Goa Opinion: मुंबईत सर्वप्रथम स्थायिक होणारा भंडारी समाज; दामू नाईक प्रदेशाध्यक्ष, रुद्रेश्वर रथयात्रा आणि राजकीय जागृती

Bhandari community Goa: भंडारी समाजाचे दैवत रुद्रेश्वरची रथयात्रा सुरू आहे. तो एका राजकीय जागृतीचा भाग आहे. तिची छाप अद्याप दिसत नाही, परंतु एक अदृश्य शक्ती जरूर आहे.
Rudreshwar Rathyatra Goa
Rudreshwar Rathyatra GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भंडारी समाजाचे दैवत रुद्रेश्वरची रथयात्रा सुरू आहे. तो एका राजकीय जागृतीचा भाग आहे. तिची छाप अद्याप दिसत नाही, परंतु एक अदृश्य शक्ती जरूर आहे. भंडारी समाज बाहू आवळतो आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात ब्राह्मण्यवादाविरोधात प्रखर चळवळीला सुरुवात होऊन भंडारी समाज पेटून उठला. त्याने क्षत्रिय दर्जा हिसकावून घेतला. स्वतःची वेगळी आध्यात्मिक गुरुपरंपरा सुरू केली. मुंबईत सुरू झालेल्या या चळवळीचे मुख्य लोण आज गोव्यात पोहोचले आहे.

गोव्यात भंडारी समाज आज राजकीय, सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ बनला आहे आणि आपल्या हक्कांप्रति आक्रमक आहे. तो आपले बाहू रुंदावतो आहे. आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी रवी नाईक आक्रमक बनले आहेत, दुसऱ्या बाजूला दामू नाईक भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जोराचा हिसका देण्याच्या तयारीत आहेत.

गोव्यातील राजकारणात भरभक्कम शक्ती बनलेला हा समाज प्रमुख सत्तास्थानांपासून अलग ठेवला गेल्याने अस्वस्थ आहे व त्याला सत्तेचा अधिक हिस्सा हवा आहे. गोव्यात या समाजाच्या दैवतांची रथयात्रा सुरू करण्यामागची खरी प्रेरणा तीच.

हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान गेली नऊ वर्षे वादात आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे पालखीवरून भंडारी-मराठा समाजात जोरदार संघर्षही झाला. हा वाद कित्येक शतके चालू आहे. त्यामागे राजकीय शक्ती आकार घेत आहे. त्यातून पुढच्या दोन वर्षांत काहीतरी नवे घडविण्याचा इरादा पक्का होत आहे. याच समाजाने यापूर्वी ऐतिहासिकदृष्ट्या मराठा समाजाविरुद्ध लढा दिला.

आपला क्षत्रिय बाणा सिद्ध करताना आर्थिक, राजकीय व धार्मिक चळवळीचा आधार त्यांनी घेतला. पद्मनाभ संप्रदायामध्ये या समाजाचे ऐक्य समाजधुरीणांना दिसले. हिंदू धर्मातील ब्राह्मण्य वर्चस्व झुगारून देणारी ही चळवळ हल्लीच्या वर्षातील एक प्रमुख सामाजिक चळवळ मानली गेली आहे.

१९व्या शतकाच्या शेवटास पद्मनाभ संप्रदायाचा गोव्यात झालेला शिरकाव भंडारी समाजाला वेगळी ओळख मिळवून देण्यास कारण झालाच, शिवाय त्याचे राजकीय बाहू रुंदावण्यास मदतरूपी ठरला. पद्मनाभ संप्रदायाची स्थापना जरी ब्राह्मणी गुरूंनी केली असली तरी हिंदू धर्मात प्रखर परिवर्तनाची दीक्षा देणारे त्यांचे कार्य ऐतिहासिक आहे. पहिल्या पद्मनाभ गुरूंनंतरचे या समाजाचे सर्व गुरू भंडारीच होते व त्यांची शिकवण ब्राह्मण्यवादाविरोधातच होती.

गुरूंची अद्भुत शक्ती, दत्तात्रेयांच्या देवळांचे निर्माण व ब्राह्मण्यवादाविरोधातील पुजाऱ्यांची नेमणूक हे या मठाचे वैशिष्ट्य राहिले. त्यांच्या गुरूंचे महत्त्व म्हणजे ते गृहस्थाश्रमी होते. परंतु त्यांनी सर्वसामान्यांचे कैवारी बनून लोकांना सुधारणांच्या मार्गाने नेण्याचे अद्भुत कार्य केले. प्रमुख गुरू हे कोकणातून आले, मुंबईत गिरणी कामगार म्हणून राहिले.

गिरणी कामगारांमध्ये त्यांनी जिवापाड काम केले. या सर्व गुरूंच्या समाध्या उभारण्यात आल्या असून, पद्मनाभ संप्रदायात त्या सर्वांचे भक्तिभावाने पूजन होते. सनातन धर्माची मूलतत्त्वे सर्वसामान्य व रंजल्यागांजलेल्यांना अनुरूप बनवून त्यांना माणुसकीची शिकवण देणारा हा पद्मनाभ संप्रदाय आज बहुजन समाजाच्या आकांक्षांशी एकरूप बनला आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांना त्याच्यापुढे लोळण घ्यावीशी वाटते.

गोवा विद्यापीठाचे संशोधक पराग पोरोब यांनी आपल्या ‘बहुजन समाजातील गुरूंची ओळख व धर्म’, याविषयाशी संबंधित अभ्यासात भंडारी समाजाचा राजकीय व सामाजिक दर्जा प्राप्त करण्यात पद्मनाभ संप्रदायाने दिलेले योगदान याचा सखोल धांडोळा घेतला आहे. त्यात भंडारी समाजातील धुरीणांनी केलेला संघर्ष, सुरुवातीला मुंबईत व त्यानंतर गोव्यात झालेला प्रवेश व पद्मनाभ समुदायाचे वाढते प्राबल्य यावर प्रकाश टाकला असून, त्याचीच ओळख करून देण्याचा या लेखाचा प्रपंच आहे.

प्रा. पोरोब यांच्या या प्रपत्राची सुरुवात ब्रह्मेशानंद स्वामींना २०२२मध्ये देण्यात आलेल्या पद्मश्रीपासून होते. धार्मिक कार्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून हा राष्ट्रीय किताब त्यांना देण्यात आला. पद्मनाभ संप्रदायाचा प्रभाव वाढवताना गोव्यातील मतदारांवर त्यांनी घातलेले गारुड या पुरस्काराच्या रूपाने सामोरे आले. या स्वामीजींचा कृपाशीर्वाद लाभावा, यासाठी अनेक नेते व राजकारणी या मठाचे उंबरठे सतत झिजवत असतातच.

मुंबईतील गिरणी कामगार संबंध

एकोणिसाव्या शतकात मध्य मुंबईत गिरण्यांचा उगम झाला व गिरगावचे गिरणगाव झाले. त्याच्या पाठीवर मुंबई वाढू लागली. तेथे १८५०पासून कामगारांच्या झुंडी येऊ लागल्या व हे स्थलांतर प्रामुख्याने कोकण व गोव्यातून घडू लागले. कमकुवत समाज मूलतः भंडारी समाजातील लोकांचा त्यात भरणा होता. त्यातून एक नवे नागरी जीवन उभे राहिले. चाळी तयार झाल्या, नवा शेजार निर्माण होऊन हे लोक गावाकडे मनिऑर्डरी पाठवू लागले. त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य यावर जादा खर्च होऊ लागला. पगार अल्प होता, त्यामुळे कर्जाचे डोंगर वाढत होते. कामाच्या ठिकाणचे प्रदूषण, व्यसनाधीनता यामुळे विविध विकारांनी त्यांना घेरले.

गिरगावातील औद्योगिकीकरणाने नवी सामाजिक रचना तयार झाली. त्यातून समाजातील विविध हलक्या जाती एकत्र नांदल्या. धार्मिक कार्ये, उत्सव, सांस्कृतिक उपक्रम यातून त्यांची स्वतःची ओळख घडत गेली. भंडारी समाजाची पहिली ओळख या अशा परिस्थितीतून उभी राहिली.

प्रा. पोरोब लिहितात ः भंडारी हे मूलतः कोकण किनारपट्टीचे रहिवासी व दारू गाळण्याशी संबंधित असल्याने त्यांची शूद्र म्हणून वर्णी लागली होती. ते हिंदू समाजातील अनेक मानमरातबांपासून वंचित होतेच, शिवाय वेदाभ्यासासह सामान्य शिक्षणापासून दूर राहिले. त्यांच्यात व्यवसायानुसार अनेक पोटजातीही होत्या.

मुंबईत सर्वप्रथम स्थायिक होणाऱ्यांत हा समाज होता. पोर्तुगिजांनी १५३४मध्ये गुजरातच्या सुलतानांकडून मुंबई घेतली. त्यावेळी तेथे बहुतांशी कोळी व भंडारींची वस्ती होती. किंबहुना ते सैन्यात नोकरी करीत. १७२८मध्ये पोर्तुगिजांच्या चौल किल्ल्यांचे रक्षण करणाऱ्या सैन्यांत भंडारी प्रामुख्याने होते. १६७२ ते १८०० या काळात मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याच्या कामासाठी ब्रिटिशांनी भंडारी दलाची स्थापना केली होती. त्यानंतरच भंडारींचे कोकणातून स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले.

वसाहतवादाच्या काळात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरांचे प्रमाण आणखी वाढले. विशेषतः शिक्षणाचे आकर्षण निर्माण झाले. एकोणिसाव्या शतकात ब्राह्मणांना कागद स्पर्श वर्ज्य होता. परिणामी ते छापखान्यातील मानवी श्रमांची कामे करू शकत नसत. देशी छापखान्यांमध्ये भंडारींचे प्राबल्य वाढले. छपाईतील काम त्यांना कालांतराने शिक्षणाकडे घेऊन गेले. ही प्रक्रिया हलक्या जातीतील लोकांच्या चळवळींची मुहूर्तमेढ ठरली.

भंडारींमधील एक सुधारक तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘जातिभेद विवेकसार’ हे ब्राह्मणांच्या वर्चस्वावर प्रहार करणारे पहिले पुस्तक लिहिले. ते युरोपीय कंपनीसाठी माल बनविणारे एक मध्यम उत्पादक होते. त्यांचे जोतिबा फुलेंशी निकटचे संबंध होते. फुले त्यावेळी ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरोधात आसूड उगारत होतेच. पडवळांनी जातीय उतरंडीतील ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देत शूद्र या संकल्पनेविरोधात प्रकर्षाने लिहिले. इतकेच नव्हे तर आर्यांच्या दमनाला तोंड दिलेले हे घटक या मातीतील खरे लढवय्ये असल्याचे प्रतिपादिले. त्यांनी केवळ लिहिले नाही, तर गिरणी कामगार व घरगड्यांसाठी शाळा सुरू केल्या. भंडारी समाज अत्यंत निर्धारपूर्वक आपली ताकद वाढवत होता.

जातीय ऐक्याची चळवळ

याच काळात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पश्चिम भारतात बिगर ब्राह्मणविरोधी चळवळींचा जोर वाढला व सुस्थितीतील मराठ्यांनी उच्च जातीय दर्जाची अपेक्षा ठेवून स्वतःला क्षत्रिय जाहीर केले. क्षत्रिय दर्जामुळे जातीय अभिनिवेशाची एक नवी चळवळ आकार घेऊ लागली व कित्येक बिगर ब्राह्मण समाजांनी स्वतःचा क्षत्रिय ओळखीशी संबंध जोडण्याचे प्रयत्न सुरू केले.

परंतु बिगर ब्राह्मण राजकारण हे कधीच जातींचे स्थिर वैचारिक संघटन नव्हते. या चळवळींनी इतर बिगर ब्राह्मणांना आपलेसे केले नाही. मराठा ही लढवय्यी जमात मानली जात होती. जात व तिची वसाहतकालीन लष्करी कामगिरी व नैपुण्य तसेच सरकारी धोरण यामुळे मराठ्यांना विशिष्ट मानमरातब व हुद्दे मिळत होते. त्यातूनही बिगर क्षत्रिय गटांना वेगळे ठेवणे शक्य झाले. या वसाहतवादी हुद्द्यांसाठीही काही बिगर ब्राह्मण जातींनी आपले क्षत्रियपण अधिक प्रकर्षाने जोपासले, संघटना स्थापन केल्या.

भंडारींमधील एका पुढाऱ्याचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागते, ते म्हणजे सीताराम केशव भोळे (१८६८-१९६१). ज्यांनी अगदी तरुण वयात वेगवेगळी श्रमाची कामे करीत शिक्षण घेतले. २१व्या वर्षी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ स्थापन केले. त्यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य आदी क्षेत्रांत झटून काम केले. भोळेंनी कोकणासह गोवा व कर्नाटकात वार्षिक शिक्षण भंडारी परिषदेची अधिवेशने घेतली.

ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर जिंकून गेले. प्रा. पोरोब लिहितात, याच काळात भंडारी हे शूद्रांमध्ये गणले जाऊ नयेत, तीसुद्धा एक लढवय्यी जमात असल्याचे बिंबवण्यात येते होते व सतत नवीन संशोधने, नवे साहित्य व नवा इतिहास रचण्यात येत होता. ज्यामुळे समाजपुरुषांना आपला एक उच्च सामाजिक व आर्थिक दर्जा अधोरेखित करणे शक्य झाले. भंडारी हे मद्य उत्पादनाशी संबंधित असल्याच्या समजुतीवर, त्यानंतर दुसरे सामाजिक नेते सखाराम हरी गोलतकर यांनी छेद दिला व भंडारींचा संबंध उत्तर भारतातील रजपूत समाजाशी जोडण्यात आला. काही मराठ्यांनीही त्यावेळी आपला इतिहास रचताना उत्तर भारतीय रजपूतांशी संबंध सांगितला होता.

शंकराचार्य हे मोठे हिंदू पीठ होते, ज्यांच्यामुळे विविध समाज, ज्ञाती यांना मानसन्मान, किताब, शुद्धीकरण, जातीय तंटे-बखेडे सोडविणे, काहींना प्रतिष्ठा देणे आदी वारसासंबंधित परंपरागत कार्य घडत असे. त्यामुळे भंडारींनी शंकराचार्यांकडे दाद मागितली. संकेश्वर, करवीर मठाचे जगद्गुरू शंकराचार्य हे कोकण व गोव्याचे काम पाहत असल्याने त्यांच्याकडेच हा तंटा नेण्यात आला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भंडारींनी शंकराचार्यांच्या आदर-सन्मानाचे कार्यक्रम आयोजित केले व त्यांना गोलतकरांनी लिहिलेल्या समाजाचा इतिहास सुपूर्द करण्यात आला. क्षत्रिय मराठा ओळखीला शंकराचार्यांचा आशीर्वाद हवा होता. परंतु भंडारींना तो उच्च दर्जा देण्यास विलंब लावण्याचे धोरण शंकराचार्यांनी स्वीकारले, शिवाय भंडारींशी मराठा ज्ञातीतील संस्था फटकून वागत होत्या. शंकराचार्यांनी इतर कामांच्या व्यग्रतेमुळे भंडारींच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. आरोप होत होता, की ते इतर श्रीमंत जातींच्या तंट्यांना अधिक महत्त्व देत होते. त्यामुळे भंडारी आपल्या पुनरुत्थानासाठी इतर मार्गांकडे वळू लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास येथील सामाजिक जीवनात नव्या आध्यात्मिक गुरूंचा उदय होत होता. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कष्टकरी समाज वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थ होताच, शिवाय रोजच्या जीवनाच्या झगड्यांमुळे मानसिक विवंचनेत सापडला होता. या कुचंबणेशी लढताना तो एकतर कोलमडून पडत होता किंवा नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवीत होता. त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंब विस्कटून जात असल्याचे दारुण चित्र मुंबईच्या सामाजिक जीवनात खळबळ निर्माण करीत होते.

पद्मनाभ संप्रदायाची मुहूर्तमेढ त्याच काळात गिरगावात अस्वस्थ भंडारी समाजाने रोवली. संप्रदायाचे आद्यगुरू पद्मनाभ जे रत्नागिरी जिल्ह्यातील देशस्थ बाह्मण समाजातील होते. गोविंद महाजन या नावाने जन्मले असले तरी वडिलांच्या निधनानंतर १८६२मध्ये महाजन व त्यांची आई मुंबईत स्थलांतरित झाली. काही काळ त्यांनी कारकुनी केली, गिरणीत काम केले व शिक्षकी पेशाही स्वीकारला. १८६२ व १८८२ या काळात त्यांचे लग्न, त्यांच्या तरुण पत्नीचे निधन व दोन मुलांचा मृत्यू अशा घटना एकामागोमाग घडल्या.

पुढे त्यांना वैमनस्य स्थितीत यशवंत देव ऊर्फ सिद्धपादाचार्य भेटले. ज्यांनी त्यांना दत्तात्रेय संप्रदायाची दीक्षा दिली व नवे नाव दिले- ‘पद्मनाभ’. तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दत्तात्रेयांचा भक्तगणच पसरला होता. ही एक प्रखर गुरुशिष्य परंपरा महाराष्ट्रात रुजली होती व आध्यात्मिक चळवळीत त्यांचे योगदान, प्रयत्न थोर मानले गेले. या परंपरेने तळागाळातील समाजात जागृतीचे खूप मोठे सामाजिक कार्य करून ठेवले होते. पद्मनाभांना दत्तात्रेयांचा मोठा भक्तगण लाभला. ज्यात ब्राह्मण व बहुजन वर्गही होता. नाथ, महानुभव, वारकरी, वैष्णव, स्मार्त व शाक्त या पंथांनाही तो प्रिय. त्यामुळे त्यांच्या भक्तांची वानवा नव्हती.

पद्मनाभ स्वतः गिरणीकामगार. त्यामुळे आपल्या भक्तगणांच्या समस्या आणि त्यांच्या दैनंदिन प्रश्नांची जाणीव त्यांना होती. किंबहुना त्यातच ते जगले होते. त्यामुळे स्वाभाविकच सर्वप्रथम या क्षेत्रात त्यांचे कार्य सुरू झाले. दैनंदिन जीवनात काबाडकष्ट करीत असतानाच विविध हालअपेष्टा व विकारांशी झुंज देत असलेला गिरणी कामगार साहजिकच त्यांच्याकडे आकृष्ट झाला. तेही नव्या आध्यात्मिक चळवळींकडे डोळे लावून बसले होते.

पद्मनाभांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या प्रचलित जात व्यवस्थेला झुगारून दिले. त्यांचा भक्तगण वाढू लागला. पद्मनाभ आपले बोलणे व वर्तन यातून दारूचे व्यसन, रागलोभ, सूड, शिवीगाळ व रंगेलपणाला विरोध करीत. आपल्या उपदेशातून त्यांनी जातीय वर्णमालेच्या विरोधात आसूड उगवत श्रमांची कामे व अंग मेहनतीवर जोर दिला. दत्तात्रेयांच्या भक्तिचळवळीचे नवे पर्व घडत होते. पद्मनाभांना या चळवळीत विशेष दर्जा प्राप्त होत होता. त्यातून १८९९मध्ये त्यांनी दत्तात्रेयांचे नवे देऊळ बांधले. पद्मनाभ तेथेच वास्तव्य करू लागले. तेच मोठे संप्रदाय केंद्र ठरले. पद्मनाभांनी संपूर्ण व्यवस्थापन भंडारींकडे सोपविले.

१८९९ ते १९२२ या काळात पद्मनाभ हे दत्तात्रेयांचे अवतारी पुरुष असल्याचे मानले जाऊ लागले. त्यांची तसबीर श्रद्धेने पुजली जाऊ लागली. त्यांचे निर्वाण झाले, ते तेंबेवाडी-पालघरचे समाधिस्थळ, हे पवित्र श्रद्धास्थान बनले. काही संतपुरुष जनतेला देवांपेक्षा अधिक प्रिय अगदी निकट वाटत असतात. भारतात अशा संतपुरुषांनी संपूर्ण सामाजिक जीवनावर गारुड घातले आहे, तसेच पद्मनाभांसंदर्भात घडले.

Rudreshwar Rathyatra Goa
Bhandari Community In Goa: 'नाईक' गटाचा आटापिटा निष्फळ! 'भंडारी' समाजातील वाद उच्च न्यायालयात; सुनावणी 12 नोव्हेंबरला

लिखित साहित्य पुराणांपेक्षा त्यांची प्रवचने, संतवचने आणि त्यांचे सामान्य बोल लोकांना भावू लागले. त्यांना गिरणी मालकांकडूनही उदारहस्ते निधी प्राप्त होऊ लागला. गिरणी कामगारांमधील अनागोंदी नष्ट केल्याचा प्रयत्न झाल्याने गिरणी मालक पद्मनाभांकडे आकृष्ट झालेले असू शकतात. भंडारी नेते व नंतर कम्युनिस्ट नेत्यांची कामगारांवर पकड निर्माण झाल्याने गिरणी मालकांची तशी मन:स्थिती बनलेली असू शकते.

१९२०मध्ये कम्युनिस्ट नेत्यांना मिळणारा पाठिंबा १९४०मध्ये मावळत गेला, हेही त्याचे एक कारण असू शकते. आणखी एक कारण म्हणजे पद्मनाभांनी भंडारींची क्षत्रिय ओळख अगदीच अव्हेरली नव्हती. भंडारींचा क्षत्रिय दर्जाचा दावा व पद्मनाभांची सामाजिक सुधारणेची चळवळ यामुळे आता मद्याचे उत्पादन व मद्यप्राशन बंद करण्याच्या लोकप्रिय मागणीला वलय लाभले. धर्मातील जातीय उच्च-नीच संकल्पनेला पद्मनाभांनी आव्हान दिले. साधनेच्या बळावर कोणीही माणूस गुरुपद प्राप्त करू शकतो.

Rudreshwar Rathyatra Goa
Gomantak Bhandari Samaj: भंडारी समाज नेत्यांची चारी दिशेला चार तोंडे; दैवत रुद्रेश्‍वराचा रथ राज्यभर फिरविण्याचा निर्णय

गुरू व दत्तात्रेयांसंदर्भात आदरभाव, भक्तिपूजा, स्वतःचे योग्य आचरण, कठोर संन्यासी जीवनपद्धती व तत्त्वे रुजवण्याची दीक्षा देण्यात आली. राहुल सरवटे या अभ्यासकाने नोंदविल्याप्रमाणे सनातनी हिंदुत्वापासून फटकून बिगर ब्राह्मणवादातून एक नवी हिंदू ओळख प्रस्थापित करून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची चळवळ एकोणीस व विसाव्या शतकात महाराष्ट्रात चालू होती, त्याचे हे पडसाद होते. त्याच अनुषंगाने पद्मनाभांची चळवळ- ज्यात भंडारी जोडले गेले होते, हा ब्राह्मण्यवाद झुगारून देत होते, परंतु हिंदू धर्मापासून अलिप्त राहू इच्छित नव्हते. ते हिंदुत्ववादाची चिकित्सा करीत होते.

(उत्तरार्ध पुढच्या रविवारी...ज्यात पद्मनाभ संप्रदायाचे गोव्यातील आगमन, पद्मनाभ मठाचे राजकीयीकरणातील परिवर्तन, सनातन धर्माचा पगडा, या समाजाचे सध्याचे स्थान याचा आलेख घेतला जाईल.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com