ती खिडकी, दुहेरी व्यक्तिमत्वाभोवती गुंफलेली कथा; नाट्यसमीक्षा
विकास कांदोळकर
संहितेचा सखोल अभ्यास न केल्यामुळे नाटक सादरीकरणात अपेक्षाभंग झाला असल्याचे स्पष्ट जाणवले. चुकीचे दृश्यबंध, कच्चे पाठांतर, चुकीची संवादफेक आणि अशुद्ध शब्दफेक प्रयोगाच्या असफलतेस कारणीभूत ठरले. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर (डिआयडी) या गंभीर मानसिक स्थितीत असलेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अनुभव येतो. या स्थितीत व्यक्तीचे विचार, वर्तन आणि कृती यांचे विभिन्न दर्शन घडते.
रुद्रेश्वर युवक संघ, पणजी या संस्थेने योगेश सोमण लिखित ‘ती खिडकी’ या नाटकाचा प्रयोग स्पर्धेत सादर केला. नाटक सुरू होताना कळून चुकते की अनिरुद्ध शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा धंदा करतोय व स्वाती ही त्याची बायको आहे. त्यांचे नवीनच लग्न झालेले आहे आणि हनिमूनवरून ते परतलेले असतात. स्वाती काहीशी नाराज वाटल्यामुळे अनिरुद्ध तिला दुसऱ्या दिवशी सिनेमाला जाऊ वगैरे सांगून किंवा मित्रमैत्रिणींच्या गोष्टी विचारून खुश करण्याचा प्रयत्न करतो.
घरात नेट कनेक्शन असते. नवरा बाहेर गेल्यावर स्वाती आपले कपडे फेकून लॅपटॉपवरील म्युझिकवर डान्स करते. डान्स संपल्यावर तिने दोन-तीनदा फोन लावण्याचा प्रयत्न केल्यावर तिला हवा असलेला नंबर लागतो. समोर असलेल्या अनिकेत नावाच्या माणसाला ती आपण निशा असल्याचे सांगते. अनिकेत स्वातीला व्हिडिओ कॉल करण्यास सांगतो. बोलणे सुरू असताना स्वाती त्याला लगेच भेटण्यास सांगते; पण तो संध्याकाळी येणार असे सांगितल्यावर ती त्याची वाट बघत खिडकीपाशी बसते. अंधार होतो.
पुढच्या दृश्यात अनिकेत येतो. दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी होतात. स्वभावाच्या गोष्टी होतात. तो लग्नाविषयी विचारतो तेव्हा आपण आजच भेटल्यामुळे प्रेम आणि लग्न यामध्ये भरपूर वेळाची आवश्यकता असल्याचे ती सांगते. अनिकेत तिच्याशी रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा ती आपले वडील येणार असल्याचे सांगून त्याला कटवते.
ती लॅपटॉपवर काहीतरी करत असताना अनिरुद्ध येतो, तेव्हा त्याला ती ‘अनी’ म्हणून हाक मारते. नवरा-बायकोचे संभाषण सुरू असताना अनिकेतचा दोन-तीन वेळा फोन येतो तेव्हा ती रॉंग नंबर म्हणून सांगते. अनिरुद्ध तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला टाळते. नंतरच्या दृश्यात आपल्या पत्नीची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे अनिरुद्धला तिच्या फोनवरील संभाषणामुळे दिसून येते.
प्रकाश येतो तेव्हा ती खुर्चीवर बसलेली असते व अनिरुद्ध जवळ येताना नाराजी व्यक्त करते. आपल्या इच्छेविरुद्ध त्याच्याशी लग्न केल्याचे सांगते. तो तिला मोकळेपणाने बोलण्यास सांगतो. संभाषणानंतर तिला विश्रांतीची गरज असल्यामुळे ती झोपायला जाताना फोन वाजतो, अंधार होतो.
त्यानंतरच्या दृश्यात अनिकेत येतो तेव्हा ती त्याला डॉक्टर समजून आत घेते. तो आपण अनिकेत असल्याचे सांगून, तिचे बाबा जाताना पाहिल्याचे बघून आत आल्याचे सांगतो, तेव्हा ती घरातून बाहेर गेलेले आपले बाबा नसून आपला नवरा असल्याचे सांगते. तो चकित होतो. ती त्याला घालवून देते. तिला बाबा मारत असल्याचा भास होतो. अनिकेत चांगला मुलगा असल्याचे ती बरळते, एवढ्यात बेल वाजते. ती दरवाजा उघडते आणि समोरच्या अनिरुद्धला आपली आई समजून खुर्चीवर बसवते व बाबांशी पुढील संभाषण करते. एवढ्यात फोन वाजतो आणि समोरून अनिकेत ‘अंकल अनीला फोन द्या’ असे सांगतो व भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. अनिरुद्ध भेटावेच लागेल असे सांगून त्याला बोलावतो.
दुसऱ्या भागात अनिरुद्ध फोनवर बोलत असताना स्वाती अनिकेतबरोबर निशा ‘बनून’ शॉपिंग करून येते व आत जाते अनिकेत आणि अनिरुद्ध यांची ओळख होते. अनिरुद्ध आपण स्वातीचा नवरा असल्याचे सांगून त्याला आपल्या लग्नाचा अल्बम दाखवतो तर अनिकेत आपण निशाचा प्रियकर असल्याचे सांगून लॅपटॉपमधील तिचे सर्व मेसेजेस दाखवतो. निशा आतून बाहेर येते; पण अनिकेतला ओळखत नाही. दोघांना कळून चुकते की स्वाती आणि निशा या दोघेही एकच व्यक्ती आहे.
पुढील दृश्यांत डॉक्टर साने येतात व स्वातीला मल्टिपल पर्सनॅलिटी सिंड्रोमचा आजार झाल्याचे सांगतात व ती बरी व्हायला अनिकेत आणि अनिरुद्ध यांच्या मदतीने उपाय सुरू करतात. शेवटी डॉक्टर एक दीर्घ संमोहनाचे ‘सेशन’ करून तिला झोपेची गरज असल्याचे सांगून आत पाठवतात. डॉक्टर साने हे अनिरुद्ध आणि अनिकेतशी बोलत असतानाच स्वाती परत निशा बनून येते व डान्स करते. डॉक्टर सानेला आपली ट्रीटमेंट फुकट गेल्याचे जाणवून येते.
स्वाती आणि निशा या दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या तरुणीची स्पष्ट पार्श्वभूमी तयार करण्यात आणि ती व्यक्तिमत्त्वे प्रकट होऊन संवाद साधताना, प्रकाशयोजना वगळल्यास इतर अचूक नियमांचे ‘ट्रिगर्स’ दाखवण्यास दिग्दर्शक पांडुरंग गुरुदास पांगम खूपच कमी पडल्याचे दिसले. स्वाती आणि निशा ही व्यक्तिमत्त्वे इतर लोकांना कशी प्रतिक्रिया देतात, यावर फार विचार व्हायला हवा होता.
स्वाती आणि निशा या दुहेरी व्यक्तिमत्त्वाची भूमिका करताना मारिटा सांतान डिसोझा हिने अजून मेहनत घ्यायला पाहिजे होती असे वाटले. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या आवाजाची ठेवण, शैली आणि बोलण्याच्या पद्धती, सवयी, आवडी, नापसंती आणि देहबोली वेगवेगळी असती तर न बोलताही निशा आणि स्वाती ही त्यांच्या भूमिकेत असलेली व्यक्तिमत्त्वे कधी बदलली आहेत हे अचूकपणे कळून चुकले असते.
अनिरुद्धच्या भूमिकेत असलेले अजिंक्य देसाई आपल्या भूमिकेस न्याय देऊ शकले नाहीत. एक श्रीमंत माणूस, स्वातीच्या विलक्षण वागण्याने दुखावलेला नवरा, तिला प्रियकर असल्याचा संशयित नवरा, आजार झाल्याचे कळल्यावर द्विधा मनस्थितील नवरा, ई. भूमिकेतील छटा ते दाखवू शकले नाहीत.
अनिकेतची व्यक्तिरेखा साकारताना सचिन तेंडुलकर खूपच कमी पडले. तसेच डॉक्टर साने झालेले वासुदेव चव्हाण आपल्या अभिनयातून आणि संवादफेकीतून अजिबात छाप पाडू शकले नाहीत. विकृती, भ्रम, व्यक्तिरेखेबाज वर्तन, या स्थितीवर स्वातीवरील मानसिक उपचार तंत्र ते आपल्या अभिनयातून प्रभावीपणे व्यक्त करू शकले नाहीत.
श्रीपाद कुंकळेकर यांची प्रकाशयोजना सदोष होती. उल्हास नाईक यांचे नेपथ्य फारसा प्रभाव पाडू शकले नाही. विशाल आमोणकर यांच्या पार्श्वसंगीतातील कर्कशता सहन होण्यापलीकडे होती. रंगभूषा नित्यानंद पेडणेकर यांची तर वेशभूषा रचना पांगम यांची. निर्मिती प्रमुख सुभाष कृष्णा नाईक, सूत्रधार आनंद माजाळकर, साहाय्यक प्रकाश नाईक, नरेश माणगावकर, शिवानंद रायकर, आयेशा शेट.
स्पर्धेत नावीन्य म्हणून केलेले बरेचसे प्रकार यापूर्वी याच स्पर्धेत जुन्या कला अकादमी (ईडिसी कॉम्प्लेक्स) पासून हाताळले गेल्याची नवीन स्पर्धकांनी कृपया नोंद घ्यावी. फ्रेनल स्पॉट्स ५०० वॉटच्या ऐवजी १००० वॉट झाले, वायर वावुंड डीमरच्या जागी डिएमएक्स डीमर आले; पण नाटकातील ‘वाणी’ शुद्धतेकडून अशुद्धतेकडे जाताना स्पष्टपणे दिसत आहे. ‘ण, न, च, ज, ष, श, स, क्ष’ या अक्षरांचा उच्चार बऱ्याच वेळा अदलाबदल किंवा चुकीच्या पद्धतीने केला जातो. वाचनावर भर दिल्यास हा दोष बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तसेच रंगकर्मींनी प्रेक्षकांना काही देण्यापूर्वी आपल्याजवळ ते असले पाहिजे हे सदोदित ध्यानात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.