Monte Festival: नृत्य, गीत, संगीताचा बहार! मोन्त फेस्टिवल; तारखा जाणून घ्या

Monte Festival Goa: संध्याकाळच्या नयनरम्य नैसर्गिक पार्श्वभूमीवर दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या ‘मोन्त फेस्टिवल’ची २३वी आवृत्ती येत्या ३१ जानेवारीला पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे.
Monte Festival Goa
Monte Festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संध्याकाळच्या नयनरम्य नैसर्गिक पार्श्वभूमीवर दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या ‘मोन्त फेस्टिवल’ची २३वी आवृत्ती येत्या ३१ जानेवारीला पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. ओल्ड गोवा येथील ‘चॅपल ऑफ नोसा सेनोरा दी मोन्त’ येथे‌ ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे तीन दिवस नृत्य-गीत-संगीताचा हा बहारदार महोत्सव पार पडणार आहे.

त्याशिवाय या महोत्सवाचा भाग म्हणून नवी दिल्ली येथे ६ फेब्रुवारी रोजी एक विशेष संगीत मैफल होणार आहे. ‘फुंदासांव ओरिएंट’ गोव्यात आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करत असल्याने मोन्त फेस्टिवल अशाप्रकारे यंदा चार दिवसांचा बनला आहे.

ग्रॅमी पुरस्कार विजेते सतारवादक असाद खान आणि प्रतिभावंत पोर्तुगीज गिटारिस्ट रिकार्डो मार्टिन्स हे पहिल्या दिवशी एकत्र येऊन जादुई वातावरण निर्माण करतील. भारत आणि पोर्तुगाल या दोन देशांमधील प्रतिष्ठित वाद्ये- सतार आणि पोर्तुगीज गिटार,  यामधून निर्माण होणारे संगीत ही एकप्रकारे दोन्ही देशांना दिलेली मानवंदना असेल. त्यानंतर त्याच रात्री गोव्यातील ‘एकचार’‌ ही संस्था स्थानिक लोककला, समकालीन संगीत आणि फादो (पोर्तुगीज गायन प्रकार) सादर करणार आहे. प्रेक्षकांसाठी हा आगळा इंडो-पोर्तुगीज अनुभव असेल. 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, १ फेब्रुवारी रोजी, पहिल्या सत्रात प्रसिद्ध ‘नृत्योर्मी स्कूल ऑफ ओडिसी’चे कृष्णेंदू साहा आणि त्यांचे शिष्य ‘प्रवाह- अ ब्लेसिंग’ हे ओडिसी नृत्य सादरीकरण असेल. त्यानंतरच्या सत्रात वर्ल्ड व्हायोलिन फ्युजनमध्ये शरतचंद्र श्रीवास्तव आणि त्यांचे पुत्र राघव चंद्र यांच्यामध्ये हिंदुस्तानी अभिजात जुगलबंदी सादर होईल. 

Monte Festival Goa
Serendipity Arts Festival: 'सेरेंडिपिटी'मध्ये रंगला अनोखा उपक्रम; मुलांनी गिरवले शाश्वत वास्तूरचनेचे धडे

रविवार २ जानेवारी या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात राजस्थानमधील मांगनियार ही प्रसिद्ध गायन शैली सादर होणार आहे.‌ मांगनियार समुदायाकडून सादर होणारा‌ हा जगप्रसिद्ध संगीत प्रकार आहे. मानव, निसर्ग, मोक्ष यावर आधारित रचना या संगीत प्रकारात गायल्या जातात.

त्यानंतर महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात नव्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध फादो गायिका कुका रोसेटा ‘मांडवी-तेजो’ या आपल्या कार्यक्रमातून गोव्यातील मांडवी आणि पोर्तुगालमधील तेजो या दोन्ही नद्यांचे महत्त्व सूचित करणार आहे. फादो, गोमंतकीय ताल, लिस्बनचे संगीत, मोझंबीकमधील (गोमंतकीय वंशाचे) वादक मिळून तयार झालेले हे सादरीकरण बहारदार असेल. 

Monte Festival Goa
Serendipity Arts Festival: हरवलेल्या आवाजाची गोष्ट; 'सेरेंडिपिटी'त सादर झालेले खास सादरीकरण

सोळाव्या शतकातील ‘अवर लेडी ऑफ द मोन्त’ या चॅपलच्या परिसरात २००२ या वर्षी सुरू झालेला हा महोत्सव फुंदासांव ओरिएंट ही संस्था आयोजित करत असते.‌ दर दिवशी संध्याकाळी ५.४५ वाजता या महोत्सवातील कार्यक्रमांना सुरुवात होईल.‌ हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.‌ महोत्सवाच्या काळात ओल्ड गोवा येथील गांधी सर्कलपासून कार्यक्रमाच्या स्थळी जाण्यासाठी शटल सेवा उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com