

मधू य. ना. गावकर
बेलवृक्ष म्हटला की आदिनाथ महादेवाची भक्ती आठवते. आयुर्वेदात त्याला मानाचे स्थान आहे. त्याहीपेक्षा आपल्या वेद, पुराणात शंकराला पांढरी कमळे, पिवळी बकुळी, गुलाबी मंदार फुलांपेक्षा त्याला बेलवृक्षाची हिरवी त्रिवेणी संगम पाने जास्त आवडतात.
आपल्या भारतातील गावे, जंगले, नद्यांचे काठ, संगम, शहरे ठिकाणी महादेवासी मंदिर पाहावयास मिळतात, त्या मंदिरात अगर उघड्या जागी आदिनाथाची लिंगे स्थानापन्न केलेली आहेत. वसंत ऋतूच्या आगमनात काजू, फणस, आंबा इत्यादी फळे लगडताना, येणाऱ्या शिवरात्रीने सूर्य हिवाळ्याला विराम देऊन उन्हाळा देण्यास सुरुवात करतो. त्या शिवरात्रीला महादेवाच्या लिंगावर किती बेलपत्रे वाहिली जातात हे सांगणे फारच कठीण काम आहे.
हिंदू धर्मात महादेवाची वेगवेगळ्या नावे बावन लिंगे आहे, त्या शिवाय बारा ज्योतिर्लिंगे आहेत, पूर्वकाळी बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करणारा माणूस भाग्यवान समजला जाई, कारण ही यात्रा करणे म्हणजे भारताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सीमांना पाय लागणे.
आज विमान, रेल्वे, मोटारगाड्यांनी सुविधा निर्माण झाल्याने बारा ज्योतिर्लिंग यात्रा लवकर सफल, पूर्ण होते. बारा ज्योतिर्लिंगात सर्वांत खडतर प्रवास उत्तरेतील हिमालय पर्वतातील केदारनाथाचा. ही यात्रा म्हणजे मोठे धाडसच म्हणावे लागते.
गुजराथ म्हटले की भारताची पश्चिम सीमा. या राज्यात अरबी समुद्राच्या तटावर सौराष्ट्र, सोमनाथ आणि द्वारकेचा नागेश आहे. पूर्वेला झारखंडात देवघर भूमीत वैद्यनाथ आहे. दक्षिणेला बंगालच्या उपसागर तटावर तामीळनाडूत रामेश्वर आहे.
उत्तर प्रदेशात गंगेच्या तटावर काशी विश्वनाथ आहे. मध्य प्रदेशात कवी कालिदासाच्या उज्जैन नगरीत महाकाल आणि नर्मदा नदी तटावर ओंकारेश्वर आहे.
आंध्र प्रदेशात पाताळगंगेच्या काठावर श्रीशैल्य मल्लिकार्जुन आहे, महाराष्ट्रात गोदावरीच्या उगमाकडे ब्रह्मगिरीत त्र्यंबकेश्वर, पुण्याच्या डोंगर जंगलात भीमेच्या उगमाकडे शंकर (भीमाशंकर), औरंगाबाद गिरिजा नदीच्या उगमाकडे घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे हिंदू धर्मात पवित्र मानतात, शिवाय महाराष्ट्राातील भाविक परळी वैजनाथाला ज्योतिर्लिंग मानतात आणि झारखंड भागातील भाविक देवघराच्या वैद्यनाथाला ज्योतिर्ंलिग मानतात.
म्हणजे एकंदर तेरा ठिकाणी ज्योतिर्लिंगे आहेत. तीक्ष्ण नजरेच्या गरुडाने समुद्र मंथनातून अमृताने भरून वर आलेला कलश गरुडपक्षी उडत घेऊन जाताना ते बारा ठिकाणी उंचावरून पडल्याने ती स्थळे संजीवनीने पवित्र होऊन देवभूमी बनल्या; म्हणून त्या स्थळावर कुंभमेळे भरतात, असे पुराणातून हिंदू संस्कृतीत मानतात.
मी त्या कैलाशधीशाच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. विष पिऊन अमृत देणाऱ्या नीळकंठाची अनेक रुपे, अनेक देवालये पाहिली. त्यात महाराष्ट्रातील औंढानागनाथाचे लिंग जमिनीत गुहेत (अंडर ग्राउंड) उतरून पाहावे लागते. औंढानागनाथ ही संत नामदेवांची जन्म भूमी आहे.
प्रत्येक ठिकाणी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र पाहावयास मिळते, याचे कारण बेलवृक्ष त्रिपत्री देणारा थंड वृक्ष आहे. तो अंगातील दाह नष्ट करून देह थंड करतो शिवाय बेलवृक्षाची पाने मानवी देहाच्या नेत्र आकाराची आहे. आपण हिंदू संस्कृतीत शंकराला तीन डोळे आहेत, असे मानतो.
म्हणून बेलपत्रीला त्या आदिनाथाचे अलंकार मानले असावे. नारळाला श्रीफळ मानून त्या फळाला देवत्व बहाल करतो, कारण त्याला तीन डोळे आहेत. नारळाला अमृतफळही म्हणतात, कारण त्याचे पाणी गोड लागते आणी खोबरे एकदम अमृताच्या उपमेप्रमाणे सफेद असते. मात्र संस्कृत वाङ्मयात नारळाला श्रीफळाचे स्थान दिलेले नाही, पण अमरकोशात बेलवृक्षाच्या फळाला श्रीफळ मानले आहे.
असा हा बेलवृक्ष भारतात सर्वच ठिकाणी पानझडी जंगलात, गावात, शहरात आणि प्रामुख्याने देवालयांच्या परिसरात पाहावयास मिळतो. कवच, बाभूळ, गेक, बोर जंगम बाब्री झाडांच्या अंगावर ज्याप्रमाणे काटे असतात, त्याच प्रकारे बेलाच्या झाडाला अणकुचीदार दाट काटे असतात.
सरपटणारे प्राणी अशा झाडावर वास्तव्य करण्यास येत नाहीत, म्हणून अशा झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात. बेलाच्या वृक्षाला संस्कृतीत अनेक नावांनी ओळखला जातो, बिल्व, शैल, श्रीफल, गंधफल, त्रिपत्र, शिवद्रम, सदाफल, ग्रंथील, कष्टकी, महाकपित्थ अशा नावांनी तो ओळखला जातो. इतर भाषांत त्याला वेगवेगळी नावे आहेत.
हिंदी (बेल, सिरल); संस्कृत (बिल्वा, श्रीफळ, शिवद्रम, शिवपाल); तेलगू (मारे डू); बंगाली (बिल्बम); गुजराती (बिल); कन्नड (बिप्तारा, कुंबळा, मालुरा); तामिळ (कुवलम); थाई (मातम आणि मॅपिन); कंबोडिया (फ्नू किंवा पीनोई); व्हिएतनामी (बाऊनऊ); मलायन (माझ पास); फ्रेंच (ओरंगेर ड्यू मालाबार); पोर्तुगीज (मार्मेलोस) अशा वेगवेगळ्या नावांनी बेल वृक्षाला संबोधले जाते.
बेल वृक्षाचा समावेश लिंबू कुळात होतो. त्याचे वनस्पती शास्त्रीय नाव एगल मारमेलॉस, एगल हे एका ग्रीक निसर्गदेवीला त्याचे नाव देण्यात आले. वाल्मिकी रामायणात बेलफळावरून वृक्षाचे वर्णन केले आहे. चित्रा नक्षत्र आणी कन्या राशीचा आराध्य वृक्ष म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. बेलवृक्ष मध्यम आकाराचा असतो.
त्याची उंची दहाबारा मीटरपर्यंत असते. खोडाची साल पिवळ्या-करड्या रंगाची असून खडबडीत भेगाळलेली असते. पाने संयुक्त प्रकारची त्रिदल असतात. पाने हातावर चोळून वास घेतल्यास सुगंधी वास येतो. त्या पानांना सुगंधी तेलग्रंथीचे सूक्ष्म ठिबके असतात.
बेल वृक्ष ग्रीष्म ऋतूत एप्रिल-मे महिन्यात फुलतात. फुलांचा रंग हिरवट पांढरा असतो. कळ्या गोलकार असतात. निदले आणि प्रदले मिळून चार पाकळ्या असतात, त्यांचा परागकोश लांबट टोकदार असतो. फळांचे कवच कठीण असते फळे पावसाळ्यात पिकून पिवळी होतात.
फळातील गर गोड असतो. बेलाचे लाकूड एकदम टणक असते. कापल्यावर सुगंध पसरतो. त्याचे लाकूड इमारती, शेतीची अवजारे, बैलगाड्या, हातगाड्या, हत्याराच्या मुठी, कंगवा, कोरीव वस्तू करण्यास वापरतात. पाने पशूखाद्यास वापरतात.
फळाचा गर चुन्यामध्ये मिसळून बांधकामास वापरतात. बेलवृक्ष महत्त्वाचा औषधी गुणकारी आहे. त्याची साल, मुळे, फळे, पाने औषध करण्यास वापरतात. फळाच्या बियांत आणी गरात बिटा कॅरोटीन, बी१, बी२, बी३ आणी क जीवनसत्त्वे असतात, शिवाय पोटेशिअम फायबरचे प्रमाण भरपूर असते. जॉर्ज वॅट या शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, भारतात पिकणारे बेलफळ औषधी द्रव्य आहे, ते दुसऱ्या ठिकाणी मिळणे फार कठीण आहे, बेलाच्या औषधाचा उपयोग ताप, पचनसंस्था, अर्भकाची पोटदुखी, मूत्रविकार, सूज, वीर्य दुर्बलता, हृदय रोग, मानसिक ताण इत्यादी व्याधीवर औषध वापरतात.
कानातून पस आल्यास पानाचा रस घालतात. त्याच्या गरापासून सरबत आणी मुरांबा करतात. हे द्रव चवदार असते. बेलाच्या फळाचा उपयोग मासेमारीसाठीही करतात. बेलाचे फळ जास्त सेवन केल्यास नशाही चढते. बेलाची लागवड करण्यास उष्ण हवामान, कमी पाऊस आणी भरपूर सूर्यप्रकाश लागतो.
बेल वृक्ष निर्मिती, प्रतिपालन आणि विनाश यांचे प्रतीक मानतात. तसेच त्याला सुदैव लक्षणांचा मान देतात. बेलवृक्षाची उत्पत्ती सूर्यदेवापासून झाली, असे यजुर्वेदात म्हटले आहे. अथर्ववेदात त्याला परम पवित्र मानला आहे. देवालयात मंगलकार्य करताना, बेल वृक्षास प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. भाविक त्याला यश देणारा वृक्ष मानतात. कूर्मपुराणात त्याला लक्ष्मीचे निवासस्थान मानले आहे. महादेवाची पूजा करण्यास भगवान विष्णूला लक्ष्मीने बेलपत्रे आणून दिली. बंगालात दुर्गापुजनाला बेल पत्री वापरात. हिंदू धर्मात बेल वृक्षाला पूजनीय मानतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.