

पणजी: यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अधिकृत विभागात एकही गोमंतकीय चित्रपट नसल्याने टीका होऊ लागली असतानाच इंडियन पॅनोरमामध्ये स्पेशल स्क्रिनिंग गटात ‘क्लावदिया’ या कोकणी चित्रपटाला स्थान मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही उल्लेखनीय बाब असल्याचे कोकणी चित्रपट निर्माते राजेंद्र तालक यांनी म्हटले आहे. तेच या चित्रपटाचे निर्माते/दिग्दर्शक आहेत.
पणजीतील आयनॉक्स ऑडी : ३ या चित्रपटगृहात २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता ‘क्लावदिया’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार असल्याचे तालक यांनी सांगितले. इफ्फीचे प्रकाश मगदुम यांच्याकडून त्यांना तसेच पत्र मिळाले. या सिनेमाचे अधिकृत प्रदर्शन १९ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट यंदाच्या इफ्फीत झळकणार आहे.
दरम्यान, ‘ईएसजी’चे माजी प्रशासकीय मंडळ सदस्य विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे की, ‘ईएसजी’ने दोन दशके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. मात्र राज्यात आजपर्यंत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक अशा मूलभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत.
इफ्फीचा अधिकृत विभाग असो वा अन्य विभाग असो, यावेळीही या महोत्सवात कोकणी सिनेमा दिसणार आहे आणि माझ्या मते समस्त गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. अधिकृत विभाग आणि इतर विभाग हा वादच मुळी चुकीचा आहे. इफ्फीत आत्तापर्यंत कोकणी चित्रपटांना स्थान मिळत आले आहे. यातून कलाकार आणि निर्माते प्रेरणा घेऊन भविष्यात आणखी चांगले कोकणी चित्रपट निर्माण करू शकतील.
- राजेंद्र तालक, कोकणी सिनेनिर्माते/दिग्दर्शक
इफ्फीच्या अधिकृत विभागात एकही गोमंतकीय चित्रपट नसल्याने गोवा मनोरंजन संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोवा इफ्फीचे यजमानपद भूषवत असूनही गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यात गोवा मनोरंजन संस्था अपयशी ठरली आहे.
- विशाल पै काकोडे, माजी प्रशासकीय मंडळ सदस्य (ईएसजी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.