मिलिंद म्हाडगुत
या निवडणूकीत गोव्याचे (Goa) तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात आहेत. दिगंबर कामत मडगावातून रवी नाईक फोंड्यातून (Ponda) तर चर्चिल आलेमाव बाणावलीतून रिंगणात उतरले आहेत. दिगंबर कामत हे 1994 पासून मडगावचे आमदार आहेत. 1989 साली त्यांचा अपक्ष उमेदवार अनंत उर्फ बाबू नायक यांच्याकडून पराभव झाला होता. पण 1994 साली त्यांनी मुसंडी मारून विधानसभेत प्रवेश केला. 94, 99,2002 या ती निवडणूका त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर जिंकल्या. (Goa Assembly Election 2022)
2005 साली त्यांनी कॉग्रेसीत प्रवेश करून पोटनिवडणूक लढविली. आणि अपेक्षेप्रमाणे विजय प्राप्त केला. नंतर 2007, 2012, 2017 या तीन निवडणूका ते कॉग्रेसच्या उमेदवारीवर जिंकले. मध्यंतरी 2007 ते 2012 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता परत एकदा ते मडगावातून कॉग्रेसच्या उमेदवारीवरच निवडणूक (Election) लढवित आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बाबू व बाबा दिगंबर यांच्या लढतीवर साऱ्या गोव्याचे लक्ष लागून राहिले आहे. दोघेही अनुभवी असल्यामुळे या चकमकीत कोणाचा निकाल लागतो यावर सगळ्यांच्या नजरा केंद्रीत झाल्या आहेत. कॉग्रेस बहुमताने आल्यास दिगंबर कामत (Digambar kamat) परत राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात असे संकेत मिळत आहेत. आता हे संकेत खरे ठरतात की काय हे बघावे लागेल
फोंड्यातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे रवी नाईक यांना विकास पुरुष म्हणून ओळखले जाते. फोंड्यातील बहुतेक प्रकल्प हे रवींच्या कारकीर्दीत कार्यान्वित झाले आहेत. 1984 साली रवी मगोपच्या उमेदवारीवर (Candidate) पहिल्यांदा निवडून आले. तत्पूर्वी 1980 साली त्यांचा कॉग्रेसच्या जोईल्द आगियार यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर 1984 नंतर 1989 साली रवी मडकईतून निवडून आले. याच दरम्यान 25 जानेवारी 1991 ते 18 मे 1993 पर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. नंतर 1994 साली त्यांचा पराभव झाला असला तरी 1998 साली ते उत्तर गोव्याचे खासदार बनले. परत 1999 साली ते फोंड्यातून कॉग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. नंतर 2002,2007 साली निवडून येऊन त्यांनी हॅटट्रीक नोंदवली. 2012 सालीत्यांचा पराभव झाला असला तरी 2017 साली ते परत फोंड्यातून निवडून आले. आता ते भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात कॉग्रेसचे राजेश शेट वेरेकर व मगोपचे डॉ. केतन भाटीकर हे आहेत. रवीच्या तूलनेने हे दोघेजण बरेच अनुनभवी असल्यामुळे ते काय करिश्मा करतात हे बघावे लागेल.
बाणावलीतून तृणमुल कॉग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणारे चर्चिल आलेमाव हे 1990 साली अल्पकाळाकरिता राज्याचे मुख्यमंत्री बनले. चर्चिलांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक पक्षांतरे केली आहेत. सुरुवातीला कॉग्रेसच्या उमदेवारीवर निवडून आलेले चर्चिल नंतर युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी (युगोडेपा) सेव्ह गोवा, राष्ट्रवादी कॉग्रेस व आता तृणमुल कॉग्रेस असा प्रवास करून आले आहेत. 1989 साली चर्चिल प्रथमच विधानसभेत पोहचले. नंतर 1994 व 1999 साली जिंकून त्यांनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली. 2002 साली त्यांचा मिकी पाशेकोकडून पराभव झाला. 2007 साली त्यांनी परत विजय मिळवला. 2012 साली कॉग्रेसच्या उमेदवारीवर ते नावेलीतून निवडून आले. पण 2017 साली बाणावलीतून त्यांनी कमबँक केले. मध्यंतरी ते खासदार म्हणून लोकसभेच्या निवडणूकीत निवडून आले होते.
आता त्यांच्यासमोर आपचे वेन्झी व्हिएगश, कॉग्रेसचे आंतोनियो डायस या नवख्या उमेदवाराचे आव्हान आहे. आता या आव्हानाशी तोंड देऊन ते सातव्यांदा विधानसभेत पोहचतात की काय हे बघावे लागेल. एकंदरीत या तीन माजी मुख्यमंत्र्यावर सध्या गोमंतकीयाचे लक्ष लागले असून यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव त्यांच्या किती कामाला येतो यावर नजरा लागून राहिल्या आहेत.आता आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर हे माजी मुख्यमंत्री बाजी मारतात की काय याचे उत्तर येणारा काळच देईल हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.