंत्रण व पारदर्शकता राखणे या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब केल्यास गोव्याच्या प्रत्येक नागरिकाला दरमहा 1500 पर्यंत लाभांश सहज मिळू शकतो.
खाणक्षेत्र संबंधाने गोमंतकियांनी, विशेषतः शहरी भागातील नागरिकांनी जागरूक राहण्याची, खाण धोरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याची, कायदेशीर मार्गाने हस्तक्षेप करण्याची तसेच डिजिटल मोहिमा राबवण्याची अत्यंत गरज आहे. खाण संपत्तीचा प्रश्न हा केवळ पर्यावरण किंवा अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही तर तो एक नैतिक प्रश्न आहे.
(मोग संडे व्याख्यानातून)
क्लाॅड अल्वारिस, राहुल बसू
गोवा फाउंडेशन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.