किस्से गोवा निवडणूकीचे: जनमत कौलानंतरची गोवा निवडणूक

गोव्यात 1968 साली एक ऐतिहासिक जनमत कौल गोव्यात घेण्यात आला होता.
Stories of Goa elections 1968 elections after Janmat Survey
Stories of Goa elections 1968 elections after Janmat SurveyDainik Gomantak

गोव्यात 1968 साली एक ऐतिहासिक जनमत कौल गोव्यात घेण्यात आला होता. पुरोगामित्वाच्या जाणिवा जोपासणाऱ्या एका छोट्याशा भूप्रदेशाने आपली सांस्कृतिक आणि भौगौलिक अभिव्यक्ती एका विस्तृत प्रवाहात लोप पावू नये म्हणून जनतेने केलेले प्रगल्भ मतदान या कौलाला ऐतिहासिक बनवून गेले होते. देशाच्या इतिहासातील या एकमेवाद्वितीय कौलाला आज 54 वर्षे उलटली असताना गोव्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जाणिवा तितक्याच दृढ आहेत का असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती सध्या गोव्यात निर्माण झाली आहे. जसजशी गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशा नव्या घडामोडी, नव्या पक्षांचे आगमन आणि त्यांच्या आश्वासनांची रेलचेल सुरू झाली आहे. तेव्हा गोव्याला आणि गोमंतकियांना याची जाणीव आहे का? गोवेकरांना गोव्यात येत असेलेल्या राजकीय वाऱ्याचा अंदाज आणि कल कळला आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

म्हणून 2022 साली होणाऱ्या निवडणुकीच्या आधी एक जनमन कौल गोमन्तकने घेण्यााचे ठरवले आणि त्याला भरघोस प्रतिसाद गोव्यातील महिलांकडून मिळत आहे. हा कल गोव्यातील महिलांचा असणार आहे. गोमंतकीय महिला ठरवतील गोव्याच्या भविष्याची नवी दिशा. एक महिन्यापुर्वी सुरू झालेल्या या जनमन उत्सवाला प्रत्येक भागातून प्रत्येक स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

जनमत कौलानंतरची निवडणूक

गोव्यातली लोकसभेची दुसरी निवडणूक 1968 साली झाली. देशभरात ही निवडणूक चौथ्या लोकसभेसाठी होती. ती 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 1968 या काळात ही निवडणूक घेतली गेली. गोव्यात मात्र ही निवडणूक 28 मार्च 1968 रोजी घेण्यात आली. म्हणजे चौथ्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ही निवडणूक पार पडली. गोव्यातली लोकसभेची पहिली निवडणूकही देशातल्या लोकसभा निवडणुकांबरोबर झाली नव्हती. त्याचे कारण म्हणजे, विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासूनच गोवा महाराष्ट्रात विलीन करावा या मागणीसाठी चळवळ सुरू झाली होती. त्याचबरोबर त्याला विरोध करणारी चळवळही गोव्यात सुरू झाली होती. या दोन्ही मागण्यांचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि युनायटेड गोवन पक्ष हे दोन पक्ष विधानसभेत पोहचले होते. पहिल्या विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात या मागणीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी 16 जानेवारी 1968 रोजी जनमत कौल घेण्यात आला होता.

Stories of Goa elections 1968 elections after Janmat Survey
पोकळ घोषणांचा सप्ताह

1968चा जनमत कौल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या विरोधात

या जनमन कौलासाठी पहिली विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्यात आली होती. मात्र झाले असे की, हा जनमत कौल सत्तेत असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या विरोधात गेला होता. म्हणजे गोव्यातील जनतेने विलीनीकरण नाकारले होते आणि गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी कौल दिला होता. याच जनमत कौलाच्या निकालानंतर गोव्याच्या दुसऱ्या विधानसभेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक 28 मार्च 1968 रोजी घेण्यात आली. याच दिवशी गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठीही निवडणूक घेण्यात आली होती. पहिल्या निवडणुकीत नाराज होऊन अपक्ष उमेदवार जनार्दन शिंक्रे यांनी पुन्हा अपक्ष म्हणूनच अर्ज भरला होता. मात्र या वेळी त्यांना पाठींबा देणारा मगो पक्ष होता. पहिल्या निवडणुकीत मगोच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहचलेले प्रजा समाजवादी पक्षाचे पीटर अल्वारीस पुन्हा उभे राहिले खरे पण मगोपच्या पाठिंब्याविना. या निवडणुकीत मगो पक्षाची एकला चलो भूमिका होती.

गोव्यात मगोपला जास्त मते पडूनही संधी युगोला

आणखी एक खास गोष्ट सांगायची झाली तर या निवडणुकीत युगो पक्षात फूट पडली होती. युगो (सिक्वेरा) आणि युगो (फुर्तादो) असे दोन गट निवडणुकीत उभे राहिले होते. मात्र, यावेळी जनतेने उत्तर गोव्यातूनच मगोपचा पाठिंबा असलेला उमेदवार निवडून दिला. तर दक्षिण गोव्यातून युगो पक्षात फूट पडूनही युगोचा उमेदवार विजयी झाला, उत्तरेतून जनार्दन शिंक्रे आणि दक्षिणेतून विधानसभेतील विरोधी पक्षनेता डॉ. जॅक सिक्वेरा यांचे चिरंजीव इराज्मो सिक्वेरा निवडून आले होते. शिक्रे यांना 56,764 इतकी मते मिळाली होती तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले बाबूराव कारेकर यांना 4,5810 इतकी मते मिळाली होती. म्हणजे शिंक्रे तब्बल 10,954 मतांनी विजयी झाले होते, तर इराज्मो सिक्वेरा यांना 54, 327 मते मिळाली होती. विरोधी मगोपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सुशील कवळेकर यांना 51,775 इतकी मते मिळाली होती. म्हणजे सिक्वेरा केवळ 2,552 इतक्या मतांनी निवडून आले होते. मगोप पुरस्कृत उमेदवारांना दोन्ही मतदारसंघांत मिळून 1,08,539 इतकी मते मिळाली होती, तर युगोला 1,00,137 इतकी मते मिळाली होती. म्हणजे संपूर्ण गोव्यात मगोपच्या बाजूने युगोपेक्षा जास्त मते पडूनही मगो पुरस्कृत उमेदवार मात्र एकच निवडून आला होता आणि दुसरी जागा युगोला गेली होती.

Stories of Goa elections 1968 elections after Janmat Survey
दीदी आणि दादांचा करिश्मा गोव्यात चालणार का?

निवडणुकीत कोकणी कवी प्रा. मनोहरराय सरदेसाईंचा सहभाग

उत्तर गोव्यातून जनार्दन शिंक्रे अपक्ष (मगो पाठिंबा) राहिले होते, तर युगो (सिक्वेरा) तर्फे बाबूराव कारेकर उभे राहिले होते. त्या निवडणूकीत खरी लढत या दोघांतच झाली होती. मोना अल्बुकर्क, युगो (फुर्तादो) तर्फे, तर आत्माराम करमळकर काँग्रेसतर्फे उभे राहिले होते. पूर्वीच्या लोकसभेत निवडून आलेले पीटर अल्वारीस प्रजा समाजवादी पक्षातर्फे आणि स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. याशिवाय कम्युनिस्ट पक्षातर्फे नारायण देसाई, तर पूर्वीच्या लोकसभेत काँग्रेसच्या महिला उमेदवार असलेल्या लॉरा डिसोझा अपक्ष म्हणून राहिल्या होत्या. दक्षिण गोव्यात मगोपच्या पाठिंब्याने सुशील कवळेकर राहिले होते तर, युगो तर्फे इराज्मो सिक्वेरा उभे राहिले होते. या निवडणूकिबाबत आणखी विशेष सांगायचे झाले तर या निवडणुकीत कोकणी कवी प्रा. मनोहरराय सरदेसाई अपक्ष म्हणून उभे राहिले होते. आमद मिनेझीस, मेलिसियु फर्नांडीस, शंकर भांडारी, फेलिक्स रॉड्रिग्स, आवेरेल्यू मेंडोंसा हे अपक्ष उमेदवार होते.

1968 साली घेतलेल्या जनमत कौलाचा निवडणूकीवर झालेला परिणाम दिसून आला. त्यानंतर आता येणाऱ्या 2022 च्या गोवा विधानसभा निवडणूकीवर या जनमताचा काय परिणाम होईल हे बघायला मिळेल. 54 वर्षानंतर गोमंतकीयांचा कल काय असेल? गोव्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळेल? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. कारण गोव्यात सध्या अनेक पक्षांनी बस्तान मांडणे सुरू केले आहे. तेव्हा येणाऱ्या निवडणूकीत कुणाचे बस्तान गोव्याच्या सत्तेवर बसेल हे तर येणारा काळ आणि गोमंतकीयच ठरवतील.

निवडणूकीची तारीख 28 मार्च 1968

विजयी उमेदवार

उत्तर गोवा- जनार्दन शिंक्रे अपक्ष

दक्षिण गोवा- इराज्मो सिक्वेरा युगो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com