फोंडा: थिएटर फ्लेमिंगोच्या ‘कला साद’ या उपकमांतर्गत "नॉट सो हेडा गॅब्लर" हा एकल नाट्यप्रयोग २१ सप्टेंबर २०२४ रोजी, मॅजिक मुव्हीज एक्झिक्युटिव्ह हॉल, अॅगी-बाजार, फोंडा येथे संध्याकाळी ६.३० वाजता सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन शेफाली नाईक यांनी केले असून त्याचे दिग्दर्शन दक्षा शिरोडकर यांनी केले आहे.
हे नाटक प्रसिद्ध नोर्वेजियन नाटककार हेन्रीक इब्सन यांच्या ‘हेडा गॅब्लर’ या नाटकातील हेडा या प्रसिद्ध पात्रावर आधारलेले आहे. या सोलो सादरीकरणात हेडाच्या कथेला एक नवीन आणि आकर्षक रूप दिले गेले आहे.
हेडा गॅब्लर हे नाटक हेन्रिक इब्सेनने सुमारे १२५ वर्षांपूर्वी (इ.स. १८९०) लिहिले आहे. त्यातील हेडा हे पात्र आपल्या संसाराबद्दल आणि घराबद्दल समाधानी नाही.
नाटकातील ही नायिका पारंपरिकदृष्ट्या सद्गुणी नाही, परंतु ती तिच्या नियंत्रणाबाहेरील शक्तीची बळी आहे असे मानून इब्सेन तिच्याशी सहानुभूतीने वागतो असे अनेकांना त्यावेळी वाटले व कदाचित त्यामुळेच या नाटकावर त्याकाळी खूप टीका झाली होती. (मात्र पुढील काळात एक 'मास्टरपीस' म्हणून हे नाटक गौरवले गेले आहे.)
नाटकात नाटकातील प्रेममुल्ये, नैतिक वातावरण, त्यातील काही पात्रांचे बुर्ज्वा वास्तव यातील संघर्षातून हेडाची शोकांतिका आकाराला येते. नैतिकतेच्या आणि सत्तेच्या (पॉवर) मूल्यांवरून चर्चेचा विषय झालेल्या या नाटकातील मुख्य पात्राला एक गोमंतकीय लेखिका (आणि दिग्दर्शिका) कशाप्रकारे सादर करते ते पाहणे औत्सुक्याचे असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.