

८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, गोव्याच्या सर्जनशील क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधित्वाबद्दल चर्चा होणे गरजेचे आहेच. गोमंतकीय चित्रपटसृष्टी संस्कृती आणि सामाजिक वास्तव यांवर आधारित चित्रपट निर्माण करत असली तरी कॅमेऱ्यामागची महिलांची उपस्थिती अजूनही मर्यादित आहे.
त्यामुळे या उद्योगक्षेत्रात एक महत्त्वाचा प्रश्न आपोआपच निर्माण होतो— गोमंतकीय चित्रपटसृष्टीला अधिक महिला चित्रपटनिर्मात्यांची गरज आहे का? ‘नॅचरल्ली एज्युकेटेड’ या माहितीपटाच्या सह-दिग्दर्शिका वलांका फर्नांडिस या आपल्या माहितीपटातून महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडतात.
फुंदासाओ ओरिएन्तने आयोजित कार्यशाळेदरम्यान विकसित झालेला हा माहितीपट नंतर ‘फुटप्रिंट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त प्रदर्शित करण्यात आला होता. फर्नांडिस यांच्या मते, ‘गोव्यात चित्रपटनिर्मितीत निश्चितच अधिक महिलांची आवश्यकता आहे.
महिला भावनिक बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि स्वतःच्या अनुभवांवर आधारित असलेला दृष्टीकोन घेऊन येतात. महिला चित्रपटनिर्मात्यांची संख्या वाढत असली तरी समाज आणि संस्थात्मक पातळीवर त्यांना अधिक प्रोत्साहनाची आवश्यकता आहे.’
चित्रपट आणि तंत्रज्ञान संगमाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायस्मा नाईक या ‘टोतो’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गोव्याच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. त्यांच्या या प्रकल्पाची निवड ‘भारत मंडपम’ येथे १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी झाली आहे.
सायस्मा यांच्या मते, ‘गोव्यातील महिला चित्रपट निर्मात्यांना मर्यादित संधी, निधीच्या अडचणी असतात आणि त्यांना पुरुषांइतके गांभीर्याने घेतले जात नाही. महिला कथाकथनात प्रामाणिक आणि प्रभावी दृष्टीकोन आणू शकतात.
त्यांना समान संधी आणि सातत्यपूर्ण पाठबळ मिळाल्यास अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक चित्रपटसंस्कृती घडू शकते.’प्राची शिरोडकर या माहितीपट निर्मात्या आणि अभिनेत्री असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे. ‘मिसेंताज इंडियन फिल्म अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार, ‘आमादेर आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार आणि गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी माहितीपट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
अभिनेत्री म्हणून त्यांनी ‘स्मोक अँड मिरर्स’ आणि ‘इमॅजिन इफ इट वॉज यू’ या चित्रपटांत काम केले आहे. सध्या त्या चित्रपट आणि जाहिरातींमध्ये कला दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.
प्राची शिरोडकर म्हणतात, ‘गोव्यात अधिक महिला चित्रपटनिर्मात्यांची आणि चांगल्या प्रशिक्षण व्यवस्थेची गरज आहे. सेटवर काम करणे आणि केवळ सिद्धांत शिकणे यात मोठा फरक आहे.’ नवोदित दिग्दर्शिका शर्वी धोंड यांनी ‘द अवेकनिंग’, ‘इल्यूमिनेट’ आणि ‘स्मोक अँड मिरर्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये फुटबॉल दिग्गज ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्यावर आधारित ‘फ्रॉम गोलपोस्ट टू ग्लोरी’, ‘हर अनफिनिश्ड चॅप्टर्स’, ‘शेरीन्स इंटरमिशन’ तसेच ‘अ वुंडेड पास्ट’ यांचा समावेश आहे. स्वतःला स्त्रीवादी चित्रपटनिर्माती म्हणवून घेणाऱ्या धोंड यांच्या मते, ‘या क्षेत्रात अधिक महिलांची गरज केवळ प्रतिनिधित्वासाठीनाही तर विशिष्ट दृष्टीकोनासाठी आहे. महिलांचे अनुभव आणि सूक्ष्म कथाकथन पारंपरिक चौकटींना आव्हान देऊ शकतात आणि सर्जनशीलतेच्या नव्या शक्यता निर्माण करू शकतात.’
गोमंतकीय चित्रपटसृष्टी सातत्याने विकसित होत असताना लिंग प्रतिनिधित्वाचा प्रश्न तिच्या प्रगतीसाठी महत्वाचा बनून राहिला आहे. सातत्यपूर्ण पाठबळ आणि समान संधी मिळाल्यास गोव्याची चित्रपटसृष्टी निश्चितच अधिक विविध, संतुलित आणि भविष्याभिमुख बनू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.