Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Sandhya Biography: ‘दिसला गं बाई दिसला’, ‘छबीदार छबी’, ‘तुम्हावर मर्जी केली बहाल’, ‘मला लागली कोणाची उचकी’ यांसारख्या संध्यांवर चित्रित केलेल्या गाण्यांनी तर त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
Actress Sandhya
Actress SandhyaDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

हिंदी - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री संध्या शांताराम परवा कालवश झाल्या. संध्या शांताराम ज्यांना संध्या म्हणून ओळखले जायचे त्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका महान पर्वाच्या साक्षीदार होत्या. त्यांनी मराठी चित्रपट केले तसेच हिंदी चित्रपटही गाजविले.

प्रख्यात निर्माते दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा ‘अमर भूपाली’ हा संध्याचा पहिला चित्रपट. तिथून त्यांची व शांताराम बापूंची जोडी जमली ती शेवटपर्यंत कायम राहिली. दोघांनी विवाह तर केलाच पण त्याचबरोबर ’एक से बढकर एक’ असे समाज प्रबोधन करणारे चित्रपटही दिले. शांताराम बापूंचे कुशल दिग्दर्शन व संध्यांचा वेधक अभिनय यामुळे चित्रपटाना ’चार चांद’ लागू शकले.

१९५३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तीन बत्ती चार रास्ते’ या चित्रपटात शांतारामबापूंनी तेव्हाच्या प्रचलित असलेल्या काही सामाजिक त्रुटींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता.

संध्या यांनी या चित्रपटातली प्रमुख भूमिका तेवढ्याच प्रभावीपणे साकारली होती. पण संध्या खरी प्रकाशात आली ती १९५५साली प्रदर्शित झालेल्या शांताराम बापूच्याच ’झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटापासून.

हा चित्रपट नृत्यावर आधारित असल्यामुळे संध्यापुढे मोठे आव्हान होते. त्यात परत नृत्यांचा बादशहा गोपीकृष्ण प्रमुख भूमिकेत असल्यामुळे संध्याचे आव्हान अधिकच वाढले होते. पण संध्यानी आपल्या पदन्यासामध्ये बदल करून ही भूमिका जिवंत केली.

’नैन को नैन नाही मिलाओ’ या गाण्यात याचा प्रत्यय येतो. या गाण्यावर त्या काळात लोक चित्रपटगृह डोक्यावर घेत असत. टेक्निकलर असल्यामुळे या नृत्यांना वेगळीच लज्जत प्राप्त झाली होती. या चित्रपटाने सुवर्णमहोत्सव साजरा केला आणि तिथूनच ‘संध्यापर्वा’चा उदय झाला.

संध्याची खासियत म्हणजे भूमिकेचा अभ्यास करणे आणि त्याकरता कितीही कष्ट घेणे. ‘नवरंग’ या शांताराम बापूच्याच १९५९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचेच उदाहरण घ्या. या चित्रपटातला कवी पत्नीला कंटाळून आपल्या मनातील कल्पनांना मूर्तस्वरूप देण्याचा प्रयत्न करतो.

त्यामुळे संध्या यांना कवींची खेडवळ पत्नी व त्यांच्या मनातली नृत्यांगना अशी दोन प्रकारची भूमिका साकार करावी लागली. संध्यांनी ही भूमिका अक्षरशः गाजवून सोडली. त्यातल्या ’जा रे नटखट’ या गाण्यातला त्यांचा नृत्याविष्कार तर बघण्यासारखाच!

एका बाजूला पुरुष आणि दुसर्‍या बाजूला स्त्री अशा वेषात केलेले त्यांचे ते नृत्य आजसुद्धा मन मोहवून टाकते. त्याचप्रमाणे डोक्यावर सात कळश्या घेऊन ’आधा है चंद्रमा’ या एव्हरग्रीन गाण्यावर केलेले नृत्यही लोकांनी त्या काळात डोक्यावर घेतले होते.

‘नवरंग’ही सुवर्ण महोत्सवी ठरला. त्यानंतरचा ’सेहरा’हा चित्रपटही त्यांनी गाजवून सोडला. पण १९७१साली प्रदर्शित झालेल्या ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटाने या सर्वांवर कहर केला. तमाशापट असूनसुद्धा ’पिंजरा’ मराठीतील एक ‘माइलस्टोन’ चित्रपट ठरला.

सुडाने पेटलेली एक तमासगिरीण, गावाचा आदर्श असलेल्या मास्तराची कशी वाट लावते आणि शेवटी त्याच्याच प्रेमापोटी आपला कसा अंत करून घेते याचे वेधक चित्रण शांतारामबापूंनी या चित्रपटात केले आहे. यातली संध्यांनी साकारलेली तमासगिरीण तर लाजवाबच.

चित्रपटाच्या शेवटी वाचा गेल्यामुळे हावभावांनी आपली व्यथा मांडू पाहणारी संध्या तर अविस्मरणीयच. ‘माणूस मेला म्हणून त्याचा आदर्श मरत नसतो’, हा या चित्रपटाचा संदेश लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्यात मास्तर झालेल्या डॉ. श्रीराम लागू एवढाच संध्याचाही वाटा होता.

‘दिसला गं बाई दिसला’, ‘छबीदार छबी’, ‘तुम्हावर मर्जी केली बहाल’, ‘मला लागली कोणाची उचकी’ यांसारख्या संध्यांवर चित्रित केलेल्या गाण्यांनी तर त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

हा चित्रपट त्या काळात एवढा यशस्वी झाला की त्याच्यापुढे बॉलिवुडातले त्यावेळचे ’जॉनी मेरा नाम’सारखे सुपरहिट चित्रपटसुद्धा फिके पडले होते. त्यानंतरचा तिचा ’चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ हा चित्रपटसुद्धा चांगला यशस्वी ठरला. ‘जल बीन मछली नृत्य बिन बिजली’ या चित्रपटातले तिचे सर्पनृत्य तर आजसुद्धा मनाची तार छेडल्याशिवाय राहत नाही.

‘चंदनाची चोळी...’नंतर संध्यानी चित्रपट संन्यास घेतला असला तरी त्यांच्या भूमिका आजही अनेकांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ बनल्या आहेत. संध्याच्या अनेक भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांची सर्वात यादगार ठरलेली भूमिका म्हणजे ’दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटातली ’खिलोने वाली’ची भूमिका.

Actress Sandhya
Katrina Kaif Birthday: रणबीरनं कतरिनाचं नाव ठेवलं 'सॅम्बो'; गोव्यातला 'तो' सीन...

एक जेलर आपल्या सहा कैद्यांना कसा मार्गावर आणतो अशी मध्यवर्ती कथा असलेल्या या चित्रपटाला संध्याच्या भूमिकेने एक भावनिक टच दिला होता. या चित्रपटाची आजसुद्धा बॉलिवुडातल्या क्लासिक चित्रपटांमध्ये गणना केली जाते. त्या काळात या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते.

Actress Sandhya
Actor Sandhya Shetty ... म्हणून सुपरमॉडेल संध्या शेट्टी सांगतेय "माझ्यासाठी लाइफ इज गोवा"

या चित्रपटाचा शेवट तर आजही डोळ्यांत अश्रू उभे केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच चतुरस्र अभिनेत्री संध्याच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्यावर चित्रित केलेले आणि बर्‍याच राष्ट्रांत प्रार्थना म्हणून वापरले गेलेले ‘दो आंखे बारह हाथ’ चित्रपटातले ते अजरामर गाणे यादे झाल्याशिवाय राहत नाही

ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम,

नेकी से चले और बदी से टले, ताकी हंसते हूऐ निकले दम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com