उद्यापासून इफ्फीच्या ५५व्या आवृत्तीला सुरुवात होत आहे. गोव्यातला हा एकवीसावा इफ्फी. २४ जानेवारी १९५२ ते ०१ फेब्रुवारी १९५२पर्यंत भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत पार पडला. नंतर मद्रास (आताची चेन्नई) दिल्ली, कलकत्ता, त्रिवेंद्रम या शहरातून फिरत फिरत २००४साली तो गोव्यात आला.
इफ्फीला गोव्यात आणण्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही. राजकीयदृष्ट्या म्हणा वा साधनसुविधांच्या दृष्टीने म्हणा राज्यात विपरीत वातावरण असूनसुद्धा पर्रीकरांनी इफ्फी गोव्यात आणलाच. आणला इतकेच नव्हे तर तो यशस्वीही करून दाखवला!
२८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २००४ या कालावधीत झालेल्या या महोत्सवाच्या गोव्यातील पहिल्या आवृत्तीला ‘न भूतो न भविष्यति’ अशी लोकप्रियता मिळाली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तर पणजीत जवळजवळ दीड लाख लोकांची गर्दी जमली होती. आतापर्यंतच्या गोव्यातील सर्व इफ्फींमध्ये हा सर्वांत यशस्वी इफ्फी महोत्सव. त्यावेळी त्यांना भेटायला गेलेल्या आम्हा चित्रपट निर्मात्यांना त्यांनी गोव्यातील चित्रपट क्षेत्राचा वेलू गगनात पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते.
पण लगेच म्हणजे जानेवारी २००५मध्ये सत्ता बदल होऊन काँग्रेस सत्तेवर आल्यामुळे पर्रीकरांचे आश्वासन हवेत विरले. आणि २०१२साली जेव्हा इफ्फी परत त्यांच्या हातात आला तेव्हा मांडवी-जुवारीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. त्यामुळे आज जेव्हा आपण गोव्यातील इफ्फीचा आढावा घेतो, तेव्हा आपल्याला फायद्यापेक्षा तोटाच अधिक दिसायला लागतो.
आज हा महोत्सव म्हणजे एक उत्सव बनायला लागला आहे. गोव्यातील सिनेकर्मींची ‘घर घर मे दिवाली, मेरे घर मे है अंधेरा’ अशी अवस्था झाल्यासारखी दिसत आहे. गोव्यात सिने संस्कृती आणणे हे पर्रीकरांचे स्वप्न होते. ही संस्कृती आणण्याकरता इफ्फीला त्यांनी माध्यम करण्याचा प्रयत्न केला होता.
पण दुर्दैवाने तो प्रयत्न अजूनही सफल झालेला नाही. पहिल्या इफ्फीत ‘सूड’ व ‘आलिशा’ हे दोन गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या. त्यात परत राजेंद्र तालकांच्या आलिशाला व्यावसायिकदृष्ट्या चांगले यश प्राप्त झाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे झाले होते.
पण ही अपेक्षा अल्पजीवी ठरली. गेल्या २१ वर्षांत ’होम स्वीट होम’, ‘नाचूया कुंपसार’सारख्या काही चित्रपटांचा अपवाद वगळता कोणतेही स्थानिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेले नाहीत. चित्रपट निर्मात्यांकरता असलेली आर्थिक अनुदान योजना गेली दहा वर्षे शीतपेटीत पडून आहे. आता परत सरकारने ही अनुदान योजना जाहीर केली असली तरी ती नक्की कशी आहे, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
इफ्फीत आता गोमंतकीय निर्मात्यांकरता ‘गोवन विभाग’ सुरू केला असला तरी गोमंतकीय निर्मात्यांची उपेक्षा काही संपलेली नाही. या विभागात दाखवले जाणारे बहुतेक चित्रपट हे ’वन शो’ पुरतेच मर्यादित ठरायला लागले आहेत. इफ्फीच्या उद्घाटन व समारोप सोहळ्याला आवश्यक असे भव्य परिषद गृह अजूनही अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नाही म्हणून हे सोहळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहेत.
क्रीडा क्षेत्राकरता असलेल्या या स्टेडियमवर इफ्फीचे सोहळे आयोजित केले जात असल्यामुळे त्यातील मजाच ’किरकिरी’ व्हायला लागली आहे. पूर्वी हे सोहळे कला अकादमीत व्हायचे. पण आता जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचा वापर व्हायला लागला आहे. यामुळे आज या महोत्सवात चित्रपट सृष्टीशी संबंधित लोकांपेक्षा ’टाइमपास’ करण्याकरता येणाऱ्या लोकांची संख्या जास्त झाली आहे.
इफ्फीतले काही चांगले उपक्रम अल्पजीवी ठरले आहेत. ‘मनोज श्रीवास्तव मनोरंजन संस्थे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ‘शॉर्ट फिल्म सेंटर’सारखा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याद्वारे जगातल्या उत्कृष्ट लघुपटांचा आस्वाद घ्यायला मिळत होता. २००८साली या शॉर्ट फिल्म स्पर्धेच्या ज्युरी पॅनलचा सदस्य म्हणून कार्य करताना जगातील उत्तमोत्तम लघुपट बघायला मिळाले होते.
त्यांपैकी ’रोड’ हा इराणी लघुपट तर अफलातून होता. पण श्रीवास्तव व काही गोमंतकीय निर्मात्यांमध्ये मतभेद झाल्यामुळे हा चांगला उपक्रम बंद पडला. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला ’मास्टर क्लास फॉर गोवन फिल्ममेकर्स’ हा स्तुत्य उपक्रमही गेल्यावर्षी बघायला मिळाला नाही. आता इफ्फीत दाखवणाऱ्या चित्रपटांचा दर्जाही घसरायला लागला आहे. एका वर्षी इफ्फीतल्या चित्रपटांची निवड करण्याकरता असलेल्या समितीचा मी एक सदस्य होतो. त्यावेळी ’ एक से बढकर एक’ चित्रपट असल्यामुळे कोणाची निवड करावी आणि कोणाला वगळावे हा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला होता. पण आता मात्र ’सब घोडे बारा टका’ अशी परिस्थिती दिसत आहे आणि यामुळेच इफ्फीचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील रेटिंग घसरायला लागले आहे. पुणे, मुंबई येथील स्थानिक महोत्सवसुद्धा या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पुढे जायला लागले आहेत.
गेली २१ वर्षे मी या इफ्फीच्या पंढरीतला एक वारकरी आहे. पण अजूनही ‘मंजिल’ मिळाली आहे, असे वाटत नाही. आता तर ’आज पुरानी राहो से कोई मुझे आवाज ना दे’ अशी आमच्यासारख्या निर्मात्यांची स्थिती झाली आहे. लाखो रुपये देऊन आणलेल्या बाहेरच्या सिताऱ्यांचा झगमगाट बघण्यापलीकडे स्थानिक सिनेकर्मींना इफ्फीत काही काम राहिले आहे, असे दिसतच नाही. आता यंदाचा इफ्फी कोणते नवे ‘रंग’ आणतो का पूर्वीच्या ‘रंगात’च ‘मश्गुल’ होतो याचे उत्तर येत्या आठ दिवसांतच मिळणार आहे हे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.