

हॉलीवुडमध्ये आपले नाव कमवायला सुरुवात करणाऱ्या नंदन लवंदेबद्दल एका प्रख्यात भारतीय न्यूज वेबसाईटवर एक लेख प्रकाशित झाला आहे. नंदन लवंदे हा गोमंतकीय युवक आहे. पणजी शहरात लहानाचा मोठा झालेल्या नंदनने लॉस एंजलिस मधल्या ‘न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी’मधून सिनेमॅटोग्राफी कोर्स पूर्ण करून तिथेच सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केली आहे.
'who is Nandan Lawande, radical cinematographer creating ripples in Hollywood' (हॉलीवुड मध्ये तरंग निर्माण करणारा सिनेमॅटोग्राफर नंदन लवंदे आहे तरी कोण?) असे शीर्षक असलेल्या या लेखामध्ये, ‘प्रकाशयोजना, रचना आणि हालचाल यासंबंधी त्याला लाभलेल्या अपवादात्मक दृष्टीमुळे त्याला इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करता आले’ अशा शब्दात नंदनचे कौतुक केले गेले आहे. सिनेमॅटोग्राफीमधील त्याच्या कौशल्यामुळे त्याला महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली तसेच आघाडीवर असलेले चित्रपट निर्माते, संगीतकार व उच्च ब्रँड्सकडून त्याला ओळख मिळाली असे म्हटले आहे.
नंदन सिनेमेटोग्राफीचे शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला कसा पोहोचला याची कहाणीही रोचक आहे. सुमारे 10-11 वर्षाचा असताना नंदन आपल्या वडिलांबरोबर शहरात चाललेले एका सिनेमाचे शूटिंग पाहायला गेला होता.
या सिनेमाच्या कॅमेरामनभोवती सारे जण कोंडाळे करून आहेत व त्याला महत्त्वाचा माणूस असल्यासारखी वागणूक मिळते आहे हे पाहून नंदनच्या मनात आपणही सिनेमॅटोग्राफर बनावे अशी ठिणगी त्यावेळी पडली आणि नंतर त्याने स्टील कॅमेरावर फोटोग्राफी करायला सुरुवात केली. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यातील एका विद्यापीठातून त्याने चार वर्षांचा फिल्म मेकिंगमध्ये मास कम्युनिकेशन कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये सिनेमॅटोग्राफर बनण्याच्या इच्छेने प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना ‘रिट्रायव्हल’ या सिनेमाची सिनेमॅटग्राफी स्वतंत्रपणे करण्याची संधी त्याला मिळाली. या सिनेमाला पुढे बाफ्ता या प्रतिष्ठेच्या चित्रपट स्पर्धेत नामांकन देखील मिळाले होते.
'ठळक कथाकथन, भावनात्मक खोली, तांत्रिक अचूकता या वैशिष्ट्यांनी युक्त असलेली नंदनची सिनेमॅटोग्राफी चित्रपट, संगीत व्हिडिओ किंवा उच्च दर्जाच्या जाहिराती अशा प्रत्येक शैलींशी सहजपणे जुळवून घेते. दृश्य माध्यमातून कथा आकर्षक बनवण्याच्या त्याच्या हातोटीने हॉलीवुडमधील सिनेमॅटोग्राफीच्या स्पर्धात्मक जगात त्याने आपले स्थान भक्कमरीत्या स्थापित केले आहे’ असेही हा लेख पुढे म्हणतो.
‘प्रोसेसिंग चार्ली’ हा कृष्णधवल चित्रपट नंदनच्या उल्लेखनीय प्रकल्पांपैकी एक आहे, जो प्रकाश-सावलीवर त्याचे प्रभुत्व दर्शवतो, असे या लेखात म्हटले आहे. त्याशिवाय 'वंदे भारत व्हाया अमेरिका' हा त्याचा आणखीन एक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात लॉस एंजलिसमध्ये झाले आहे आणि जून २०२५ मध्ये हा चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'टेल मी' या त्याच्या म्युझिक व्हिडिओने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे ज्यात करण औजला आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे.
स्वतंत्र चित्रपट ते आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवण्यापर्यंत नंदनचा प्रवास प्रेरणादायी आहे. युनायटेड स्टेट्समध्ये त्याचे अनेक मोठे प्रकल्प रांगेत आहेत आणि हॉलीवुडमधील त्याची वाटचाल ही त्याची प्रतिभा, समर्पितता आणि कलात्मकतेच्या क्षमतेचा पुरावा आहे असेही हा लेख म्हणतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.