'नवे' घडवण्यासाठी नाटकवाल्यांनी जीवाचे रान करायला नको काय? राज्य नाट्यस्पर्धेसाठी दुसऱ्यांच्या 'ऐवजावर' विसंबून का? विशेष लेख

Goa State Drama Competition: गोव्यातील नाट्यसंस्था स्पर्धेत नाटक सादर करण्यासाठी पैसे व्यवस्थित खर्च करतात. कुठल्याही प्रकारे तडजोड न करता 'लॅविश' म्हणावीत अशी नाटके या स्पर्धेत सादर झालेली आहेत.
Goa State Marathi Drama Competition
Goa State Drama CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa State Marathi Drama Competition

गोव्यातील ‘अ’ गट मराठी राज्य नाट्य स्पर्धा अतिशय चांगली झाली. स्पर्धेत अनेक नाटके सशक्तपणे सादर झाली. फक्त त्यातली एक बाब आम्हा परीक्षकाला खटकली ती म्हणजे या स्पर्धेतील बहुतेक नाटके रूपांतरित किंवा अनुवादित होती.‌ स्पर्धेतील, 'का?'‌ (लेखिका डॉ. स्मिता जांभळे) आणि 'आक्रंद' (लेखक संजीव बर्वे) या दोनच नाटकांच्या संहिता स्वतंत्र होत्या आणि त्या खास स्पर्धेकरता लिहिल्या गेल्या होत्या. 

अनुवादित किंवा रुपांतरीत नाटकांसंबंधी अडचण ही असते की त्याचे मूळ लेखन हे फार कमी लोकांनी वाचलेले असते. त्यामुळे काही प्रेक्षकांना त्यातील आशय समजून घेणे कठीण जाते.‌ जर या स्पर्धेत स्वतंत्र नाटके अधिक सादर झाली असती तर प्रेक्षकांनाही ते अधिक आनंदाचे झाले असते. 

या स्पर्धेत 'मीडिया' आणि 'वुमन' या दोन्ही अनुवादित रूपांतरित नाटकांना प्रथम आणि द्वितीय बक्षिसे लाभली. तिसरे पारितोषिक मिळवणाऱ्या 'लिअरने जगावे की मरावे?' ची संहिताही स्वतंत्र नव्हती.‌ मात्र ही नाटके चांगली सादर झाल्यामुळे व त्यातील कलाकारांनी चांगले काम केल्यामुळे स्वतंत्र संहिता लिहून सादर झालेली नाटके आपोआप मागे पडली. स्वतंत्र संहिता असलेल्या नाटकांचा विचार आम्ही बक्षीसांसाठी केलाच होता परंतु चांगल्या पद्धतीने सादर झालेल्या नाटकांवर आम्ही अन्याय करू शकत नव्हतो. 

गोव्यातील नाट्यसंस्था स्पर्धेत नाटक सादर करण्यासाठी  पैसे व्यवस्थित खर्च करतात. कुठल्याही प्रकारे तडजोड न करता 'लॅविश' म्हणावीत अशी नाटके या स्पर्धेत सादर झालेली आहेत. प्रकाश योजना, नेपथ्य यावर खर्च केलेला दिसून येतो. या स्पर्धेतली बरीचशी नाटके तांत्रिक बाबतीत उजवी होती असेच मी म्हणेन.

मेहनतीच्या दृष्टीने देखील गोमंतकीय कलाकार मागे नाही. मात्र त्याची सारी कामगिरी ही 'दुसऱ्याच्या जीवावर' झाली आहे असेच प्रत्ययास येत होते. स्वतःच्या जीवावर सादर झालेली नाटके पाहण्यास मिळतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्याबाबतीत आमचा विरसच झाला. नाटकासाठी जर तुम्ही एवढी मेहनत घेता तर स्वतंत्र संहितेच्या बाबतीत तुम्ही मागे का? 

स्पर्धेत सादर झालेल्या 'का?' या नाटकाचा विचार केल्यास त्यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिलेले आपल्याला दिसतात. मी अशा आठ प्रश्नांची यादी केली होती. या लिखाणातील चुका आहेत.‌ अशा चुका टाळाव्यात म्हणून  लेखकांना मार्गदर्शन होणे गरजेचे असते. हे नाटक, त्यातील चुका टाळून आणि त्याचे पुनर्लेखन करून सादर झाल्यास एक उत्तम व्यावसायिक नाटक ठरू शकते. 'आक्रंद' या नाटकाचा विषय देखील खूप चांगला होता.

मात्र तो मांडण्यासाठी कलाकार कमी पडले. या संस्थेकडे कलाकारांची फौज आहे परंतु ही फौज बरीच लंगडी वाटली. या नाटकाच्या लिखाणातही दोष आहेच. ‘का?’ आणि ‘आक्रंद’ ही दोन्ही नाटके स्वतंत्र आहेत परंतु केवळ स्वतंत्र संहिता हा बक्षीसाचा निकष होऊ शकत नाही. त्यासाठी सादरीकरणही तसेच सशक्त असावे लागते.

संहितेतील दोष टाळून आणि चांगल्या कलाकारांनीशी ही नाटके सादर झाली असती तर नक्कीच ती पुढे गेली असती. चांगल्या संहिता तयार होण्यासाठी कला अकादमी किंवा तशाच प्रकारच्या अन्य संस्थांनी पावले उचलणे आता गरजेचे आहे. नाट्यलेखन शिबिर वगैरे आयोजित करून स्थानिक विषयांवर आधारित नाट्यसंहिता निर्माण व्हाव्यात या दृष्टीने गोव्यात प्रयत्न व्हायलाच हवे. खरंतर आपण दुसऱ्यांच्या 'ऐवजावर' विसंबून का राहावं हाच विचार मुळात व्हायला हवा. 

गोमंतकीय अभिनेत्या कलाकारांच्या मराठी भाषेचा टोनही थोडा खटकणारा आहे. मात्र परीक्षक म्हणून आम्ही त्याचा फारसा बाऊ केला नाही. खरंतर गोव्यात अशी मराठी नाटके होतात याचेच कौतुक करायला हवे. 'गुन्हा', 'पुन्हा', 'उद्या' वगैरे शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारले जात होते.‌ पण भाषेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास माणूस जर गुजरातचा असेल तर तो मराठी भाषा आपल्या गुजराती वळणानेच बोलेल. अर्थात, भाषेच्या बाबतीत, ज्यांनी मेहनत घ्यायची त्यांनी ती घेतलीच आहे हे देखील काही नाटके पाहताना कळून येत होते.‌ 

Goa State Marathi Drama Competition
Shankhasur Kala Goa: शंखासुराची जुगलबंदी आणि मुखवट्यांनी रंगणारा कालोत्सव

शेवटी कठोरपणे बोलायचे झाल्यास नाट्यस्पर्धांच्या बाबतीत आता असा नियमच व्हायला हवा की त्यात फक्त स्वतंत्र नाटके संस्थांना सादर करता येतील.‌ रूपांतरित, अनुवादित नाटकांना त्यात अजिबात स्थान असता कामा नये. त्यासाठी हवे असल्यास अन्य स्पर्धा घेतल्या जाव्या. त्यातून स्पर्धेत सादर होणार्‍या नाटकांची संख्या कदाचित कमी होऊ शकेल पण त्यातूनही काही साध्य होऊ शकेल.‌ पण हे बदलणार कोण? सांस्कृतिक क्षेत्रात आता पूर्वीसारखं वातावरण राहिलेले नाही. जाणकारांना हाताशी धरून काही केलं तरच यात बदल होऊ शकेल.

Goa State Marathi Drama Competition
Kala Academy: नाट्यगृह की कचरा अड्डा? कला अकादमी परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

व्यावसायिक नाटके तर या स्पर्धेत सादर होताच कामा नये असे नियम या स्पर्धेसाठी लागू व्हायलाच हवे तरच प्रेक्षकांना काही नवे मिळू शकेल.‌ प्रत्येक चार-पाच केंद्रांमागे एक 'किरवंत' किंवा 'हणम्याची मरीआई' असतेच. असे होत राहिल्यास नवे येणार तरी कधी? विसंगतीवरच बोट दाखवायचे झाल्यास 'लियर....' यामध्ये नायक नवीन पिढी घडवण्यासाठी जीवाचे रान करतो. तो जसे जीवाचे रान करतो तसे मग नवे घडवण्यासाठी नाटकवाल्यांनीही जीवाचे रान करायला नको काय? की आपले नवी पिढी घडवण्याचे काम नाटकातच दाखवत राहणार? नाक दाबले तर तोंड उघडते असे म्हणतात. कुणीतरी नाक दाबायलाच हवे.....

विष्णू केतकर

‘अ’ गट मराठी राज्यनाट्य स्पर्धा परीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com