Glowing Mushrooms: सगळीकडे मिट्ट काळोख असताना, 'त्या' झाडावर पांढरा प्रकाश दिसत होता; गोव्याच्या जंगलातील 'चमकणारी बुरशी'

Bioluminescent fungi Goa: रात्री जंगल सफारी झाल्यानंतर आम्ही जंगलात एकीकडे उतरलो आणि आत गेलो. बरेच चालल्यानंतर आम्हांला त्यांनी एका झाडावर चकाकणारी बुरशी दाखवली.
Bioluminescent fungi goa
Bioluminescent fungi goaDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता साेनक

जंगलात मोकळेपणाने फिरायला आम्हांला खूप आवडते. वेळ काढून जंगलात जाऊन राहणे आमच्या आवडीच्या दिनक्रमांपैकी एक आहे. जंगल सफारी करणे, तेथील वेगवेगळे प्राणी, पक्षी बघणे, झाडांची माहिती घेणे, एखादा पाण्याचा धबधबा असेल तर त्याचा आनंद घेणे सगळेच आनंददायक असते.

असेच तीन-चार वर्षांपूर्वी एकदा आम्ही गोव्याच्या जंगलात गेलो असता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हांला सांगितले की या दिवसांत अंधारात चमकणारी बुरशी (bioluminescent fungi) जंगलात दिसते. तुम्हांला पाहायचीय का? पाहायची असेल तर रात्री निघावे लागेल.

त्या रात्री जंगल सफारी झाल्यानंतर आम्ही जंगलात एकीकडे उतरलो आणि आत गेलो. बरेच चालल्यानंतर आम्हांला त्यांनी एका झाडावर चकाकणारी बुरशी दाखवली. काळोख्या रात्रीत सगळीकडे मिट्ट काळोख असताना त्या झाडावर मात्र पांढरा प्रकाश दिसत होता. फोटो घेतला तर तो प्रकाश पिवळसर हिरवा दिसायला लागला. ही होती जंगलातील चमकणारी बुरशी. पावसाळ्यात प्रकाशमान होणारी ही बुरशी.

काही सजीवांमध्ये (प्राणी तसेच वनस्पती) ठरावीक जीवरासायनिक प्रक्रियेमुळे नैसर्गिक प्रकाश उत्पन्न होतो. नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या या प्रकाशाला बायोल्युमिनेसेन्स असे (bioluminescence) म्हणतात.

जीवविज्ञानाच्या भाषेत या प्रकाशनिर्मितीस ‘जीवदीप्ती’ असे म्हणतात. काही सागरी पृष्ठवंशी, कीटक आणि अपृष्ठवंशी सजीव यांमध्ये जीवदीप्ती आढळून येते; उदा., काजवे, जेलीफिश, म्हाकूळ (Squid), काही बुरशी इत्यादी.

बायोल्युमिनेसेन्स, एक आकर्षक नैसर्गिक घटना, विविध सजीवांमध्ये आढळते. ‘बायो’ (ग्रीकमध्ये) म्हणजे जीवन, तर ‘लुमेन’ (लॅटिनमध्ये) म्हणजे प्रकाश. बायोल्युमिनेसेन्स म्हणजे सजीवांमधून प्रकाशाचे उत्सर्जन. बायोल्युमिनेसेंट बुरशी निसर्गात हिरवा प्रकाश (विलंबित प्रतिदीप्ति) उत्सर्जित करते. ही बुरशी साधारणपणे मृत बांबू, झाडाची खोडे, मुळे, कुजणारे लाकूड आणि गळून पडलेल्या पानांवर वाढते. भारतातील अनेक भागांत लोककथांतून घनदाट जंगलातून मार्ग शोधण्यासाठी चमकणाऱ्या जीवांचा, जीवदीप्तीचा, वापर केल्याचा उल्लेख दिसतो.

बायोल्युमिनेसेन्सच्या ऐतिहासिक नोंदींकडे मागे वळून पाहिल्यास, प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये बायोल्युमिनेसेंस जीवांचा शोध लागला. ऍरिस्टॉटल (सामान्य युग पूर्व ३८४-३२२) याने या जीवांची स्वयं-तेजस्विता ओळखली आणि अभूतपूर्व निरीक्षणे केली.

आज, बायोल्युमिनेसेंट बुरशी (उदा. आर्मिलेरिया, मायसेना आणि रोरिडोमायसेस ) आणि बॅक्टेरिया (उदा. फोटोबॅक्टेरियम आणि व्हिब्रिओ ) हे सर्वात जास्त अभ्यासलेले सूक्ष्मजीव आहेत, तर मासे (उदा. लँटर्नफिश ) आणि कीटक (उदा. काजवे) हे देखील लोकप्रिय अभ्यासलेल्या गटांमध्ये आहेत.

अलीकडे बायोल्युमिनेसेंट बुरशी जगभरातील अनेक संशोधन गटांकडून खूप लक्ष वेधून घेत आहे. अळंबीसह विविध प्रकारच्या बायोल्युमिनेसेंट बुरशी जगभरातील विविध स्थलीय वातावरणात आढळून आल्या आहेत; तरीही, बुरशीजन्य बायोल्युमिनेसेंट यंत्रणांचा खूप कमी अभ्यास केला गेला आहे. सर्वसाधारणपणे, मनेसेंस ल्युसिफेरिनच्या रासायनिक ऑक्सिडेशनद्वारे होतो. हा ल्युसिफेरिन प्राणवायूच्या उपस्थितीत ल्युसिफेरेस एन्झाइमद्वारे उत्प्रेरित होतो.

हा बायोल्युमिनेसेंस प्रकाश विशिष्ट जैव रासायनिक प्रक्रियेमुळे निर्माण होतो. बुरशीच्या पेशीत ल्युसिफेरीन नावाचे रसायन आणि ल्युसिफेरेज हे विकर (उत्प्रेरक, enzyme) तयार होतात. ल्युसिफेरीनचा उत्प्रेरकाच्या उपस्थितीत ऑक्सिजनशी संयोग घडून आल्यामुळे रासायनिक प्रक्रियेने प्रकाशनिर्मिती होते.

या प्रक्रियेत ल्युसिफेरेज विकर उत्प्रेरकाची भूमिका बजावते. काही वेळा एटीपीचे रेणू या क्रियेत भाग घेतात. हा प्रकाश शीत’ प्रकारचा असतो. त्याचे तापमान खूप कमी असते. या अभिक्रियेत मुक्त झालेली जवळजवळ ऐंशी टक्के ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते तर उर्वरित सुमारे वीस टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते.

वेगवेगळ्या सजीवांमध्ये आढळणारे ल्यूसिफेरीन वेगवेगळे असते. ल्युसिफेरीन-ल्युसिफेरेज प्रणालीही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडणारा प्रकाश वेगवेगळा म्हणजेच निळसर ते लाल तरंगलांबीचा असतो. हा प्रकाश ‘शीत’ प्रकारचा असतो. या अभिक्रियेत मुक्त झालेली ८०% ऊर्जा ही प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, तर उर्वरित २०% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते.

जीवदीप्ती वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश निर्माण करू शकते. या उत्सर्जित झालेल्या प्रकाशाची तरंगलांबी वेगवेगळी असते.

साधारणतः समुद्रातील जीवदीप्ती निळसर हिरव्या रंगाची म्हणजे ४५० ते ५०० नॅ. मी. (नॅनोमीटर) तरंगलांबीची असते, तर जमिनीवरील सजीव पिवळसर रंगाची म्हणजे ५६० ते ५९० नॅ. मी.च्या जवळपास तरंगलांबीचा प्रकाश उत्सर्जित करतात. बहुतेक सागरी प्रजातींमध्ये जास्तीत जास्त बायोल्युमिनेसेन्स ४५०- ५१० नॅ.मी. च्या श्रेणीत येते, समुद्राच्या पाण्यात, निळा ते हिरवा (४००-५०० नॅ.मी.) ल्युमिनेसेन्स जास्तीत जास्त असतो. स्थलीय जीवांमध्ये प्रामुख्याने पिवळा-हिरवा बायोल्युमिनेसेन्स (५६० ते ५९० नॅ. मी.) रंग असतो.

आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश, दृश्य प्रकाश, हा पांढऱ्या रंगाचा दिसला तरी त्याच्यात सात रंग असतात. या सात प्रकाशकिरणांचे तरंग (waves) असतात, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. प्रत्येकाची तरंगलांबी वेगळी असते. ह्या दृश्य प्रकाशाच्या पट्ट्याची तरंगलांबी साधारणतः ४०० ते ७८० नॅ.मी. असते. जांभळ्या रंगाची तरंगलांबी ४०० नॅ.मी. असते. तर तांबड्या रंगाची तरंगलांबी ७८० नॅ.मी. असते.

Bioluminescent fungi goa
Mhadei Wildlife: देवराईचं जंगल, पाण्याचे झरे आणि हजारो वर्षांचा वारसा 'म्हादईची देवराई', निसर्गसंपन्नतेचं देवतांकडून दिलेलं देणं

काजवे जीवदीप्तीचा वापर मीलनासाठी करतात. काजव्यांमध्ये नर व मादी दोन्ही चमकतात. आपला जोडीदार शोधण्यासाठी काजवे या जीवदीप्तीचा उपयोग करतात. नर काजवे हवेत उडत चमकत असतात. मादी काजवे जमिनीवरून लक्ष ठेवतात. ज्या नराचा प्रकाश अधिक प्रभावी असेल त्याला माद्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो.

आपला जोडीदार शोधण्याचा हक्क मादीला असतो. प्रकाशावरून आपल्याला हवा असलेला नर तिने हेरला की ती लुकलुक करून त्याला प्रतिसाद देते. मादीच्या लुकलुकण्याच्या पद्धतीमुळे नर काजव्याला मादी कुठे आहे ते समजते. अशा प्रकारे त्यांचे मीलन होते. काही जीवदीप्तिमान खेकडेसुद्धा जोडीदार शोधण्यासाठी जीवदीप्तीचा वापर करतात.

Bioluminescent fungi goa
Surangi Flowers: सूर्य वर आल्यावर उमलणारी, जुन्या फांद्यांवरती येणारी 'सुवासिक सुरंगी'

सागरी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते. हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येऊन मादीबरोबर प्रणय करतो. नंतर दोघेही पाण्यात प्रजननपेशी सोडतात. खोल पाण्यातील अनेक मासे जीवदीप्तीचा वापर भक्ष्य पकडण्यासाठीही करतात. जीवदीप्तीमुळे परस्परांशी संवाद साधणे, मीलन व प्रजनन, भक्ष्य शोधणे आणि भक्षकापासून संरक्षण हे उद्देश साध्य होतात. आजकाल जीवदीप्तीवर खूप शोधकाम चालू आहे. बायोल्युमिनेसेन्सने वनस्पतीजीवशास्त्रात क्रांती घडवून आणली आहे आणि संशोधनाला प्रेरणा दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com