

छत्रपती संभाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता. संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसांत २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. इथं १६८३च्या गोव्याच्या मोहिमेदरम्यान, पोर्तुगीज गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी टाव्होर काउंट डी आल्वोर यांनी बार्देशमधील संरक्षण सुधारण्याचे आदेश दिले होते.
कोलवाळ आणि थिवीच्या स्थानांमधील किल्ला तसेच थिवीच्या दक्षिणेस तटबंदी बांधण्यात आली होती. या सर्व स्थानांना खंदक असलेल्या भिंतीने जोडले गेले होते. पोर्तुगिजांनी गोवा शहराच्या(सध्याचे जुने गोवे)सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोर याने बऱ्याचशा तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहीत होते की गोव्यात शिरून पोर्तुगिजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल.
मुघल व मराठे यांच्या लढाईत संभाजी राजांचा खात्रीने पराजय होईल, असे पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरला वाटत होते. पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. पोर्तुगिजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.
संभाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता. फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर संभाजी राजे पन्हाळ्यास जातील अशी पोर्तुगीज गव्हर्नर काउंट द आल्व्होरची समजूत होती.
पोर्तुगिजांनी मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी दिली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकणात जाणार होते. ही मदत थांबावी म्हणून संभाजीराजांनी आपले सैन्य गोव्याच्या परिसरात नेले होते. गोव्याचा गव्हर्नर काउंट दि अल्वोर याला मराठ्यांनी पूर्ण जेरीस आणून सोडले होते. त्यातच २४ नोव्हेंबर १६८३ रोजी संभाजी महाराजांनी गोवा शहराच्या(सध्याचे जुने गोवे)बाहेरील वरच्या सांतइस्तेव किल्ल्यावर हल्ला केला आणि बेसावध पोर्तुगिजांना काही समजायच्या आतच जुवे किल्ला ताब्यात घेतला.
यामुळे मध्ये फक्त मांडवी नदी आणि पलीकडच्या तीरावर राजधानी गोवे शहर अशी आणीबाणीची परिस्थिती पोर्तुगिजांवर आली. दुसऱ्या दिवशी २५ नोव्हेंबर १६८३ रोजी सकाळी पोर्तुगीज प्रतिकारासाठी जुवे किल्ल्यापाशी आले, पण नेहमीच्या गनिमी काव्याने मराठ्यांनी त्यांना चकवून कचाट्यात पकडले. पोर्तुगिजांची इतकी वाईट अवस्था झाली की ३०० सैनिकांपैकी एकही सैनिक धड अवस्थेत नव्हता. स्वतः पोर्तुगीज गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी टाव्होर मरायचा वाचला.
पोर्तुगीज पळत सुटलेत हे पाहून गोवे शहर ताब्यात घ्यावे म्हणून, संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगिजांवर हल्ला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचविले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते.
काही मराठा सैन्य साष्टीत साळ नदी काठी ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता साष्टी आणि बार्देशवर हल्ला केला आणि पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाला तीन बाजूंनी घेरले. आता फक्त तिसवाडी तालुकाच पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिला होता. पण सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य घेऊन शाह आलम कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजांना परत जावं लागलं.
जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत, कोकणात उतरणार तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराज निवडक लोकांची बैठक घेणार होते. त्यात कविराज कलशही हजर होते. जानेवारी १६८९मध्ये, संभाजी राजे आणि कवी कलश त्यांच्या माणसांसह विशालगडावरून अंबा घाटामार्गे रायगडकडे निघाले. शेख निजाम मुर्कर्बखानाला माहिती मिळाली की ते संगमेश्वर येथे थांबणार आहेत आणि १ फेब्रुवारी १६८९ रोजी त्यांच्यावर हल्ला केला गेला.
मालोजी घोरपडे यांनी आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आपले प्राण दिले. घात झाला. संगमेश्वरी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हादेखील संभाजी राजांसोबतच होते. तेदेखील लढता लढता महाराजांच्या सोबत कैद झाले. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यास लावून आपला मांडलिक होण्यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असे बादशहाला वाटत होते.
त्याने कलशाला वेगवेगळी आमिषे दिली. पण कविराज बधले नाहीत. संभाजी महाराजांसोबत त्यांंचेही अतोनात हाल करण्यात आले. स्वराज्य धर्माचे रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा तुळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीशेजारी कविराज कलश यांचीदेखील समाधी दिमाखात उभी आहे.
सर्वेश बोरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.