कालापूरची पर्यावरणीय साखळी का तुटली?

Bondvol Lake History Calapur Santa Cruz: मीठ पिकवणारे आमचे पूर्वज शिकले नव्हते, पण त्यांच्या मेंदूत कष्टाची विद्या आणि सत्याची आस होती. म्हणून त्यांनी माणसाच्या गरजेच्या वस्तूचा शोध लावून आपले मीठ बाहेरच्या देशात पाठवले. गोवा स्वातंत्र्यानंतर ही मिठागरे ओस पडलेली पाहावी लागतात.
Bondvol Lake History Calapur Santa Cruz
Bondvol Lake History Calapur Santa CruzDainik Gomantak
Published on
Updated on

पणजीपासून दोन तीन किमी अंतरावर कालापूर गाव कदंब पठाराच्या कुशीत वसला आहे. पूर्वी कालापूर गावातून शिरदोन, आगशीला जाण्यासाठी पायवाट होती. कालापूर गावात पाय ठेवताच माड, आंब्याच्या बागायतीची सावली तापलेल्या देहाला थंडावा द्यायची. या गावातील कृषीसंस्कृती तिथल्या बांबोळी पठारावरील बोंडवेल तळ्याच्या पाण्यावर टिकली आहे. त्या गावातील तलावाच्या परिक्रमेसाठी तिथले भूमिपुत्र जुजे विन्सेंट फर्नांडिस आणि पांडुरंग पेरेरा यांची भेट घेतली. तिथली कृषी आणी गोड पाणी पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. या गावात हिंदू-ख्रिश्‍चन धर्मीयांचा मिलाफ पाहावयास मिळतो.

येथील बोंडवेल तळ्याच्या इतिहासाचा शोध घेतल्यास हजारभर वर्ष मागे वळून पाहावे लागेल, तलावाच्या पूर्व बाजूने ऑल इंडिया रेडिओ कार्यालय, पश्चिमेला ‘सोऱ्याची कोळमी’, उत्तरेला श्रीशांतादूर्गा देवालय आणि दक्षिणेला काकरा भाग. ‘बोंडवेल तलावाच्या बांधकामास तिथल्या शेतकरी भूमिपुत्रांनी आठशे नऊशे वर्षांपूर्वी श्रमदानाने काम करण्यास सुरुवात केली होती’, असे फर्नांडिस म्हणाले. त्यावेळी तलाव उभारणीचे काम करताना त्यांना मजुरी मिळत नव्हती. घरातील पेज, शीत जेवून ते काम करीत होते.

नंतरच्या काळात पोर्तुगिजांनी साष्टी, तिसवाडी, आणि बार्देश जिंकून आपली हुकूमशाही राजवट चालवली. तलावासाठी काम करणाऱ्या कैक पिढ्यांनी भगिरथ प्रयत्न करीत जगाचा निरोप घेतला, पण तलाव पूर्ण झाला नाही. ही बातमी पोर्तुगीज सरकाराच्या कानी पडताच त्यांनी तलावाचे थांबलेले काम हाती घेऊन पूर्ण करून तिथल्या कृषी क्षेत्राला चालना दिली. अंदाजे शंभर-दीडशे मीटर लांबीचा बांधलेला पोर्तुगीजकालीन बांध आज पावेतो सुरक्षित आहे. त्यातले पाणी खालच्या भागातील विहिरींसाठी मोठा जलस्रोत आहे. बांधाच्या कडेतून तलावातील पाण्याचा पाटाने शेतीस पुरवठा झाला आहे.

आज बांबोळी पठारावर गोवा विद्यापीठ आणी अनेक सरकारी प्रकल्प उभे झाले आहेत. लोकवस्तीचे मेगा प्रकल्प आणि बंगले उभारून पठार कॉंक्रीट जंगलांनी भरून गेले आहे. बांबोळी पठाराची निर्मिती जांभ्या दगडाने झाली आहे. कातळाच्या खाचामध्ये रानमेवा आणि औषधी वेली, वृक्ष फिरताना पाहावयास मिळतात. सावर, पंगारा, कुमयो, मोय, सातीण, अर्जुन, खैर, बोर, हुसकी, अमृतवाल, वाघचाफा, कुडा, भेसड, हासळ, पिटकळ, निवडुंग, कणेर, गुंजी, खोले, कात्रेवाल, चुरन, करवंद, गेळ, हरकूली, फागुल, घोष्ट, गोडशेरा गोडवाल, चानीवाल, पालकाणे, खरवत अशा औषधी झाडांनी बांबोळी पठार भरला होता.

पठाराच्या परिसरात फिरताना अनेक प्रकारचे गवत पाहावयास मिळत होते. त्या पठारावरील कंद, फुले, फळे, हिरवे गवत पक्षी आणि रानटी जनावरे खाऊन पर्यावरण-साखळी व्यवस्थित चालत होती. पावसाळ्यात लुतीचे कोंब खाण्यास साळिंदर, रानडुक्कर वावरत होते. उगवलेले हिरवे गवत ससे खात होते. त्यांना खाण्यास कोल्हे दबा धरून राहायचे. नागसर्प, धामण, मंडोळ, घोणस, फुरसे, रक्त-मांडोळ पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले खाण्यास खाचखळग्यात लपून राहायचे. घोरपड झाडावरील आणि वारुळातील मुंग्या खात होती.

Bondvol Lake History Calapur Santa Cruz
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

मुंगूस सापाचा शोध घेत होते. संध्याकाळ होताच काळे मांजर, ससे, डुक्कर, कोल्हे पाणी पिण्यास बोंडवेल तळ्यावर यायचे. अशा प्रकारे पठारावर पर्यावरण-साखळी तयार होऊन तिथला प्राणवायू माणसाला मिळायचा आणि कार्बन वायू झाडांना मिळून बांबोळी पठार हिरवा दिसायचा. आज त्या पठाराची पर्यावरण-साखळी तुटत चालली आहे.

बांबोळी पठाराला उत्तर आणि दक्षिण दिशांनी अरबी समुद्री वारे सदोदित मांडवी आणि जुवारी नद्यांच्या मुखातून वाहत राहिल्याने, पठाराखालच्या दोनापाउल, आयवान, ताळगाव, कालापूर, मेरशी, चिंबल, भाटी, आगशी, सातान, कुडका, शिरदोण काकरा भागातील शेती आणि बागायतीला भरघोस पीक मिळते. कालापूर गावाला, सांताक्रूझ हे दुसरे नाव आहे. कालापूर ताळगाव, मेरशी आणि चिंबल गावची खाजन शेती मांडवीच्या मुखाकडे पसरलेली पाहावयास मिळते.

मानवाने जरी महसु्ली सीमा ठरविल्या तरी या चार गावांची कृषीसीमा अरबी समुद्र बांबोळी पठार आणि मांडवी नदीने पुसून भलीमोठी एकच शेती नजरेस पडते. पूर्वेला मांडवी आणि रायबंदर, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि मांडवीचे मुख, उत्तरेला मांडवीचे लांबरुंद पात्र आणि दक्षिणेला लांब पठार, अशा विशाल सीमेच्या क्षेत्रातून सांतीनेज, रुआदओर, मेरशी आणि चिंबल या चार लांब खाड्यातून पठारावरील पावसाचे पाणी मांडवीच्या मुखाकडे जाऊन समुद्री जैवसंपदा मांडवीच्या खार्‍या आणि गोड्या पाण्यात जन्म घेते.

त्या चारही खाड्यांत शेवटा, काळुंद्र, खरचाणी, पालू, शेतुक, तामसा, वागी, झिंगे, खेकडे, खुबे, कालवे जन्म घेतात, मांडवीच्या मुखाकडील समुद्रात पेडवा, धोडयार, बांगडे, बाळे, सांगट, लेय, झिंगे, खेकडे तारले ही सागरी मासळी करंझाळे भागात रापणकार पकडतात. कालापूरच्या बोंडवेल तळ्यातील पाण्यावर रेताळ जमिनीत रताळी, कांदा, मिर्ची, कलिंगड, वाल, भेंडी, वांगी आणि इतर भाजीचे मळे घालून पीक घेत होते. खाजन जमिनीत पावसाळ्यात करंगुट, आजगा, बेळा, मुणे, खोचरी भात बियाणी पेरणी करून भाताचे पीक काढीत होते.

त्या पिकाचे उकडे तांदूळ करून सकाळी पेज आणि दुपारी भाताबरोबर मळ्यातील भाजी आणि खळीतील रुचकर मासळीचे कालवण खायचे. त्यांनी कष्ट करीत कालापूर गाव हिरवळीने सजवला होता. मानकूर, मालदेस, अखणा, मांगीलाल, मुसराद, फेर्नाद, कुलास, पायरी, साकरीन अशा कैक जातीचे आंबे कालापूर गावातील बागायतीत पाहावयास मिळत होते. रेताळ जमीन असल्याने माडाला भरपूर नारळ मिळायचे. जास्त नारळ लागलेला माड उन्मळून पडण्याचा संभव असल्यास वडाची अगर भेंडीच्या झाडाची फांदीचा टेकू लावायचे. तिथला भूमिपुत्र नारळाच्या झाडाचा रस काढून दारू बनवत. त्याला रेंदेर म्हणायचे, माडाचा रस पदेर लोक उंडा (ब्रेड) बनविण्यास वापरीत होते.

Bondvol Lake History Calapur Santa Cruz
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

बोंडवेल तळ्याचा उगम बांबोळी पठारावर होऊन त्याचे पाणी पाटाने देऊळवाडा, व्हडले भाट, धाकटे भाट या भागांना पुरवठा करून पुढे बांध आणि पाडीमाड्डीर यांच्यामधील व्हडल्या तळ्यात जाऊन तिथल्या शेताला पाणी पुरवते. त्या पुढे प्रवासात तळ्याच्या बोगद्यातून (कान) मधल्या तळ्यात जाऊन पुढच्या शेतीला पाणी पुरवत, शेवटी धाकट्या तळ्यातून खळीत जाते. गोड पाण्यात थिगुर, देरवळा, वाळेर, पिठ्ठोळ, खेकडे, कासव, पाणसर्प ही मासळी पाणी स्वच्छ करते. तिथली शेती बोंडवेल तळ्याच्या पाण्यावर जगली आहे, हे नक्की खरे...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com