रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त! वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?

दुर्दैवाने आजची परिस्थिती पाहता, ‘रस्ते झाले मस्त आणि मरण झाले स्वस्त’ अशी दयनीय परिस्थिती लक्षात येते. अर्थात, याला अनेक कारणे कारणीभूत आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे.
रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त!
Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

रस्ते अपघात टाळण्यासाठी सरकारची कानउघाडणी करायची; देवावर भरोसा ठेवून आपण सुसाट वेगाने आपली गाडी हाकायची, हे वागणे बरे नव्हे. मग नाइलाजाने का होईना, अपघातांची वाढती संख्या बघून, ‘रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त!’, असे म्हणावे लागते.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अभिमानाने सांगतात की, ‘आपण या खात्याचा कारभार हातात घेतल्यापासून सर्वांत जास्त, सर्वांत वेगाने आणि सर्वांत जास्त लांबीचे चौपदरी आणि सहा पदरी रस्ते बांधून तयार झाले आहेत व हे रस्त्यांचे जाळे देशभर पूर्णत्वास नेण्याचा माझा विचार आहे’. नितीन गडकरी यांचा हा विचार स्वागतार्ह आणि अभिमानास्पद आहे. नीतिमत्तेस स्मरून त्यांचे कौतुक होणे साहजिक आहे. हा देशातील रस्त्यांच्या असंभवनीय गड गडकरींनी सर केला म्हणून त्यांचे अभिनंदन करणे हे आपले कर्तव्य आहे.

पण दुर्दैवाने आजची परिस्थिती पाहता, ‘रस्ते झाले मस्त आणि मरण झाले स्वस्त’ अशी दयनीय परिस्थिती लक्षात येते. अर्थात, याला अनेक कारणे कारणीभूत आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. उदाहरणादाखल आपण आपल्या गोवा राज्याकडे नजर टाकली असता आपल्या असे लक्षात येते की, गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत दीडशेच्या घरात रस्ता अपघात घडले.

यातील जवळ जवळ ४५ टक्के अपघातात सापडलेल्यांचा बळी गेला, तर ५५ टक्के लोक जखमी, जबर जखमी झाले किंवा कायम स्वरूपी अपंग झाले. सध्या गोव्यातील ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंतच्या रस्त्यांची पाहणी केल्यास, आपल्या लक्षात येते ते असे की, दुरुस्त किंवा नवीन केलेले रस्ते पुन्हा खराब होऊ लागले आहेत.

खरे तर, गेल्या वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे या रस्ते प्रकरणांकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्री महाशयांनी संबंधित कंत्राटदारांना तंबी देऊन सर्व रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती करण्यास भाग पाडले होेते, तसेच संबंधित अभियंत्यांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. पण सध्या रस्त्यांची एकूण वाताहत पाहता, ‘येरे माझ्या मागल्या’ असेच घडत असावे.

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त!
Goa Assembly Monsoon Session: विधानसभेत घुमला खाणपट्ट्यातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा आवाज, 'सांडूर-बेल्‍लारी'चे दाखले, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

अर्थात वाढती वाहने हेही एक महत्त्वाचे कारण आहे, हे विसरता येत नाही. जागोजागी रुंद व तुळतुळीत, गुळगुळीत रस्ते असूनही अपघात कमी होत नाहीत. वाहतूक पोलीस आपल्यापरीने कार्यरत असले आणि विशेषत: भरधाव वाहने हाकणाऱ्या परप्रांतीयांना दंडात्मक कारवाई करत असले, तरी रस्ते अपघातांचे भय इथे थांबत नाही असेच म्हणावे लागेल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पणजी-म्हापसा मार्गावरील गिरी येथे झालेल्या अपघातात सचिवालयातील एक ज्येष्ठ अधिकारी नारायण अभ्यंकर यांचा बळी गेला. ‘ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथे वाहन चालकांना वेग नियंत्रित करता येत नाही’, हे त्या अपघाताचे कारण होते असे सांगण्यात आले.

दुसरे हल्लीचेच कुर्टी-बेतोडा येथील उदाहरण देता येईल. या बगल मार्गावर एका तरुणाचा बेदरकार वृत्तीमुळे तो स्वत: तर गतप्राण झालाच पण एका डॉक्टर बनू पाहणाऱ्या निष्पाप तरुणीचा बळी गेला. ३० जुलै रोजी रात्री साळगाव-पर्रा रस्त्यावरील ‘माडांनी’ येथे ओंकार कारापूरकर व मुहम्मद फराज हे ऐन पंचवीस-तिशीतले तरुण भीषण अपघातात ठार झाले.

केवळ निकृष्ट प्रकारच्या रस्त्यांचे काम किंवा जास्त वळणे असलेले अरुंद रस्ते यांची कारणे देऊन केवळ सरकारवर ताशेरे ओढून चालणार नाही. या त्रुटी दूर केल्याच पाहिजेत. पण वाहनचालकांचे धड लक्ष नसणे, बेदरकार वाहने हाकणे, वाहतूक नियम धाब्यावर बसविणे हीदेखील अपघातांना निमंत्रित करणारी कारणे आहेत, याकडे प्रत्येक वाहन चालकाने गंभीरपणे लक्ष देणे हे इतरांच्या व त्यांच्याही हिताचे आहे, याची खबरदारी त्यांनी प्रथम घेतली पाहिजे.

आपण वर्षातून एक आठवडा जसा ‘सहकार सप्ताह’ साजरा करतो, तसाच वर्षातून एकदा ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ही साजरा करतो. अनेक मान्यवरांची या निमित्ताने जनतेला सावधानतेचा इशारा देणारी भाषणे होतात. सुदैवाने वाहतूक खाते व वाहतूक पोलीस यांच्या सतर्कतेमुळे या सप्ताहात अपघात कमी होत असले तरी मग ‘पुनश्च हरी ॐ’ म्हणत अपघातांचे सत्र मागील पानावरून पुढे चालू होते.

मी वृत्तपत्रांत २०११साली एक लेख लिहिला होता, त्याचे शीर्षक होते, ‘राज्याला मृत्यूचा सापळा बनवू नका!’ या लेखातील थोडी माहिती आकडेवारीसह वाचकांना देतो. ‘गोवा राज्यात अनेकदा डझनभर अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे गोवा मृत्यूचा सापळा आहे की काय असे वाटू लागले आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१० साली २ हजार ३९९ अपघातांची नोंद झाली होती. या आकडेवारीनुसार प्रतिदिनी येथे १२ अपघात घडतात. यानंतर अशा अपघातांतील मृत्यूंची संख्या पाहता आपल्या आणखी एक गोष्ट लक्षात येते आणि धक्का बसतो. कारण ही आकडेवारी सांगते की, २०१० साली रस्ता अपघातात ३२७ जणांना मरण आले.

तर २०११ साली ही संख्या कमी झाली नाही. या अपघातात काही मध्यमवर्गीय किंवा जे आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होते त्यांनी सरकारी इस्पितळांना राम राम ठोकत आपली व्यवस्था खाजगी इस्पितळात केली’. आज चौदा वर्षांनी आपण याचा आढावा घेताना आपल्या लक्षात येते ती एक गोष्ट म्हणजे येथे विकास खूप झाला, होतो आहे पण अपघातांमुळे जे भकास आणि उदास जिणे नशिबी येते ते पाहिल्यानंतर आपला खरोखरच विकास होतो आहे का? आणि जर होत असेल तर मग या अपघातांचे, ‘बळीं’चे आणि गंभीर जखमी अवस्थेत घरी बसलेल्या लोकांना कुणी वाली उरलाय की नाही? आज ही बळींची किंवा जखमींची संख्या वाढत आहे याचे कारण म्हणजेे अपघातांची संख्या ज्या प्रमाणात वाढत चालली आहे त्याच प्रमाणात अपघाती-मृत्यूंची संख्याही वाढत चालली आहे.

रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त!
Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

यासाठी सरकार आपले काम करेलच, सरकारला आपण जाग आणलीच पाहिजे. पण त्याचबरोबर अपघातांची संख्या कमी करणे किंवा अपघात रोखणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, याकडेही दुर्लक्ष होऊ देता कामा नये. कारण अनेकदा आपण आपल्याच माणसांकडून ऐकतो, ‘आम्ही तरी काय करायचे?’, ‘आलिया भोगासी, असावे सादर, देवावर भार ठेऊनिया’.

म्हणजे रस्ते अपघात टाळण्यासाठी सरकारची कानउघाडणी करायची; देवावर भरोसा ठेवून आपण सुसाट वेगाने आपली गाडी हाकायची, हे वागणे बरे नव्हे. मग नाइलाजाने का होईना, अपघातांची वाढती संख्या बघून आपण प्रतिक्रिया देतो की, ‘रस्ते झाले मस्त, मरण झाले स्वस्त!’म्हणून प्रत्येकाला नम्र विनंती की, आपण स्वत: शहाणे बनून दुसऱ्यांना त्यांच्या जाणिवांची, कर्तव्याची जाणीव करून देणे हे अपघात रोखण्याचे एक प्रभावी साधन कसे बनेल, याचा विचार करुया.

शंभू भाऊ बांदेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com