Chimbel Protest: ..भूमिपुत्रांना अवसर येतो तेव्हा त्यांच्यात ‘राखणदार’ अवतरतो! चिंबलवासियांचा लढा आणि तोयार तळे

Chimbel Unity Mall Protest: चिंबलमधील लोक पेटून का उठले? एवढ्याशा तोयार तळ्याला वाचविण्यासाठी हा आटापिटा का? ज्या तळ्याचा वापर होत नाही, ते त्यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्‍न का बनते?
Chimbel Protest
Chimbel ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

चिंबल हे पणजीचे उपनगर बनले आहे, परंतु उपनगर म्हणून ते विकसित करण्यास कोणाला स्वारस्य नाही. एकेकाळी काँग्रेस राजवटीत पणजीतील ‘कचरा’ बाहेर फेकण्यासाठी या खेड्याचा वापर करण्यात आला. तेथे काही २०० झोपड्या, एका केंद्रीय कार्यक्रमांतर्गत चिंबलला स्थलांतरित करण्यात यावयाच्या होत्या. प्रत्यक्षात साऱ्या गोव्याची खरूज तेथे अवतरली. आज चिंबलचे अनेक सुपीक डोंगर - जेथे आदिवासींची काजू बागायती होती, मळे होते त्यांनी अक्षरशः अपहृत केले आहेत.

जेथे झोपडपट्टी अवतरणार होती, तेथे आदिवासींना कोणी विचारलेही नाही. आजही जेव्हा सरकारला ‘युनिटी मॉल’ येथे उभारलेला हवा आहे, तेव्हा पंचायतीचा हात पिरगळून तेथे तो आणण्याची सक्ती करण्यात आली.

गोव्यातील पंचायतींना कोण विचारतो? सरपंच, सचिव ही सरकारच्या हातातील प्यादी झाली आहेत. परंतु चिंबलचे आदिवासी चिवट! ते खरोखरीच पेटून उठले. ते तेथील जि. पं. सदस्याच्या घरावर मोर्चा घेऊन गेले हे समजू शकते; परंतु ते मोर्चा घेऊन आमदार रुडॉल्फ फर्नांडिसच्या घरावर चाल करून गेले.

रुडॉल्फला आव्हान देणे कोणाला जमेल काय? परंतु आदिवासींचे पुढारी, विशेषतः महिला वर्गाने रुडॉल्फच्या नावाने अक्षरशः शबै घातला. रुडॉल्फची रात्रीची झोप उडाली असेल.

कारण आदिवासींची झोप अनेक वर्षे सरकारच्या तथाकथित विकासाने उडवली आहे. विकासाच्या नावाने त्यांच्या जीवनावर टाच आली. त्यांच्या जमिनी हिरावून घेण्यात आल्या. ते आपल्याच भूमीत परके झाले. आता सरकार म्हणे ‘युनिटी मॉल’मध्ये त्यांना रोजगार देणार आहे.

गोव्यातील कुठल्या मॉलमध्ये गोमंतकीय काम करतो? त्यांना लागणाऱ्या मुली सावंतवाडी-कोकणातून येथे येतात. सुरुवातीला मॉल येईल. त्यानंतर रस्ते आणखी रुंद होतील. आणखी गृहनिर्माण प्रकल्प येतील. आदिवासींच्या तोंडावर नोटांची काही बंडले फेकून त्यांना तेथून पिटाळण्यात येईल. ते केवळ आपल्या जमिनीपासून तोडले जाणार नसून संस्कृतीपासूनही तुटले जातील म्हणून त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे.

चिंबलमधील आदिवासी तेथे गेली ३०-३५ वर्षे ‘खुदताना’ मी पाहिला आहे. हा मूळ पुरुष अस्वस्थ आहे. त्यांचे डोंगर व शेती-बागायती हिरावून घेतल्यापासून तो तेथे अंग चोरून जगतो.

चिंबलमधील त्यांचे अस्तित्व नावाला बनले आहे. त्यांचे राजकीय वर्चस्व कमी तर झालेच; शिवाय सांस्कृतिक-सामाजिक अस्तित्व कड्याच्या टोकावर आणून उभे केले आहे.

ही गोष्ट आज राज्य सरकारच्या लक्षात आली नाही तर पुढे त्यांना जबरदस्त महागात पडणार आहे. गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ-मेळावली येथील आदिवासी असेच भडकले होते. आयआयटीच्या नावे राज्य सरकारने विकासाचे नवे ‘फॅड’ घेतले. भले असतील हे डोंगर व मळे सरकारच्या नावावर; परंतु त्यांच्यावर अनादी काळापासून आदिवासी वर्ग गुजराण करीत आला आहे.

आयआयटीत म्हणे सरकारी रोजगार उपलब्ध होणार आहे; मात्र जमिनीला घट्ट धरून राहिलेला आदिवासी आपली संस्कृती का सोडून देईल? त्यांच्या जमिनी, तेथे त्यांच्या पूर्वजांची पूरलेली नाळ, या डोंगरावर असलेले त्यांचे ओबडधोबड देव, त्यांची संस्कृती, त्यांचा धालो आणि जागर...

चिंबलमध्ये भाटकाराच्या नावे त्यांनाही कधी काळी धर्मांतर करायला भाग पाडले गेले, तथापि त्यांनी जमिनीशी असलेले नाते सोडले नाही. धर्म बदलूनही त्यांच्या स्थितीत फरक पडला नाही. त्यानंतर पोर्तुगीज आमदानीतच त्यांना पुन्हा महाराष्ट्रातून आलेल्या मसुरकर स्वामींनी हिंदू धर्मात आणले. तरीही त्यांचे जीवन बदलले काय?

धर्माचे राजकारण गोवा गेली ४५० वर्षे पाहातो आहे. धर्माने काहींचे ईप्सित साध्य केले, विखार वाढवला; मात्र गरीब, आदिवासींना भरडूनच काढले. धर्म दोनदा बदललेल्यांची तर उपेक्षा आणि हालअपेष्टाच झाली. आजही ‘हिंदूंच्या राज्यात’ या हिंदू धर्मात नांदणाऱ्या चिंबलच्या आदिवासींना जर अस्तित्वाची लढाई जीव तळहातावर घेऊन लढावी लागत असेल तर त्यांच्या नव्या जीवनाला काय अर्थ?

त्यांचा सूर्य कुठे आहे? त्यांना जो ‘धर्म’ दिलेला आहे, तो मेल्यानंतर ‘स्वर्ग’ कसा प्राप्त होईल, हे सांगतो. जिवंत असताना ‘स्वर्ग’ कसा मिळेल हे सांगत नाही. त्यांचा स्वर्ग हिरावून घेण्यासाठीच तो त्याला दिलेला तर नाही?

मला गोविंद शिरोडकर यांच्याएवढीच चिंबलची ओढ आहे, म्हणून त्याच कळवळ्यातून लिहिले आहे. कारण माझा जन्म चिंबलचा.

आईचे पितृछत्र अत्यंत कोवळ्या वयात हरपले. तिची आई काही दिवस आपल्या भावाकडे जाऊन राहिली; परंतु त्या स्वभिमानी मातेने शेवटी चार छोट्या मुलांना घेऊन चिंबलला वास्तव्य केले. लोणची आणि छोटे-छोटे जिन्नस बनवून आपला चरितार्थ चालवला. हे आदिवासीच तिचे गिऱ्हाईक. आदिवासी आपल्या मळ्यातून भाजी, मासळी आणून देत. त्याबदल्यात वस्तू घेत.

मी सुट्टीत हमखास चिंबलला. तेथील मंडपातील नाटके, जागर, डोंगरावरील मळे - जेथे आता गोव्यातील एक मोठी झोपडपट्टी आहे, तेथे मी खेळलो आहे. कंदमुळे वेचली आहेत. माझ्याच वयाच्या गोविंद शिरोडकरसोबत चादरीचे पडदे करून नाटके केली आहेत. त्याच्याबरोबर शेतात मी फुटबॉल खेळलो आहे. याच गोविंदने मला रुचकर ‘घोटे’ आणून दिली आहेत.

त्याच्याच सवंगड्यांबरोबर मी डोंगर पालथे घालताना तेथे झुडपांमध्ये बुलबुल पक्ष्याने केलेली घरटी पाहिली आहेत. त्यांनी घातलेली अंडी, त्यानंतर त्यातून बाहेर येणारे लहान जीव, त्यांचा चिवचिवाट अजून माझ्या कानात रुंजी घालतो. कंदमुळे गोळा करताना काटे लागून हाता-पायातून आलेले रक्त, तेथील मधुर काजू मुट्ट्यांतून मिळणारा निरा...

आज चिंबलमधील डोंगर गेले आणि तेथे बीभत्स झोपडपट्टी उभी झाली. तेथे बाहेरच्यांची, मुस्लिमांची वस्ती वाढली. त्यांचे पंच जिंकून येतात. विकासाची ही फळे आहेत. आधी ते ‘लमाणी’ नाव लावत. आता त्यांचे वंशज ‘नाईक’ लावतात.

जुवारीनगरातील त्यांचा नेता पिल्ले जेव्हा निवडणूक लढण्याची भाषा करतो, तेव्हा आपल्यापैकी अनेकांना राग येतो; परंतु पिल्ले हा विकासाच्या आपल्या संकल्पनेला आलेले फळ नव्हे काय? झुआरीनगरच काय, कोणत्याही औद्योगिक वसाहतीत जा. त्यांनी आसपासची सारी गावे आपल्या पंजात घेतली आहेत.

कुंडईतील जमीन संपादन करताना तेथील गरिबांना विकासाचेच तर स्वप्न दाखवण्यात आले होते. आता ‘भोम’ या गोव्यातील मूळ गावात तुम्ही गेलात तर पत्ता शोधायला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. बांबोळी पठारावर गोवा विद्यापीठ आले तेव्हा तेथील मूळ गावडा-आदिवासींना केवढे मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते? तेथे त्यांचे मळे होते, स्मशानभूमी होती, देव होते. विद्यापीठाने त्यांचा किती ‘विकास’ केला?

आपल्या देशाला अजून ‘विकासा’ची व्याख्या करता आलेली नाही. ५०-६० वर्षांपूर्वी अमेरिका आपला आदर्श होता. आजही आहे. अमेरिकेत आज जे वैभव आहे ते सर्व दुबळ्या कमकुवत देशांना फसवून उभे केलेले आहे. आपल्याही विकासाचा पाया तपासून पाहा. तेथेही फसवणूक, लुबाडणूक, अन्याय, पाप यांचीच भुते नाचताना दिसतील.

त्यामुळे चिंबलमधील आदिवासींना त्यांचा ‘विकास’ हा ढोंगी, दांभिक वाटला, तर त्यांचे काय चुकले? तो गेला महिनाभर रस्त्यावर उभा आहे. उन्हातान्हात करपतो आहे आणि उन्हातान्हात तो खुदतो. तेव्हा त्याला मंत्री विचारतात, तुम्ही ज्या तोयार तळ्याच्या रक्षणाची भाषा करता त्याचा वापर का केला जात नाही?

वास्तविक, हे तोयार तळे त्यांच्या आंदोलनाचे, अस्तित्वाचे प्रतीक आहे. कारण ते या तळ्याला चिंबलच्या कापून टाकलेल्या डोंगरांचे प्रतिक मानतात. या डोंगराच्या मुळातून मोठा ओढा जायचा.

त्याचे मुबलक पाणी वर्षभर पुरायचे. पणजीचे सारे धोबी चिंबलला होते. तेथे त्यांचे पांढरे शुभ्र धुतलेले कपडे, चादरी वाऱ्यावर हलताना दिसायच्या. माझ्या लहानपणातील हे चित्र नेहमी सजीव होऊन अजूनही माझ्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचते.

वास्तवातला गोवा मला त्या चित्रात दिसतो. आपला रसरशीत-जिवंत गोवा आणि विकासाच्या नावाने लुटलेला गोवा. गोवा मुक्त झाला. घटक राज्य मिळाले. नेत्यांना जमिनी लुटण्यासाठी कायदे करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले. हे राजकारण, अर्थकारण सामान्‍यांना नाडते, लुटते. आपल्या खाण धंद्याने तेच केले.

संपूर्ण ग्रामीण भागांवरून नांगर फिरवला. कोणाचा विकास झाला? या खाणचालकांनी चालविलेल्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये कितीसे आदिवासी दिसतात?

पुंडलिक नायक यांच्या ‘अच्छेव’मध्ये हे चित्र हुबेहुब उभे केले आहे. काजू-बागायती, ग्रामीण संस्कृतीत रममाण असलेल्या भूमीची कशी ससेहोलपट केली जाते, समाज देशोधडीला लागतात, मुलींना देहविक्री करावी लागते... आदिवासींचे काय वेगळे झालेय? म्हणूनच ‘युनिटी मॉल’ हा जर त्यांच्या जीवनावरचा शेवटचा आघात असे त्यांना वाटत असेल आणि ते जर विद्रोह करण्याच्या तयारीत असतील तर त्यांचे काय चुकले?

विकास तुम्हाला हवा आहे ना? मग तो आम्हाला विचारात घेऊन का होत नाही? आमच्या गावात येऊन तुम्ही त्याबद्दल संवाद का केला नाही? विकासाची खरी व्याख्या काय म्हणते?

समाजात जे कोणी आहेत, ते या विकासाचे भागीदार असायला हवेत, त्यांचाच विचार घेऊन विकासाचा पाया उभारायला हवा. परंतु सरकारच्या ‘सबका विकास’मध्ये आदिवासी येत नाहीत. कारण त्यांना सरकार अजून ‘अनाडी’ मानते. विकासाला वेग असतो असे सांगून ते त्यात सामील होऊ शकणार नाही, असे उत्तर दिले जाते.

Chimbel Protest
Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

परंतु ज्या वेगाचे, स्पर्धेचे कारण दिले जाते, त्या मार्गाने जायचे तर विकास घडवायला आधी ‘विनाश’ करावा लागतो. म्हणजे आधी संपूर्ण गोवा नष्ट करायचा. आदिवासी नष्ट करायचे. मग एकूणच माणसे! या विकास नावाच्या नष्टचक्रात गोमंतकीय समाजाला स्थानच नाही.

स्थान आहे ते दिल्लीला आणि तेथील पुंजीपतींना. ते गोव्याचे काय ते निश्‍चित करणार आहेत आणि तेच तेथे दुसरे घर निर्माण करणार आहेत. त्यांना तळ्यांचे महत्त्व नाही. तोयार तळे, आदिवासी, ग्राम्य जीवन त्यांच्या खिजगणतीतच नाही. त्यांना पंचतारांकित हॉटेले, ऐषआरामी जीवन, उंची खाद्यपदार्थ आणि पेये - शिवाय नाईट क्लब!

Chimbel Protest
Chimbel Unity Mall: 'चिंबल युनिटी मॉलमुळे कोणताही धोका नाही'! मंत्री खंवटेंची ग्‍वाही; अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा प्रकल्प असल्याचा दावा

जास्तीत जास्त आदिवासींची लोकगीते आणि नृत्ये यांची मजा ते चाखतील. सरकार म्हणते तो विकास हा असा आहे. परंतु आदिवासींशी त्यांची आता गाठ आहे. आम्ही पांढरपेशा समाजाने विकासनीतीचे थेर सहन केले. त्यांच्या अर्थनीतीवर विश्‍वास ठेवला. ते ठेवत नाहीत, कारण त्यांनी भूमीला धरून ठेवलेय, त्यांचा खरा धर्म - देव या भूमीत आहे. म्हणूनच रागाने पेटून शेळ-मेळावलीतील आदिवासी महिला कोयते घेऊन पोलिसांना मारायला धावून गेल्या.

डोक्यावरून पाणी जाते तेव्हा त्यांच्या ‘जागोरातील’ राखणदार प्रत्यक्ष त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. ते देव अवतीर्ण होण्याची वाट पाहत नसतात. या भूमिपुत्रांना अवसर येतो तेव्हा त्यांच्यात ‘राखणदार’ अवतरतो...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com