Opinion: महिलांनाही 'स्वतंत्र'पणे जगावेसे वाटत असेल तर त्यांच्यासाठी पर्याय का खुला असू नये?

Companionship in Old Age: मग ती भडभडून बोलू लागली. तिच्या डोळ्यात अश्रूही जमा झाले असावेत. आवाज कापत होता. ‘नवरा अचानक गेला, त्यावेळी कन्या छोटी होती. मी तिच्यात रमले.
Elderly companionship, loneliness, senior citizen relationships, Goa social issues
Elderly companionship, loneliness, senior citizen relationships, Goa social issuesDainik Gomantak
Published on
Updated on

अनोळखी क्रमांकावरून आलेला तो फोन होता.

ती बाई म्हणाली, ‘मी अमुक मुलीची आई आहे. मला तुमच्याशी वैयक्तिक बोलायचे आहे.’ मी म्हटले, ‘सांगा.’ ‘कोणताही आडपडदा न ठेवता मी बोलणार आहे’, ती म्हणाली. मी म्हटले, ‘बिनदिक्कत सांगा. माझ्यावर विश्वास ठेवा!’

तशी माझ्या फार परिचयातील ती व्यक्ती नव्हती. तिचा नवरा वकील. नवरा वारल्यावर तिने प्रॅक्टिस सुरू केली. नवरा लेखन करायचा. साहित्यिक क्षेत्रात त्याने ओळख बनवली होती. आता त्यांची मुलगीही साहित्य क्षेत्रातच आहे. त्यामुळे ती प्रत्येकवेळी बोलताना मुलीचा संदर्भ देते.

मला असे अनेक फोन येत असतात. गोव्यात लोकांना संपादक म्हणजे सामाजिक कार्यकर्तेच वाटत असतात. आपले प्रश्न, दुःख, कैफियती ऐकण्याचे ते हक्काचे ठिकाण असल्याचे लोक मानतात. त्यातल्या त्यात ‘गोमन्तक’च्या संपादकांनी ही परंपरा चालवली आहे.

ती बाई स्पष्टपणे बोलायलाच लागली. ‘कंटाळा आलाय रे मला, मी सध्या गोव्यातल्या या महिलाश्रमात राहतेय. मला तेथे फार एकटे वाटते. बोलायला कोण नाही, सुखसंवाद करणारे कोणी नाही. माझ्या व्हेवलेंथचे कोणी नाही. या महिलाश्रमात सगळ्या म्हाताऱ्या बायका आहेत. केवळ स्वतःचे दुःख ऐकवत विव्हळत असतात.’

-आणि मग ती आणखी मोकळी होत म्हणाली. ‘मला पार्टनर हवा आहे.’

मी तिला आणखी दिलासा देत म्हटले, ‘मला तुझा मित्र समज. तुझ्या मनातील सारे सांग, मन मोकळे कर.’

मग ती भडभडून बोलू लागली. तिच्या डोळ्यात अश्रूही जमा झाले असावेत. आवाज कापत होता. ‘नवरा अचानक गेला, त्यावेळी कन्या छोटी होती. मी तिच्यात रमले. नंतर तिचे व्याप वाढले. कन्येचे लग्न झाले. सुरुवातीला मी तिच्याकडे राहायला जात असे. माझ्या किरकोळ आजारपणात ती येथे येऊन राहत असे. परंतु हे किती काळ चालणार? मला आता सहचर्याची उणीव भासू लागली आहे. मी एकटी पडलीय, त्यामुळे अस्वस्थ असते. बोलायला कोणी नाही. एकदा तर माझ्या घरी अगदी ठरवून आत्महत्येचाही प्रयत्न केला...’

आता मी चरकलो, माझ्या तोंडून अचानक शब्द बाहेर आले, ‘काय?’

‘खरं आहे... मी गोळ्या खाल्ल्या, बराच वेळ मी ओ देत नाही, म्हटल्यावर शेजारच्यांनी कडी तोडून आत प्रवेश केला. मला वाचविले. त्यानंतर मी महिलाश्रमात राहायला गेले आहे. माझे घर व कार्यालयही येथून जवळच आहे. परंतु येथेही मला एकटेपणा जाणवतो. माझ्या पातळीवर बोलणारे, माझे सुख-दुःख समजून घेणारे मला कोणी हवे आहे. त्यातून मला वाटू लागलेय, मला पार्टनरची गरज आहे.’

साहजिकच मी तिचे वय विचारले. ती ६७ वर्षांची आहे.

मग तीच म्हणाली, ‘काही ओळखीतून मला काहींनी विचारलेही होते. परंतु त्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा होत्या.’

तिची असाहाय्यता तिच्या शब्दातून जाणवत होती. एकाकी, अस्वस्थ. अस्वस्थ मानसिकतेतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न, मुलीकडे जाऊन राहण्याचाही तिने प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिच्या घरापासून जवळ असलेला हा महिलांचा वृद्धाश्रम निवडला. परंतु तिथेही एकाकीपणा तिची साथ सोडायला तयार नाही. तिला समर्पक जोडीदाराची आवश्यकता वाटते. परंतु कोणीही पुरुष जोडीदार म्हणून चालेल कसा?

ती एका सुखवस्तू, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. तिची स्वतःची आयडेंटिटी आहे. आता वय परतले, ती थकलीय. परंतु साथीदार म्हणून कोणीतरी असा हवा आहे- ज्याच्याशी ती सुसंवाद साधेल.

एकमेकांच्या सांनिध्यात छान दिवस घालवेल. अशा वयातही छान नाते निर्माण होऊ शकते. तरुण वयात दोन जीव एकत्र येतात, त्यावेळची आकर्षणे वेगळी असतात. शारीरिक सुखाची ओढ असते, परंतु उतारवयात केवळ साथीदारीण हवी असते, जी एकमेकांसोबत समजुतीने राहील. एकमेकांच्या जीवनात फार लुडबुड करणार नाही, परंतु सहजीवनाची आस धरेल.

पुस्तके वाचतील, आवडले तर वाचून दाखवतील, एकत्र टीव्ही पाहतील. टीव्हीवर काय पाहावे, ते दोघे मिळून ठरवतील. वाद झाला तरी प्रगल्भतेने सोडवतील... आणि जमले नाही तर फारशी खळखळ न करता वेगळे होतील.

दिवाळीच्या आठवड्यातच मला तिचा फोन आला. त्यामुळे मला तिच्या बोलण्यातील तीव्रता समजत होती. बाहेर दिवाळी सणाची धामधूम. वृद्धाश्रमात एक आकाशदिवा लावला, पणत्या पेटवल्या आणि फराळ एकत्र केला म्हणून दिवाळी साजरी होत नाही.

एकेकाळी तिने स्वतः घरात केंद्रभागी राहून दिवाळी सण साजरा केला. दिवाळी म्हणजे कौटुंबिक उत्सव, सारे कुटुंब जमा होणारे. शिवाय दूर-दूरचे नातेवाईक जमा होणार. हास्याचे फवारे, नवे कपडे, विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ, त्यामुळे उत्साहाला उधाण...आणि आज एकाकीपणाच्या अंधाऱ्या गुहेत दिवाळीच्या दिवशी तिला साथ करणारे कोणी नाही.

वृद्धांचे जे अनेक प्रश्न आहेत त्यात हा सहजीवनाचा प्रश्न प्रमुख बनला आहे. भविष्यात तो उग्र होत जाणार आहे. म्हणजे आत्ताच ज्येष्ठ नागरिकांचे वय वाढत आहे आणि पुढे एकटे जगावे लागणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. वृद्धाश्रमांचीही संख्या वाढेल.

आजच सधन, उच्च मध्यमवर्गासाठी किमान तीन वृद्धाश्रम गोव्यात आहेत. रामकृष्ण नाईकांनी ‘स्नेह मंदिर’ ही संस्था ४० वर्षांपूर्वी सुरू केली. तेव्हा किती विरोध झाला होता. एका नेत्याने तर त्यांना तुम्ही कुटुंब तोडायला निघाला आहात का, असे म्हटले तर दुसऱ्या एका डॉक्टर कार्यकर्त्याने ‘गोमन्तक’मध्येच लेख लिहून या विचारांची निर्भर्त्सना केली होती.

३०-४० वर्षांपूर्वी जो टीकेचा विषय होता व कुटुंबव्यवस्था बळकट ठेवणे आपणा सर्वांची आत्यंतिक गरज आहे, असे सर्वांना वाटत असे. सधन घरंदाज कुटुंबांना अद्याप वृद्धांना- आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे म्हणजे महापाप वाटत असे- तेथेच आज वृद्धाश्रमात जागा मिळवण्यासाठी गयावया करावी लागते.

देशात महानगरांमध्ये ती मोठीच निकड होऊन बनली आहे. पुण्यासारख्या शहरात तर वृद्धांची गरज ओळखून त्याप्रमाणे सेवा देणारे वृद्धाश्रम आहेत. तेथे जोडप्यांनाही राहण्याची व्यवस्था आहे. मुले शिक्षणासाठी व त्यानंतर व्यवसायानिमित्त देशाबाहेर गेलीत, तेथेच स्थायिक झालीत. तेव्हा अनेक जोडपी आधीच वृद्धाश्रमात जाऊन राहण्याचे निश्चित करतात.

अशा वृद्धाश्रमात वेगळी खोली किंवा सदनिकाही घेता येते. केवळ पैसा खर्च करण्याची तयारी ठेवावी. तेथे तुमच्यासाठी मोटारगाडीची व्यवस्था आहे. बाजारात खरेदीसाठी जाता येते. स्वतंत्रपणे किंवा इतरांसह सिनेमा-नाटकाला जाता येते. सहभोजन असते, मनोरंजनाचे कार्यक्रम ठरतात.

एका बाजूला असले सर्व सोयींनी युक्त वृद्धाश्रम, तर दुसऱ्या बाजूला आपण जो प्रश्न मांडत आहोत- ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा एकटे राहण्याचा प्रश्न. त्यावरही आता उपाय शोधण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यात ‘अनुरूप’ नावाची संस्था आहे. जी त्यांच्यासाठी विवाह जुळवण्याचे कार्य करते.

अर्थात पैसे आकारून. त्यात विवाहोत्सुक व्यक्तींचा परिचय, एकमेकांना दिला जातो. त्यांना अपेक्षेनुसार वधू-वर निवडता येतात. प्रत्यक्ष भेटता येते. अनेक वृद्धाश्रमांमध्ये ही नवदाम्पत्ये आनंदाने एकत्र राहतात. नवे मित्र-मैत्रीण बनवण्याचीही तेथे संधी असते. एकत्र भेटणे, सुखसंवाद साधणे, आनंदाचे क्षण एकत्र घालवणे व संमतीने एकत्र राहण्याचाही पर्याय निवडता येतो.

आता कुटुंबांनीही ही व्यवस्था स्वीकारली आहे. मुलेच आईवडिलांची दुसरी लग्ने लावून देतात. सुरुवातीला हे स्वीकारणे अनेकांना कठीण झालेले असेल. परंतु तो व्यावहारिक मार्ग ठरला, ज्येष्ठांनाही त्यात आनंद मिळू लागला आणि आपण दुसऱ्यांवर लादले जात नाही, दुसऱ्यांच्या संसारात ओझे बनत नाही, असे वाटल्यानंतर ज्येष्ठांनाही आनंदाने तो मार्ग स्वीकारावा लागला.

अनेक व्यावसायिक, विशेषतः चांगला पगार घेणारे ज्येष्ठ नागरिक आपल्या जोडीदाराची स्वतः निवड करतात. एखादी जुनी मैत्रीण किंवा बऱ्याच काळापासून ओळख असलेली एखादी व्यक्ती निवडताना सारे सुरळीत जमून येते. ओळखीच्या मित्र-मैत्रिणींमधून हा संवाद सुरू होतो आणि मने जुळली की आपोआप एकत्र राहण्याचाही पर्याय खुला होतो.

गोव्यात वृद्धाश्रम चालवणाऱ्या मंडळींशी मी चर्चा करू लागलो. कारण त्या बाईने माझ्याही मनात आपल्या अस्वस्थतेचे पिल्लू सोडले होते.

पुण्यात लग्न जमवणाऱ्या अनेक संस्था आहेत. कारण तेथे बऱ्याच काळापासून अशा प्रश्नासंदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे. मुले बाहेरगावी किंवा दुसऱ्या देशात गेली. कोणा एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकलकोंडे जगण्याची पाळी आली होती, मुलांनाही आपल्या पालकांनी सहचर शोधावा असे वाटू लागले व त्याला समाजमान्यताही मिळू लागली. समाजमान्यता का मिळाली, तर कुटुंबाची ती आत्यंतिक गरज बनली. सामाजिक चालीरीती व बंधने आपणच निर्माण करीत असतो. परंतु परिस्थिती माणसाला नवे पर्याय शोधायला भाग पाडते आणि हे पर्याय कालांतराने चालीरीतींचा भाग बनतात.

सुरुवातीला हे पर्याय समाजालाही कठीण बनले असतील. कारण कुटुंबांची प्रतिष्ठा त्यात गुंतली होती. त्यात जर या दाम्पत्याचे कशामुळे पटले नाही तर त्यांना कोण स्वीकारणार, त्या परत आल्या तर त्यांना कुठे ठेवणार?

या प्रश्नांचाही अभ्यास झाला. उतारवयात साथ देणारी व योग्य प्रकारे हे नवे नाते निभावणारी उदाहरणे तयार झाली. या प्रश्नावर आता जागतिक पातळीवर व देशातही लेखन झाले आहे. या प्रश्नाच्या खोलात जाऊन अभ्यास करणारी मंडळी देशात तयार झाली आहेत. ही मंडळी एकटेपणाचे जीवन जगणाऱ्यांशी संवाद साधतात, एका बाजूला त्यांचे समुपदेशन केले जाते.

त्यांना नवे छंद लावून घ्यायला सुचविले जाते. अनेकजण लेखनाकडे वळतात. अनुरूप व्यक्तींना पार्टनरही शोधून दिले जातात. आता अनेक वृद्ध मंडळी एकमेकांसोबत जीवन साधताना अधिकृतपणे विवाह करतातच असे नाही.

काही वर्षे एकत्र राहून पाहतात आणि जमले तर विवाहाचा पर्याय खुला राहतो. यामागचे कारण संपत्तीतील हिस्सा हासुद्धा आहे. उतारवयात कोणी लग्न केले तर कौटुंबिक संपत्तीत नवे भागीदार तयार होण्याची भीती मुलांना असते. त्या प्रश्नांबाबत वेळीच कायदेशीर तोडगा काढला जातो.

ज्यांना भरपूर पेन्शन आहे आणि आपल्या उतारवयातही दर्जेदार जीवन जगायचे आहे त्यांना तर अनेक पर्याय खुले आहेत. आता माणूस ९०-९५ पर्यंत जगत असतो. ८५पर्यंत तो शरीराने धडधाकट असतो, स्वतःचे सारे विधी स्वतः करू शकतो. त्याशिवाय व्यावसायिक कौशल्यही निभावत असल्यामुळे त्याला योग्य जोडीदार-जोडीदारीण लाभल्यास जीवनाचे भले होते.

विधुर-विधवा ज्येष्ठांशी सतत संपर्कात राहणाऱ्या संस्थाही आता तयार झाल्या आहेत. त्यांना एकटेपणाचे प्रश्न नेमकेपणाने ठाऊक असतात. हा आता महानगरे किंवा मोठ्या शहरांमध्ये प्रमुख सामाजिक प्रश्न बनला आहे.

अनेकांना आपल्या मुलांकडे जाऊन राहायचे नसते, छोट्या-मोठ्या कुटुंबव्यवस्थेत ज्येष्ठांचे स्थानही डळमळीत बनले आहे. विशेष म्हणजे अनेकांनी आपले द्रव्यही साठवलेले असते. आपली काळजी घेण्याइतपत पैसा साठवलेला असतो, त्यातल्या अनेकांना जीवनात नवा अध्याय सुरू करावासा वाटला, तर शहरातील संस्थांनी त्यांना अनुरूप वातावरण तयार करून दिले आहे.

एकेकाळी पत्नी वारल्यावर पुरुषांना अनेक पर्याय खुले असत. पत्नीच्या निधनानंतर जीवन कठीण असल्याचे सत्य सामोरे आले आहे. हा मानसिकतेचाही प्रश्न आहे. परंतु महिला मात्र त्यांच्या अंगीभूत मानसिकतेतून एकट्या राहू शकतात किंवा एकत्र कुटुंबात आपली स्वतःची कामे करीत राहण्याचे मानसिक बळ त्यांनी कमावलेले असते.

पुरुष म्हातारा झाल्यावर मुलांना त्याची उपयुक्तता संपलेली असते, त्यामुळे अनेकजण अडगळीतच पडतात. महिलांची गरज शेवटपर्यंत वाटते, कारण नातवांना सांभाळणे आणि घरातील कामे यामुळे त्यांची गरज शेवटपर्यंत टिकून राहते. जर या महिलांनाही स्वतंत्रपणे जगावेसे वाटत असेल- आणि आता तर अनेक महिला धीटपणे तसे बोलून दाखवू लागल्या आहेत- मग त्यांच्यासाठी पर्याय का खुला असू नये?

Elderly companionship, loneliness, senior citizen relationships, Goa social issues
India Canada Relations: ‘ते पुन्हा डोकं वर काढतायेत...’ भारतीय वंशाच्या खासदाराने खलिस्तान आणि ट्रूडो सरकारवर साधला निशाणा

मला त्या महिलेचा एका आठवड्यात तीनवेळा फोन आला आणि तिचे दुःख ऐकताना मला ते माझेच असल्यासारखे वाटू लागले. या महिलेची मुलगी आणि तिचा जावई तिच्याकडे लक्ष देत नाहीत, असे नाही. तिचा जावईही चांगला निघाला आणि तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो धावूनही येतो.

या महिलेच्या बहिणीही नामवंत कुटुंबामध्ये आहेत, अनेक मोठे उद्योगधंदे त्यांनी चालवलेले आहेत. परंतु या वास्तव कथेतील महिलेला त्यांच्यापैकी कोणाकडे आश्रित म्हणून राहायची इच्छा नाही. तिला पार्टनर हवा आहे, जो आपले सुख-दुःख समजून घेईल आणि जीवन आनंददायी बनवेल यासाठी.

Elderly companionship, loneliness, senior citizen relationships, Goa social issues
Sachin Tendulkar Video: 'तूच खरा हिरो...', सचिनने शब्द पाळला, अपघातात हात गमावूनही क्रिकेट खेळणाऱ्या अमीरची घेतली भेट

त्या दृष्टीने आपल्या कथेतील नायिका एक पर्याय उभा करू दाखवू पाहते. त्या दृष्टीने स्वतंत्रपणे जगू इच्छिणाऱ्या महिलांची ती आधुनिक प्रतिनिधी आहे. गोमंतकीय समाज जर आधुनिक असेल, तर तिचा प्रश्न आपल्याला आजचा प्रमुख सामाजिक प्रश्न बनवावा लागेल. भविष्यात हा महत्त्वाचा तीव्र प्रश्न बनणार आहेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com