खेळ कुणाचा? कुणाच्या जिवाशी?

गोवा फॉरवर्डसोबत सामंजस्याची तान छेडण्याचा एक प्रयोग मध्यंतरी राहुल गांधींच्या सहभागाने संपन्न झाला. पण पी. चिदंबरम यांनी त्यातली हवा लगोलग काढून घेतली
Goa politics

Goa politics

Dainik gomantak

Published on
Updated on

नव्या सकाळचे आश्वासन देत गोव्यात आलेल्या तृणमूल कॉंग्रेसनेन चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांना पावन करत माध्यान्ह साजरी केली. तृणमूलचे लुईझिन आणि चर्चिल यांच्या सोबतीने त्या पक्षांशी युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ढवळीकर बंधू आता युतीची व्यूहनीती आखू लागतील. राजकारण (Politics) असंगांचा संग घडवून आणते, असे म्हणतात. त्याचा विनोदी प्रत्यय गोव्यात येताना दिसतोय. मगोपने तृणमूलसोबत युती करण्याला हिरवा कंदील दाखवला तेव्हा दोन्ही पक्षांच्या विचारधारांतली साम्यस्थळे कोणती असा प्रश्न आम्ही केला होता. चर्चिल आलेमाव यांच्या युतींतल्या समावेशाने या प्रश्नाचे प्रयोजनच संपलेले आहे. राजकीय चारित्र्याचा मुद्दा मगोपच्या प्रचारसभांतून वारंवार उपस्थित व्हायचा. आता ती शक्यताही निकालात निघाली, कारण ''सब घोडे बारा टक्के'' झाले आहेत. ममतादीदींना गोव्यात येऊन हे टोकाचे परिवर्तन प्रत्यक्षात आणणे कसे शक्य झाले, याचा विचार करायला गोमंतकियांकडे मुबलक वेळ आहे.

<div class="paragraphs"><p>Goa politics</p></div>
कझाकिस्तानमधून 159 विदेशी प्रवासी गोव्यात दाखल !

''खेळ जातलोच'' असे सांगत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बाणावलीच्या सभेत आपल्या हातातला फुटबॉल प्रेक्षकांत भिरकावला. पश्चिम बंगाल आणि गोव्याला जोडणारा एक दुवा म्हणजे फूटबॉल. चर्चिल यांचा स्वतःचा फुटबॉल क्लब आहे आणि त्याला मावळत्या विधानसभेच्या काळात सत्ताधारी भाजपाने कोटींची ऊर्जा पुरवली होती. उर्जेचा स्रोत आता बदलला आहे हे ममतादीदींच्या हातचा फुटबॉल सांगून गेलाय का?

चर्चिल यांना राजकीय ''ड्रिबलिंग'' छान जमते. भाजपा आणि तृणमूल अशा दोन्ही छावण्यांतून ऊर्जा बरसली तर ती नाकारण्याचा करंटेपणा ते करणार नाहीत. भाजपाला संपवायची भाषा बाणावलीच्या सभेत त्यांनी केली असली तरी त्यात यत्किंचितही गांभीर्य नाही, हे त्यांनाही मनोमन ज्ञात आहे. मात्र, ममतादीदींना अभिप्रेत असलेल्या खेळात सामील होत त्यांनी आणि लुईझिन फालेरोंनी संयुक्तपणे कॉंग्रेसची वेळ भरल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. यातून भाजपाच्या बहुसंख्याकवादी राजकारणाला विरोध करणाऱ्या अवकाशाचे अधिक स्पष्ट विभाजन होणार आहे. आतापर्यंत कॉंग्रेस या अवकाशाच्या केंद्रस्थानी होती. तृणमूल आला तरी पक्षाचे केंद्रीय आणि स्थानिक नेतृत्व मरगळ झटकण्यास तयार नव्हते.

गोवा फॉरवर्डसोबत (Goa Forward) सामंजस्याची तान छेडण्याचा एक प्रयोग मध्यंतरी राहुल गांधींच्या सहभागाने संपन्न झाला. पण पी. चिदंबरम यांनी त्यातली हवा लगोलग काढून घेतली. कॉंग्रेसमध्ये काय चालले आहे, हे चिदंबरम यांच्या पातळीवरल्या ज्येष्ठ नेत्यांनाही माहीत नसते. या गोंधळी नेतृत्वाचा लाभ तृणमूल उठवते आहे. ममता बॅनर्जी यांना जो खेळ अपेक्षित आहे, त्यातून कॉंग्रेस जायबंदी होण्याची शक्यता दिसते. माध्यमांशी बोलताना बँनर्जी यांनी आपल्याला कॉंग्रेसच्या पतनाचे कोणतेही वैषम्य वाटत नसल्याचे रोखठोक विधान केले. राजकारणात वहिवाट असण्याचे दिवस संपले आहेत आणि प्रत्येकाने आपापले अवकाश झगडून मिळवायची नवी व्यवस्था रूढ झाली आहे. मात्र, हायकमांडच्या ''हँग ओव्हर''मध्ये कायम असलेल्या गांधी घराण्याला ते सत्य कळत नाही.

<div class="paragraphs"><p>Goa politics</p></div>
गोवा आप'च्या परिवर्तन यात्रेला प्रतिसाद

या घराण्याच्या कुलदीपकांनी जयपूर येथे झालेल्या सभेत हिंदूंचे राज्य आणण्याची घोषणा केली तेव्हा त्या पक्षाच्या धर्मनिरपेक्ष जडणघडणीसाठी आयुष्य वेचलेल्या अनेक नेत्यांचे स्वर्गस्थ आत्मेही तळमळले असतील. पक्षाची अवस्था वादळांत दिशा हरवलेल्या नौकेसारखी झालेली आहे. अशा नौकेच्या भरवशावर कोण पाण्यात उतरणार? ममता बॅनर्जी तरी तेवढ्या खुळ्या नाहीत! आता तर गोवा फॉरवर्डलाही या युतीविषयी आस्था वाटू लागल्याचे वृत्त आहे. नाताळाच्या मुहुर्तावर तो पक्षही तृणमूलच्या गळाला लागला तर कॉंग्रेसच्या करंटेपणालाच ते श्रेय द्यावे लागेल. स्वसामर्थ्यावर सत्ता काबीज करण्याच्या स्वप्नरंजनातून तो पक्ष जितल्या लवकर बाहेर येईल तितकेच त्यांचे भले होईल.

खेळ मनोरंजक करण्याचे आश्वासन देणाऱ्या ममता बॅनर्जींनी आता आपल्या पक्षाचे राज्यासमोरच्या कळीच्या प्रश्नांवरले धोरण स्पष्ट करावे. तीन समांतर प्रकल्पांना राज्यातून होत असलेला विरोध हा प्रत्यक्षात केंद्रीय प्रकल्पांना एकतर्फी लादण्याच्या प्रवृत्तीला होणारा विरोध आहे. गोव्याचे कसेही लचके तोडले जाऊ शकतात असे ही प्रवृत्ती मानते. गोव्यातील जमिनींच्या विक्रींतून अब्जांची कमाई करू पाहाणाऱ्यांना या प्रवृत्तीचा आधार वाटतो. याविषयी परप्रांतातून आलेल्या तृणमूलचे काय म्हणणे आहे हे गोमंतकीयाना जाणून घ्यायचे आहे. गोमंतकीयांमधली अस्वस्थता तृणमूलला कितपत उमगलीय, हे पक्षाच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट होईल.

त्यासाठी घाई करावी, निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहाण्याची काहीच आवश्यकता नाही. राज्याच्या अर्थव्यवस्थेला परावलंबित्वाच्या छायेतून सोडवण्याची कोणती योजना त्या पक्षाकडे आहे, पर्यटनाची वाताहत रोखून त्या उद्योगांतला स्थानिकांचा टक्का वाढवण्याची कोणती व्यूहनीती पक्ष आचरू पाहातोय, खाण उद्योगाची दुभती गाय ठराविक गोठ्यांत नेऊन बांधण्याचा अवसानघात पक्षाला खरेच खटकतोय का, रोजगारवृद्धीच्या पक्षाच्या ठोस योजना कोणत्या, अनियंत्रित शहरीकरणाच्या आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या भूरूपांतराच्या कारस्थानांपासून गोव्याला मुक्ती देण्याचा विचार पक्ष करतो आहे का? या प्रश्नांची उत्तरे गोव्याला अपेक्षित आहेत. निवडणुकीतून गोव्याच्या भवितव्याचा खेळ मांडला जाऊ नये, अशी माफक अपेक्षा बाळगणे गैर नव्हे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election) ‘‘खेळ’’ रंगतदार करण्याचे आश्वासन तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ताज्या गोवा भेटीत दिले आहे. फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या गोव्यालाही हा खेळ अनुभवण्याची उत्सुकता आहेच. पण या खेळांत गोव्याच्या वाट्याला केवळ बघ्याची भूमिका येणार नाही, ह्याची ग्वाही त्यांनी द्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com