

प्रमोद प्रभुगावकर
बगलरस्त्यावर म्हणजेच महामार्गाच्या फाट्यावर एका बाजूचे गटार गेले दोन महिने पावसाच्या पाण्याने तुंबून आहे. अनेकदा त्यांतील पाणी मुख्य रस्त्यावरूनही वाहताना दिसते पण संबंधित यंत्रणा त्याची घेत नसलेली दखल पाहून नवल वाटते.
एरवी विविध बाबतींत तत्परता दाखवणाऱ्या यंत्रणांना हे तुंबलेले गटार दिसत नाही की, ते आपल्या कार्यकक्षेत येत नाही हा बेफिकीरपणा या मागील कारण आहे, असा प्रश्न त्यामुळे पडतो. यंदा पाऊस कमी पडला आहे, पण तरीही त्याचा कोणताच परिणाम मडगावांतील डेंग्यूच्या साथीवर झालेला दिसून येत नाही. सध्या शहराच्या विविध भागांत व उपनगरी भागांतही डेंग्यूचे रुग्ण सापडलेले आहेत व त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामास लागलेली आहे.
त्याचबरोबर मडगाव नगरपालिकेनेही त्या नंतर आळस झटकून काम सुरु केलेले आहे. गेल्या जुलै महिन्यात तर दक्षिण गोव्याच्या विविध भागांत तब्बल७१ रुग्ण सांपडले व त्यांतील २७ रुग्णांची प्रकृती लक्षांत घेऊन त्यांना इस्पितळातही दाखल करावे लागले होते. त्या नंतर ते प्रमाण घटलेले असले तरी यंत्रणा एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
गोव्याच्या विविध भागांत पावसाळा सुरु झाला की या आजाराची साथ उसळणे हे हल्लीच्या काळात नित्याचेच झाले होते व त्यामुळे संबंधित यंत्रणा अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय घेते व तसे तिने यंदाही घेतले पण पाऊस दरवर्षीप्रमाणे न पडताही यंदा अशी तीव्र स्वरुपाची साथ का उसळली याचा खरे म्हणजे संबंधितांनी विचार करून त्यानुसार उपाय योजण्याची गरज आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांतील आकडेवारीचा आढावा घेतला तर डेंग्यूचा प्रादूर्भाव सातत्याने वाढला व त्याचीच गंभीर दखल घेणे भाग होते. कारण मे महिन्यात केवळ ९ असलेल्या रुग्णांची संख्या जून महिन्यात ३८वर पोचली व तिही पावसाचा विलंब झालेला असताना. पावसामुळे खोलगट भागांत पाणी सांचून राहिले व त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव झाला, असे म्हणायलाही वाव नाही. कारण जूनच्या अखेरच्या टप्प्यात पावसाला आरंभ झाला याचाच अर्थ डेंग्यूच्या प्रसाराची अन्य काही तरी कारणे आहेत व त्याचा शोध अजून लागलेला नाही.
आरोग्य खात्याच्या लोकांनी सालाबादाप्रमाणे शहरी व उपनगरी त्याच प्रमाणे पंचायत विभागात फिरुन लोकांना डेंग्यूबाबत मार्गदर्शन करताना उघड्यावर टाकलेले टायर, डबे व पावसाचे पाणी सांचून राहणाऱ्या अन्य वस्तूही हटविल्या होत्या. एवढेच नव्हे तर घरांच्या आवारांत असणाऱ्या फुलझाडांच्या कुंड्यांखाली असलेल्या उथळ भांड्यात पावसाचे पाणी सांचून त्यात डासांची पैदास होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला लोकांना दिला होता. त्याच प्रमाणे अनेक भागांत पडून असलेल्या करवंट्या , शहाळ्यांची शकले वगैरे हटविली होती. तरीही दक्षिण गोव्यात व विशेषतः मडगावात डेंग्यूचा फैलाव झाला ही वस्तुस्थितीआहे.
खरे म्हणजे विविध स्तरावरील लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेण्याची गरज होती. पण ती घेतलेली नाही ही वस्तुस्थिती होती. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना ही बेपर्वाई का, असा प्रश्न त्यांतून पडतो.एरवी राजकीय प्रश्नात भलतीच रस घेणारी माध्यमे सुध्दा डेंग्यूला व त्याच्या उगमाच्या कारणांकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न त्यामुळे मनाशी पडतो.
या संदर्भात एक उदाहरण द्यावेसे वाटते मडगावच्या पूर्व बगलरस्त्यावर म्हणजेच महामार्गाच्या फाट्यावर एका बाजूचे गटार गेले दोन महिने पावसाच्या पाण्याने तुंबून आहे. अनेकदा त्यांतील पाणी मुख्य रस्त्यावरूनही वाहताना दिसते पण संबंधित यंत्रणा त्याची घेत नसलेली दखल पाहून नवल वाटते. एरवी विविध बाबतींत तत्परता दाखवणाऱ्या यंत्रणांना हे तुंबलेले गटार दिसत नाही की ते आपल्या कार्यकक्षेत येत नाही हा बेफिकीरपणा या मागील कारण आहे, असा प्रश्न त्यामुळे पडतो. पूर्व बगलरस्त्यावरील मुंज विहारजवळील बावलीन ग्रॅनाईट ते मारुती मंदिर दरम्यानचे हे गटार पाऊस सुरु झाल्या पासून तुंबलेल्या अवस्थेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.