

खारवलेले बदाम, पहिल्या पावसाचे थेंब पडलेल्या मातीचा वेडावणारा गंध आणि फुलांच्या गोडसर चवीचे विलक्षण मिश्रण असलेल्या, हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या सुपीक पात्रात पिकणाऱ्या लांब दाण्याच्या बासमतीचा सुगंध कुठल्याही खवय्याला मोहरून टाकतो. बासमतीचा हा सुगंध ‘बीएडीएच-२’ या जनुकातून तयार होणाऱ्या ‘टू-अॅसेटाईल वन-पायरोलीन’ या नैसर्गिक रासायनिक संयुगातून जन्मतो. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बासमतीच्या अलौकिक सुगंधामुळे अस्वस्थ झाले आहेत.
त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील वाढत्या राजकीय सौहार्दाचा सुगंध. बासमती हा काही सर्वसामान्य अमेरिकी नागरिकांच्या दैनंदिन आहारातील साधा भात नाही, तर तो अमेरिकेतील श्रीमंत वर्गाच्या चैनीच्या बाबीत मोडणाऱ्या ‘शॅम्पेन’ किंवा ‘स्कॉच व्हिस्की’सारख्या जिनसांपैकी एक आहे.
सामान्य तांदळाच्या तुलनेत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बासमतीचा दर दुपटीपेक्षा जास्त आहे. भारताकडून जगभरात होणाऱ्या एकूण तांदूळ निर्यातीमध्ये अमेरिकेत पोहोचणाऱ्या तांदळाचा वाटा तीन टक्क्यांचा म्हणजे ३९ कोटी २० लाख डॉलरचा आहे. पण जगभरातून अमेरिका करीत असलेल्या तांदळाच्या एकूण आयातीमध्ये भारताच्या तांदळाचे प्रमाण २६ टक्के आहे.
त्यातही २४ टक्के तांदूळ हा बासमती आहे. अमेरिकेत निर्यात होणारा बासमती तांदूळ भारतातील उच्च उत्पन्नगटातील शौकिनांना सहजपणे पचवणे मुळीच अवघड नाही. भारताला युरोप, पश्चिम आशिया किंवा आफ्रिकन देशांमध्येही बासमतीचा ओघ वळवता येईल किंवा अन्य देशांच्या लेबलवर तो अमेरिकतही पोहोचविता येईल.
त्यामुळे बासमतीचा मोहरून टाकणारा सुगंध दुर्लक्षून नाक मुरडणाऱ्या ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या अट्टहासामागे अर्थकारण कमी आणि अहंकारच अधिक आहे. त्यांनी बासमतीवर आयातशुल्क वाढविल्याने भारताचे काही बिघडणार नाही. पण दुर्मीळ किंवा महाग होऊन बासमतीची उपलब्धता घटल्यास अमेरिकेतील श्रीमंतांच्या भोजनातील बिर्याणी आणि पुलावाची चव मात्र निश्चितपणे अमेरिकेत आपला स्वस्त तांदूळ ‘डम्प’ करतो आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढविण्यासाठी ट्रम्प यांनी बासमतीकडे आपली वक्रदृष्टी वळविली आहे. अमेरिकेतील शेतकरी हे ट्रम्प यांची व्होटबँक. अमेरिकेत २०२६ मध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीच्या धोरणांमुळे रिपब्लिकन पक्षाची स्थिती चांगलीच डळमळीत झाली आहे.
त्यातच अमेरिकेत तांदळाचे उत्पादन करणाऱ्या अमेरिकेतील चार-पाच राज्यांमधील शेतकऱ्यांची मते निवडणुकांमध्ये गृहित धरता येत नाहीत, हे ठाऊक असलेल्या ट्रम्प यांना अचानक शेतकऱ्यांच्या हिताची जाणीव झाली आहे. एकीकडे राजकीयदृष्ट्या सक्रिय शेतकऱ्यांना खूष करणारे निर्णय घेतानाच त्यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची कल्पना सुचली. अमेरिकेत बासमती महाग झाल्याने संख्येने अत्यल्प असलेल्या ग्राहकांचा रोष ओढवणार नाही.
अमेरिकेत बासमतीचे उत्पादन होत नाही. तेथील लांब दाण्याच्या तांदळाची बासमतीशी स्पर्धाच नाही. पण बासमतीच्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची स्पर्धा पाकिस्तानशी आहे. भारताची बासमतीची निर्यात पाच अब्ज डॉलरची तर पाकिस्तानची चार अब्ज डॉलरची आहे. बासमतीचे उगमस्थान पाकिस्तानच्या पंजाबमधील हफिझाबादमध्ये असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. बासमतीवरुन पाकिस्तानला भारताशी भिडविण्याचाही ट्रम्प यांचा उद्देश आहे.
बासमती तर बहाणा आहे. मुळात ट्रम्प बासमतीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मैत्रीतील वाढत्या सौहार्दाच्या सुगंधामुळे अस्वस्थ आहेत. ट्रम्प हे पुतीन यांचे हितचिंतक आहेत हे त्यांनी पुतीन यांची बाजू घेत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर युद्ध थांबविण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लपून राहिलेले नाही. पण आपल्याप्रमाणेच पुतीन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांचीही गहन मैत्री असावी, हे ट्रम्प यांना चांगलेच खुपते. ट्रम्प यांची इच्छा आणि अटी-शर्तींनुसार युक्रेनने रशियाशी सुरु असलेल्या युद्धाला विराम दिल्यास सर्वाधिक लाभ भारताचाच होणार आहे.
कारण रशियाकडून खनिजतेल खरेदी करीत असल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर लादलेले २५ टक्क्यांच्या अतिरिक्त आयातशुल्काचे निर्बंध अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबल्यास आपोआपच संपुष्टात येतील. शिवाय समांतरपणे सुरु असलेल्या भारत-अमेरिका व्यापार कराराअंती आयातशुल्काचे प्रमाण इतर निर्यातदार देशांप्रमाणे स्पर्धात्मक पातळीवर येऊ शकते. अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे झालेली कोंडी त्यामुळे संपुष्टात येईल.
मोदी-पुतीन यांच्यातील गेल्या काही महिन्यांतील वाढत्या घनिष्ठतेमुळे रशियाकडून खनिजतेल खरेदी केल्याच्या मुद्यावरून भारताबरोबर रशियाची कोंडी करु पाहणाऱ्या ट्रम्प यांचीच कोंडी होण्याची शक्यता आहे. जगातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी लादलेल्या सरसकट आयात शुल्काच्या प्रकरणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा सुरक्षित असलेल्या निकालाचीही ट्रम्प यांच्यावर टांगती तलवार आहे.
या निकालाची प्रतीक्षा पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांनाही आहे; तसेच तोपर्यंत भारत अमेरिकेच्या अटी-शर्तींवर व्यापार करार करणार नाही, याचीही ट्रम्प यांना कल्पना आहे. शितावरुन भाताची परीक्षा होते म्हणतात ते चुकीचे नाही, हे बासमतीने दाखवून दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.