मोन्सेरातच्या मनात खवखव.. खरी कुजबूज!

उत्पल पर्रीकर हे पणजीत अपक्ष निवडणूक लढवत असल्याने मोन्सेरात यांच्या मनात सुरू असलेले भीतीचे वादळ ते चेहऱ्यावर दाखवत नसले, तरी ते अंतर्गत खचलेले आहेत.
Assembly Elections 2022
Assembly Elections 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मोन्सेरातच्या मनात खवखव

राज्यात निवडणूक प्रचार सुरू असला तरी सर्वांत अधिक लक्ष आहे, ते पणजी मतदारसंघाकडे. गेली अनेक वर्षे बाबूश मोन्सेरात हे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात तेथे ते जिंकून येतात, असा आजवरचा समज आहे. मात्र यावेळी वातवरण जरा वेगळे आहे. उत्पल पर्रीकर हे पणजीत अपक्ष निवडणूक लढवत असल्याने मोन्सेरात यांच्या मनात सुरू असलेले भीतीचे वादळ ते चेहऱ्यावर दाखवत नसले, तरी ते अंतर्गत खचलेले आहेत. जर त्यांचे समर्थक प्रचारात असले तरी मनोहर पर्रीकर यांचा पणजीतील मोठा गट प्रत्यक्षात प्रचारात उतरला नसला तरी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्यासोबत तो राहणार आहे. त्याचे भय मोन्सेरात यांना भेडसावू लागले आहे. उत्पलने जे मुद्दे मांडले आहेत, ते स्वाभिमानी पणजीकर मतदारांच्या ह्रदयला गवसणी घालणारे आहेत. एक सच्चा तसेच प्रामाणिक व्यक्ती म्हणून गेल्या दोन दिवसांपासून उत्पल यांच्याकडे मतदारांकडून पाहिले जात आहे. हाच ‘फॅक्टर’ मोन्सेरात (Babush Monserrate) यांच्या मनात खवखवू लागला आहे. ∙∙∙

या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?

कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या अडीच वर्षापासून शिक्षण संस्था बंद आहेत. दोन पूर्ण शालेय वर्षे व एक अर्धे शालेय वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर ऑनलाईन शिकण्याची पाळी आली. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांना न शिकतात घरी बसून पदवीही मिळाली, एवढेच काय घरी बसून अनेकजण वकिलही बनले व इंजिनियर ही बनले. मात्र याचा जास्त फटका बसला आहे, तो यंदा बारावी विज्ञान शाखेत असलेल्या विद्यार्थ्यांना. जेईई व नीटच्या प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी अजून प्रयोग शाळाच पाहिली नाही, प्रयोग शाळेत प्रयोग न करता विज्ञान काय? कपाळ शिकणार बिचारे विद्यार्थी ऑनलाईनच्या नावाने बोटे मोडतात, तर जे न शिकता पदवीधर झाले, ते मात्र भले हो कोरोना! म्हणत मौज करतात. ∙∙∙(Utpal Parrikar decision for goa assembly elections frightened Babush Monserrate)

Assembly Elections 2022
लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या बंडाचा भाजपवर परिणाम काय?

मडकईकर उत्पलबरोबर?

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून आमदारकीसाठी निवडणूक लढवण्याची स्वप्ने असलेले माजी महापौर व विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांना आश्‍वासने देत काँग्रेसने क्लिन बोल्ड करून टाकले आहे. काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स हे एकेकाळी मोन्सेरात समर्थक नगरसेवकांची पणजी महापालिकेत सत्ता असताना ते आयुक्त होते. त्यांचा पणजीत कोणताच संपर्क नाही तरी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने मडकईकर चवताळले आहेत. पणजी महापालिकेत बाबुश मोन्सेरात यांच्याकडून झालेला अपमान व दुय्यम वागणूक याचा बदला घेण्यासाठी मडकईकर काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती मात्र काँग्रेसने पणजी गट मंडळाने दिलेल्या तीन नावाऐवजी जो पणजीचा रहिवासीच नाही त्याला उमेदवारी देऊन टाकली. त्यामुळे आक्रमक झालेले उदय मडकईकर यांना राजकारणात राहायचे असल्यास अपक्ष किंवा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याबाबत पर्याय उरला आहे. उत्पल यांनी त्यांची भेटही घेतली आहे त्यामुळे ते त्यांना पाठिंबा देऊन प्रचारात सहभागी होऊ शकतात. ∙∙∙

शपथेची गरज का भासली!

काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पणजीतील महालक्ष्मी समोर उभे करून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याबाबत जी शपथ घ्यायला लावली. त्यामुळे मतदारांमध्ये वेगळाच संदेश गेला आहे. २०१७मध्ये त्या पक्षाचे सर्वाधिक १७ आमदार निवडून आले होते, पण शेवटी त्यातील अवघे दोघेच शिल्लक राहिले होते. त्यामुळे यावेळी पक्षाने उमेदवार निवडताना आवश्यक ती खबरदारी घेतली होती. तरीही शंका असल्याने तर देवासमोर शपथेचा हा कार्यक्रम उरकला नसावा ना? ∙∙∙

आमदारांवर बहिष्कार?

म्हापशाचे माजी नगरसेवक असलेले उत्तर गोवा भाजप उपाध्यक्ष फ्रॅंकी कार्वाल्हो यांनी सध्या स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्यावर अनधिकृतरीत्या बहिष्कार घातल्याचे ऐकिवात आहे. एरवी ते ज्योशुआंच्या प्रत्येक कार्यक्रमाला अगदी निमंत्रण नसतानाही आवर्जून जायचे. परंतु मागच्या पालिका निवडणुकीत फ्रॅंकी यांचा प्रभाग राखीव ठेवण्यात आल्याने तेव्हापासून ते आमदारांवर नाराज आहेत व त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांना जाणेच सोडून दिले आहे व त्यांच्या प्रचारातही ते मुळीच सहभागी होत नाहीत. पूर्वी ते ज्योशुआंच्या प्रत्येक कार्यक्रमाचे छायाचित्रांसह सोशल मीडियावरून मनोभावे वृत्तांकन करायचे. स्वयंस्फूर्तीने केले जाणारे ते काम आता त्यांनी कायमचे सोडूनच दिले आहे, असे असले तरी भाजपच्या हळदोणेतील उमेदवाराचे प्रचारकार्य ते अगदी प्रामाणिकपणे करीत आहेत, एवढे मात्र खरे! ∙∙∙

Assembly Elections 2022
AAP : ...म्हणून माजी मंत्री दयानंद नार्वेकर अपक्ष निवडणूक लढवणार!

आंतोनियो, अब तेरा क्या होगा?

लोक तुमच्याशी तसेच वागतात, जसे तुम्ही त्यांना तुमच्याशी वागू देतात, हे बोल आहेत एका विचारवंताचे. एखाद्या अनाडी व अज्ञानी माणसाला फसविणे आपण समजू शकतो. मात्र, जर एखादा विचारवंतच फसविला गेला तर फसविणाऱ्याला महान म्हणावे लागणार. गोव्यात तृणमूल आणण्यात लुईझिन फालेरो यांच्या खांद्याला खांदा लावून बंगालात जाऊन दोन फुले गोव्यात आणलेले युवा व हुशार वकील आंतोनियो क्लोविस दि कॉस्ता सध्या तृणमूलकडून फसविले गेले, अशी भावना क्लोविस समर्थकांत झाली आहे. क्लोविस यांनी वेळ्ळी मतदारसंघातून तृणमूलच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी तृणमूलने काँग्रेसने नाकारलेल्या बेंजामिन सिल्वा यांना वेळ्ळीत उमेदवारी देण्याचे कबूल केल्यामुळे दोतोर क्लोविसच्या उमेदीवर पाणी पडले आहे. ‘बुदवंताक फातरा शीत’ म्हणतात तेच खरे. ∙∙∙

दयानंद अखेर ‘अपक्ष’

दिग्गज नेते दयानंद नार्वेकर मगोतून कॉँग्रेसमध्ये गेले, तेथे अनेक पदे भूषविला. शेवटी पराभव झाल्यानंतर अज्ञातवासात होते. पण अचानक पुन्हा सक्रीय राजकारणात येण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आपला जवळ केले, पण तेथेही त्यांना मनासारखे स्थान मिळत नाही. पर्वरीतून उमेदवारी मिळेल या आशेवर ते होते, पण तेथे दुसराच उमेदवार पक्षाने जाहीर केल्यामुळे ते पुन्हा एकांगी पडले आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आत्ता पर्वरीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. अनेकांनी उमेदवारीसाठी स्वतः पक्षाला किंवा इतर पक्षांत पक्षांतर करूनही उमेदवारी न मिळाल्याने रामराम केला आहे. त्यात दयानंद नार्वेकरही सहभागी झाले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात आयाराम-गयारामाचे पात्र अनेकांनी रंगवले असून काही जण ते रंगविण्याच्या तयारीत आहेत. ∙∙∙

चर्चिल तृणमूलवर नाराज!

निवडणुका केवळ जाहीर झाल्या आहेत. उमेदवारांची जुळवाजुळव चालूच आहे. मात्र एव्हानाच पक्षांमध्ये एकमेकाविरुद्ध रुसवे फुगवे सुरु झाल्याचे चित्र आहे. तृणमूलमध्ये प्रवेश केलेले चर्चिल आलेमावने आपल्या मुलीलाही उमेदवारी मिळवून दिली. वेळ्ळी येथे फिलिप नेरी रॉड्रिग्स यांच्या उमेदवारीसाठी चर्चिल म्हणे प्रयत्नशील होते. मात्र पक्षाने बेंजामिन सिल्वाला उमेदवारी दिल्याने चर्चिल नाराज झाले म्हणे. ते बेंजामिनला पक्षात घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही हजर राहिले नाही. निवडून येण्यापूर्वीच जर असे मग जर निवडून आलेच तर कसे असा प्रश्र्न सर्वांनाच पडला तर त्यात नवल ते काय. चर्चिलचा इतिहास सर्वांना माहीत आहे ना. ∙∙∙

भाजपवाले मस्त मजेत!

भाजपवाले सध्या मस्त मजेत आहेत. त्यांचे विरोधक असलेले काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवॉर्ड आणि मगो यांच्यात ‘तुझे माझे जुळेना’ असा प्रकार झाल्याने मतांच्या तोडफोडीत भाजपचे उमेदवार बाजी मारतील, असा दावा भाजपवाले खासगीत करू लागले आहेत. यावेळेला भाजपने कुणालाही सोबत घेतलेले नाही, मात्र तिकडे एकमेकांची सोबत पाहिजे, पण जुळत नाही ना, असा प्रकार असल्याने तोडाफोडाचे राजकारण सध्या सुरू आहे. गंमत म्हणजे तृणमूल काँग्रेसने आतापर्यंत भाजप सोडल्यास भाजपविरोधी पक्षांचेच नेते फोडल्याने काँग्रेस पक्षाचा थयथयाट सुरू आहे. तिकडे भाजपाने काँग्रेस, मगोचे उमेदवार पळवले आहेत, त्यामुळे या पळवापळवीत कोण कुठल्या पक्षाचा याबाबत मतदारांतच संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाशी निष्ठा दाखवायची की व्यक्तीचे स्तोम माजवायचे असा हा प्रकार झाला असून आता मते कुणाला द्यायची, राजकीय पक्षाला की व्यक्तिगत उमेदवाराला असा विचार मतदार करू लागले आहेत. ∙∙∙

भाजपवाल्यांचे धाबे दणाणले!

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली असली तरी भाजपच्या नभोमंडळातील एकेक तारा हल्ली गळून पडत असल्याने कार्यकर्त्यांचे धाबे सध्या दणाणले आहेत. एक म्हणजे स्वत:ला उमेदवारी मिळू न शकल्याने भाजपचे काही स्थानिक नेते छुप्या मार्गाने जोशुआ यांच्या विरोधात कार्यरत आहेत. त्यातच भरीस भर म्हणजे भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते तथा भाजप पुरस्कृत गटाचे माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी सार्वजनिक व्यासपीठावर येऊन मायकल लोबो यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता तर खुद्द हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे प्रशांत वाळके हेदेखील जोशुआ यांच्या विरोधात सातत्याने नाराजीचा सूर समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून व्यक्त करीत आहेत. भाजपसाठी प्रामाणिकपणे कार्यरत असलेले अवघेच शिलेदार सध्या जोशुआंच्या दिमतीला आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच सध्या तरी भाजपवाल्यांचे अवसान गळालेले आहे, असे जाणवते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com