शिरोडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना, विकास प्रकल्प उभे केले आहेत. कल्याणकारी योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात शंभर टक्के जमा होत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळामध्ये फक्त 10 टक्के रक्कम लोकांना मिळत होती. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात गोव्यासाठी रस्ते बांधण्यासाठी फक्त 120 कोटी रुपये दिले होते. तर भाजपने गेल्या सात वर्षांमध्ये 4 हजार कोटी रुपये दिले आहेत. हाच या दोन्ही पक्षांमधील फरक आहे. त्यामुळेच गोव्यातील जनता भाजपला मत देऊन बहुमताचे सरकार सत्तेवर आणणार आहे असे मत प्रतिपादन केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिरोडा येथे व्यक्त केले.
भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारार्थ बाजार शिरोडा येथे आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी उमेदवार सुभाष शिरोडकर , माजी खासदार नरेंद्र सावईकर, तसेच शिरोडा मतदार संघाचे भाजपाचे मंडळ पदाधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच ,उपसरपंच व इतर नेते उपस्थित होते. इराणी यांनी सांगितले की गोव्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळेच विविध प्रकल्प राबवले.
काँग्रेसवर विश्वास का ठेवावा?
काँग्रेसने आपल्या कार्यकाळात निर्माण केलेला एखादा प्रकल्प दाखवावा, एखादे काम सांगावे , एखादी योजना सांगावी. जर काँग्रेसने काहीच केले नसेल तर काँग्रेसला मतदार मत तरी का देतील? असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला. काँग्रेसचा स्वतःच्या उमेदवारावर जर विश्वास नसेल तर मतदारांनीही त्यांच्या उमेदवारावर का विश्वास ठेवावा? असा टोलाही यावेळी इराणी यांनी लगावला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.