सांगेच्या तिरंगी लढतीत कोण होणार ‘सिकंदर’?

फळदेसाई, गावकरांपुढे सावित्रीचे आव्हान : ‘आप’ही शर्यतीत
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

सांगे मतदारसंघात सध्या भाजप विरूध्द भाजप अशी चकमक घडत असून त्याचा फायदा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रसाद गावकर हे घेऊ शकतात. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री या भाजपच्या इच्छुक उमेदवार होत्या. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी दणक्यात कार्यही सुरु केले होते. कोविड संक्रमणाच्या काळातही त्या हिरीरीने वावरल्या होत्या. दुसऱ्या बाजूला माजी आमदार सुभाष फळदेसाई हे आपल्या परीने कार्य करताना दिसत होते. त्यामुळे उमेदवारीवर दोघांचाही दावा होता. पण भाजपने शेवटी उमेदवारी फळदेसाईंच्या पदरात टाकली. त्यामुळे सावित्रीने बंडाचा ‘झेंडा’ उभारून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे ठरविले. (Who will be winner in sanguem triangular fight for goa assembly election)

Goa Assembly Election 2022
वाळपईत विश्वजीत राणेंची ‘घोडदौड’ रोखणार कोण?

सावित्री बरोबर भाजपचे (Goa BJP) अनेक कार्यकर्ते दिसत असून सांगे भाजपचे माजी गटाध्यक्ष नवनाथ नाईक हे सुध्दा सावित्री कवळेकरांसाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचे दिसताहेत. फळदेसाईही आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मतदारसंघ पिंजून काढायला लागले आहेत. फळदेसाई यापूर्वी सांगेचे आमदार असल्यामुळे त्यांचा या मतदारसंघाशी चांगलाच संपर्क आहे. दुसऱ्या बाजूला सावित्रींनी गेल्या खेपेला कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. आणि त्यांना त्यावेळी 6000 च्या आसपास मते मिळाली होती. हे पाहता त्यांनाही या मतदारसंघाचा बऱ्यापैकी अनुभव असल्याचे दिसून येते.

1994 साली कॉंग्रेसच्या (Goa Congress) पांडू वासू नाईक यांनी हा मतदारसंघ परत एकदा कॉंग्रेसच्या कह्यात आणला. मात्र 1999 ते 2012 पर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या कह्यात राहिला. 2017 साली मात्र प्रसाद गांवकरानी हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. आता यावेळी सांगे कोणाकडे जातो ते बघावे लागेल. नुकत्याच झालेल्या सांगे नगरपालिका निवडणुकीत सुभाष फळदेसाईंच्या पॅनलचा विजय झाला होता. पण त्यावेळी सावित्रींनी फक्त एकाच प्रभागात उमेदवार उतरविला होता. आणि विशेष म्हणजे तो उमेदवार जिंकूनही आला होता. मात्र प्रसाद गावकर यांच्या पॅनलला अपयशाचे तोंड पाहवे लागले होते. अर्थात त्यावेळी प्रसाद हे अपक्ष आमदार होते. आता कॉंग्रेस सोबत असल्यामुळे त्यांची ताकद वाढल्यासारखी झाली आहे. त्याचबरोबर अभिजित देसाई (आप),राखी नाईक (तृणमूल), डॉमनिक बेरेटो (राष्ट्रवादी), सुनिल गांवकर( रिव्होल्युशनरी गोवन्स) रमेश वेलिंगकर (अपक्ष) हे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Goa Assembly Election 2022
मांद्रेत रंगणार 'हाय व्होल्टेज' लढत

सांगे हा तसा हा या दक्षिण गोव्यातील एक ग्रामीण मतदारसंघ. या मतदारसंघावर पूर्वी मगोपचे वर्चस्व असायचे. 1980 साली कॉंग्रेसच्या गुरुदास तारी यांनी सांगेवर कब्जा करून हे वर्चस्व संपुष्टात आणले. 84 साली कॉंग्रेसतर्फे पांडू वासू नाईक यांनी या यशाची पुनरावृत्ती केली. पण 1989 साली मगोपच्या राणू प्रभुदेसाई यांनी हा मतदारसंघ परत खेचून आणला.

तृणमूलतर्फे (Goa TMC) राखी नाईक यांना उमेदवारी दिली असली तरी राखी या राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी अनेक घरे फिरलेली असल्यामुळे त्यांची या मतदारसंघातील विश्वासार्हता कमी झाल्यासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे बघावे लागेल.

राष्ट्रवादीतर्फे डॉमनिक बारेटो तर आरजीतर्फे सुनील गावकर हे रिंगणात उतरले असले तरी त्यांचा एकंदरीत निकालावर काय परिणाम होईल, याचा अंदाज येणे कठीण आहे. पण सध्या सावित्री कवळेकर व सुभाष फळदेसाई यांच्या लढतीवर सांगेत चर्चा सुरू आहे. आता या दोघांमध्ये कोणाची नाव पैलतीरी लागते का,मधल्यामधी प्रसाद गावकर बाजी मारतात, की आपचे अभिजित देसाई या तिरंगी लढतीचा लाभ घेतात,हे लवकरच कळेल.

दोघांच्या भांडण तिसऱ्याचा लाभ?

कॉंग्रेसने माजी आमदार प्रसाद गांवकर यांना उमेदवारी दिली आहे. प्रसाद हे 2017 साली फळदेसाईंवर मात करून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी मतांच्या जोरावर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले होते. आता त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केल्यामुळे समीकरण बदलले आहे. ‘दोघांच्या भांडण तिसऱ्याचा लाभ’ या उक्तीप्रमाणे सावित्री व सुभाष यांच्या भांडणाचा लाभ प्रसाद यांना मिळतो,की काय अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

सांगेत आप ची जोरदार तयारी

अभिजित देसाई हे पूर्वी कॉंग्रेसचे सदस्य होते. पण आता त्यांनी आपचा ‘झाडू’ हाती घेतला आहे. आता ते किती लढत देतात ते बघावे लागेल.अभिजीत देसाई हे आपतर्फे जोरदार प्रचार करताना दिसत असून ते आपच्या विविध योजनांची मतदारांना माहिती देत आहेत.सांगे मतदारसंघात सांगे नगरपालिका, नेत्रावळी, उगे, वाडे, भाटी व रिवण या ग्रामपंचायती येतात.

मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com