History: चौफेर शत्रू अन् शंभूराजांची 'रणनीती'; गोव्यात स्वतःचा दारूगोळा कारखाना उभारून शत्रूला नमवलं!

Chhatrapati Sambhaji Maharaj Goa Campaign: संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी झाला. म्हणजेच त्यांच्या राज्यारोहणाला आज साडेतीनशे वर्षे होत आली. पण, दुर्दैवाने इतिहासाने त्यांची अनेक वर्षे बेअदबीच केली. त्यांच्या खऱ्या बाजूवर प्रकाश टाकणारा हा लेख..
Chhatrapati Sambhaji Maharaj Goa Campaign
Chhatrapati Sambhaji Maharaj Goa CampaignDainik Gomantak
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी झाला. म्हणजेच त्यांच्या राज्यारोहणाला आज साडेतीनशे वर्षे होत आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यापासून मोंगलशाही, कुतुबशाही, आदिलशाही यांना जरब बसवण्याचे, स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकीयांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले.

पोर्तुगिजांनी गोव्यात चालवलेल्या धर्मछळाला आणि हिंदूवर होत असलेल्या जुलूम जबरदस्ती अन्यायाला काबूत आणण्याचा यशस्वी प्रयत्न संभाजी महाराजांनी केला. हे सारे सूर्यप्रकाशाइतके सत्य असूनही काही घरभेदी लोकांनी विशेषत: मल्हार रामराव चिटणीस हिंदूद्वेष्टे खाफीखान, मुस्सैदखान आणि पोर्तुगीज, इंग्रज, डच या परकीयांनी सत्येतिहास बाजूला सारून आपल्याला हवा तो इतिहास पुढे केला. यात छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहननही करण्यात आले.

नव्या स्वराज्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. त्याची सर अर्थातच या राज्याभिषेकाला नव्हती, तरीसुद्धा हाही कार्यक्रम एकूण भव्य असा होता.

Chhatrapati Sambhaji Maharaj Goa Campaign
Goa PSI Recruitment: पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात! 800 मीटर धावण्याच्या चाचणीवर आक्षेप, न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी सर्व जुने अपराध क्षम्य करून अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अटक करण्याचे कारस्थान केले त्यांनासुद्धा पूर्वीप्रमाणेच सन्मान पदे दिली. पण त्याचबरोबर आपल्याला जिवानिशी ठार करू पाहणारे आपलेच लोक आहेत हे सिद्ध होताच त्यांनी प्रमुख कटकऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार केले. यात अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी आदींचा समावेश आहे.

आपल्या पावणेनऊ वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे शंभर छोट्या-मोठ्या लढाया त्यांनी केल्या. अनेक भागात त्यांनी जबरदस्त आक्रमकता अवलंबिली. शत्रूपक्षाचा जास्तीत जास्त विध्वंस करणे, रसद तोडणे, पाण्यात विष कालवून शत्रूसेनेची हानी करणे आणि अनेक सेना एकाच वेळी अनेक ठिकाणी लढविणे हे त्यांचे युद्धतंत्र होते.

मोगल हे महाबलाढ्य शत्रू, पोर्तुगीज हे पाताळयंत्री व गोव्यात मुक्काम ठोकून असलेले वैरी, सिद्धी हा औरंगजेब व पोर्तुगीज या उभयतांच्या सहकार्याने व समुद्रात शक्तिमान असलेल्या दुश्मन यांची पूर्ण खूणगाठ बांधून या साऱ्यांशी त्यांना सामना करावा लागला. त्या काळात पोर्तुगिजांचा गोवा या दक्षिणेतील प्रदेशाप्रमाणेच उत्तरेकडील वसई, तारापूर इत्यादी भागातही दबदबा होता. त्यांच्याजवळ प्रशिक्षित सैन्य, आरमार आणि भरपूर संपत्ती होती. संभाजीराजे सत्तेवर येताच त्यांनी गोव्यात आपला वकील पाठविला व प्रथम मैत्रीचा संबंध जोडला.

त्यानंतर १६८२मध्ये त्यांनी डिचोली येथे दारूगोळ्याचा कारखाना उभारला. त्यासाठी तोफा, गंधक वगैरे साहित्य कर्नाटक व मलबारहून समुद्रमार्गे आणायची व्यवस्था केली होती व त्यात पोर्तुगिजांनी अडथळा आणू नये, अशी विनंतीवजा धमकी दिली होती व वेळ येताच संधी साधून डिचोली, बार्देश, फोंडा, भागात त्यांनी कशी दाणादाण उडविली हे आपणास माहितीच आहे.

खरं तर, परकीय पोर्तुगिजांची कीड कायमची नेस्तनाबूद करायची छत्रपती शिवाजी महाराजांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या इराद्यानेच संभाजीराजांनी गोव्याकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी पोर्तुगिजांना जबरदस्त आव्हान देऊन मग २ जानेवारी १६८४ रोजी ते रायगडकडे रवाना झाले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांचा धसका पोर्तुगिजांनी शेवटपर्यंत घेतला होता.

Chhatrapati Sambhaji Maharaj Goa Campaign
Goa PWD: पीडब्ल्यूडीमधील 'ती' पदोन्नती बेकायदेशीर; सरकारला नोटीस, अधिकारांचा गैरवापर केल्‍याचा मुख्य अभियंत्यांवर आरोप

टीचभर राज्याचा, बोटभर ताकदीचा हा वीतभर तरुण आपल्या विस्तृत राज्याला बेजार करू शकतो, ही कल्पनाच औरंगजेबाला सहन होत नव्हती. शंभूराजांना भारी पडतील, असे शेपन्नास सरदार त्याच्या हाताशी होते. मराठी सेना बघता बघता चिरडून टाकीन, अशी सात लक्ष सेना त्याच्या दिमतीला होती. अब्जावधी रुपयांचा खजिना त्याच्या दिमतीला होती. पण त्याचे सारे उपाय तोकडे पडत होते.

उलट संभाजी महाराजांचे अनेक सरदार स्वत:च्या कर्तृत्वावर वेगवेगळे भाग लढवीत होते. पण औरंगजेबाच्या म्हणण्याप्रमाणे या शिवाने -संभाने म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज या पिता-पुत्रांनी त्याला कायमचाच धडा शिकवण्याचा विडा उचलला होता आणि त्यासाठी ते प्राणपणाने लढत होते. शेवटी संभाजी महाराजांना फंदपितुरीने पकडून त्यांचे हाल हाल करून मारण्याचा पुरुषार्थ त्याने साधला होता. संभाजी महाराज या महान युवनायकाला मन:पूर्वक विनम्र अभिवादन!

- शंभू भाऊ बांदेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com