

मिलिंद म्हाडगुत
बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट २०२५साली प्रदर्शित झाले. पण हे वर्ष गाजविले ते वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटानेच. वर्षाच्या सुरुवातीला संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ व नंतर सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेला ‘सैंयारा’ हे दोन चित्रपट वगळल्यास बॉलिवूडच्या दृष्टीने २०२५साल तसे सरपटतच चालले होते.
मोठमोठे चित्रपट ‘फ्लॉप’ ठरल्यामुळे हे वर्ष बॉलिवूडच्या दृष्टीने निराशाजनक ठरणार असाच अंदाज व्यक्त केला जात होता. पण ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिस ढवळून टाकले.
आतापर्यंत या चित्रपटाने भारतात सातशे कोटीहून अधिक ‘नेट’ व्यवसाय केला आहे असून जगभरात ‘ग्रॉस’ मिळकत एक हजार कोटींच्या पुढे गेली आहे. अजूनही या चित्रपटाची ‘सुनामी’ सुरूच आहे. या चित्रपटाचा झंझावात एवढा मोठा होता की त्याच्यासमोर प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर भुईसपाट झाले.
‘शोले दि फायनल कट’ या चित्रपटाचे उदाहरण घ्या. शोले या ऑल टाइम हिट चित्रपटाची ओरिजिनल आवृत्ती अशी प्रसिद्धी करून प्रदर्शित झालेला हा चित्रपट जेमतेम दोन कोटींचा व्यवसाय करू शकला. सुरुवातीला १९७५ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा या चित्रपटाने तीस कोटींचा (त्यावेळचे) व्यवसाय केला होता.
यातूनच या चित्रपटाच्या नव्याने प्रदर्शित झालेल्या आवृत्तीची हालत अधोरेखित होते. ‘धुरंधर’ चित्रपटाच्या स्पर्धेमुळे अनेक मराठी- हिंदी चित्रपट नेस्तनाबूद झाले.
करण जोहरचा ‘तू मेरी मै तेरा, मै तेरी तू मेरा’ हा नाताळाच्या दिवशी प्रदर्शित झालेला चित्रपट तर चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर शेवटचे आचके देताना दिसत आहे. ‘धुरंधर’ची पकड मात्र अजूनही कायम आहे. त्याचे सध्याचे वाढते यश पाहता तो ‘ऑलटाइम ब्लॉकबस्टर’ चित्रपट बनू शकतो असे चित्र दिसत आहे.
यावर्षी एकूण १०८ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी बहुतेक अपयशी ठरले. वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या विकी कौशल- अक्षय खन्ना अभिनित ‘छावा’ चित्रपटाने पाचशे कोटीहून अधिक व्यवसाय करून छत्रपती संभाजी महाराजांची महती अधोरेखित केली.
‘सैंयारा’ या प्रणयकथेवर आधारित असलेल्या चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला. मात्र यावर्षी अनेक बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर धारातीर्थी पडलेले बघायला मिळाले. सलमान खानचा ‘सिकंदर’ हा यांपैकीच एक.
मोठी अपेक्षा घेऊन आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भुईसपाट झाला. तीच गोष्ट ‘सन ऑफ सरदार २’, ‘वॉर २’, ‘हाउसफुल ५’, ‘धडक २’ या सिक्वेल चित्रपटांची. ‘परमसुंदरी’, ‘स्काय फोर्स’, ‘केसरी चॅप्टर २’, हे बिग बजेट चित्रपटही साधारण व्यवसाय करू शकले. हे पाहता यंदा अनेक मोठ्या चित्रपटांनी आपले हात पोळून घेतले असेच म्हणावे लागेल.
यंदाचा सर्वात दर्जेदार चित्रपट म्हणून आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाकडे बोट दाखवावे लागेल. दिव्यांग मुलांची व्यथा मांडणारा, तसेच त्यांच्यात जिद्द निर्माण करणारा हा चित्रपट सुजाण प्रेक्षकांची मने जिंकून गेला. उपदेशाचा डोस न देता केवळ घटनांद्वारा परिस्थितीशी लढण्याचा मार्ग दाखवणारा हा चित्रपट खरोखर ‘हटके’होता.
आमिर खानशिवाय कोणताही मोठा अभिनेता नसूनही ‘सितारे जमीन पर’ लक्षणीय ठरला. आमिर खानच्याच २००७साली प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटासारखा असलेला हा ‘सितारे जमीन पर’ बॉलिवूडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून गेला हे निश्चित.
रणवीर सिंग, अजय देवगन, अक्षय कुमार, हृतिक रोशन या सगळ्या आघाडीच्या नायकांचे चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले असले तरी व्यावसायिकदृष्ट्या विचार केल्यास हे वर्ष अक्षय खन्नाच्या नावावर जमा करावे लागेल.
‘छावा’मधला त्याचा तो औरंगजेब व ‘धुरंधर’मधला त्याचा तो रेहमान डकैत लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. २०२४पर्यंत कोणाच्या विशेष खिजगणतीत नसलेला अक्षय यावर्षी ‘टॉक ऑफ दि टाऊन’ बनला. शाहरुख खानचा मात्र एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही.
मनोज कुमार, सुलक्षणा पंडित, असरानी, कामिनी कौशल, सतीश शहा या बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी यावर्षी जगाला रामराम ठोकला. पण यात जास्त मनाला वेदना करून गेली ती ६५ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या धर्मेंद्रची ‘एक्झिट’. अजूनही त्यांच्या मृत्यूचे पडसाद रसिकांच्या मनावर उमटत आहेत.
बॉलिवूड चित्रपट तांत्रिकदृष्ट्या व अभिनयदृष्ट्या परिपूर्ण होत चालले असले तरी संगीताच्या दृष्टीने मात्र त्यांची पीछेहाट होत चालली असल्याचे या वर्षाने परत एकदा दाखवून दिले.
काही का असेना ‘धुरंधर’ चित्रपटाचे ‘न भूतो न भविष्यति’ यश हाच २०२५सालच्या हिंदी चित्रपटांचा मानबिंदू ठरला असून त्यामुळे हे वर्ष ‘धुरंधर वर्ष’ म्हणून इतिहासात नोंदले जाईल हे निश्चित. तरी या वर्षाला व खास करून धर्मेंद्र यांना अलविदा करताना शोलेच्या त्या लोकप्रिय गाण्याचीच याद यायला लागते
ये दोस्ती हम नही तोडेंगे
तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.