काँग्रेसचा कानोसा
काँग्रेस पक्षात सध्या काय चाललंय, याचा अंदाज भाजप नेते पत्रकारांकडून सतत घेत असतात. काँग्रेस नेते निवडणुकीआधीच विजयाच्या उन्मादात आहेत, असे त्यांना ऐकविले जाते. वास्तविक काँग्रेस नेते जिंकून आल्याच्या आविर्भावातच वावरत आहेत. अजून मतदानाला १५ दिवस बाकी आहेत. अजून मतदारांचा कल ठरलेला नाही. काँग्रेसच्या प्रचारसभाही सुरू झालेल्या नाहीत. उलट भाजपचे नेते राज्याचा दौरा करू लागले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचा पत्ता नाही. तरीही त्यांना वाटते, की १० वर्षांनंतर भाजपला प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसणार आहे. भाजपने अनेक चुका केल्या, भ्रष्टाचारही केला. त्यामुळे त्या पक्षाला लोक नाकारू लागले आहेत. असे असले तरी लोकांना विचारले तर ते काही बोलत नाहीत. पत्रकार जेव्हा गावात जातात, तेव्हा लोक भाजप विरोधात थेट बोलत नसल्याचा अनुभव येतो. त्यांच्या मनात काय आहे, हे कसे ओळखणार? ∙∙∙
युतीमध्ये वितुष्ट नाही
तृणमूल काँग्रेस Goa TMC पक्षातून अनेकजण बाहेर पडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष कधी सोडून जाणार याची चिंता अनेक लोकांना पडली आहे. विशेषत: समाज माध्यमांवर ही चिंता व्यक्त होत आहे. तृणमूलने काल आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला त्यांनी तृणमूल-मगोपचा जाहीरनामा, असे म्हटले होते. परंतु समारंभाला मगोपचे ढवळीकर बंधू किंवा ज्येष्ठ नेते अनुपस्थित राहिले. त्यामुळे युती तुटली असल्याचा साक्षात्कार अनेक नेटकऱ्यांना झाला. वास्तविक दीपक ढवळीकर यांच्या मते, त्यांच्या उमेदवारी अर्जांची छाननी दुपारी अडीचपर्यंत सुरू राहिली. ढवळीकर म्हटल्यावर अनेकजण आक्षेप उपस्थित करू लागले. त्यांच्या कन्येला सध्या कोविड झाला आहे. ज्येष्ठ बंधूही ताप आल्यामुळे घरी आहेत. परिणामी या कार्यक्रमाला दोघेही गैरहजर राहिले. परंतु दीपकराव म्हणतात, युतीमध्ये कोणतेही वितुष्ट नाही. युतीची वाटचाल जोरात सुरू आहे. ∙∙∙
भाषेचा प्रभाव आणि अडचण!
भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी गोव्याच्या प्रचार मोहिमेत महाराष्ट्रातील अनेक आमदारांना उतरविले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते गोव्यात पाठवले आहेत. दोघांमधील फरक असा की, गोवा महाराष्ट्राला निकट असल्यामुळे मराठी भाषणे पसंत केली जातात. वास्तविक फडणवीस यांची उत्तर प्रदेशसाठी प्रभारी म्हणून निवड झाली होती. परंतु गोव्यातून त्यांच्या नावाला आग्रह झाला. फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांना आवडते. त्यांची भाषणेही येथे पसंत केली जातात. पत्रकारांचाही त्यांच्यावर जीव जडला आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य. असे असले तरी कर्नाटकचे नेते गोव्यात काही वेगळा प्रकाश पाडू शकलेले नाहीत. मुख्य कारण असते ती भाषा. ते तोडक्या-मोडक्या इंग्रजीतून बोलतात. जे येथे कोणालाही पसंत पडत नाही. कन्नडिगांवर त्यांचा केवढा प्रभाव पडतो, देव जाणे! ∙∙∙(Political discussions in goa state frount of goa assembly elections)
कार्यकर्त्यांसाठी आगळे उदाहरण
भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी 17 -18 तासांसाठी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या काळात ते चार मतदारसंघांचा धावता दौरा करतील. परंतु पूर्ण दक्षिण गोव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे उद्दिष्ट पक्षाने बाळगले आहे. कोविडच्या काळात सभांवर निर्बंध असताना डिजिटल माध्यमांद्वारे प्रचारसभा आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य कसे निर्माण करावे, याचा धडा यानिमित्ताने पक्ष घालून देणार आहे. सावर्डेमध्ये ते घराघरांत जाऊन प्रचार करतील. ही तर पद्धत गोव्यात नवीच असेल. गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवालांनी काही घरांना भेटी दिल्या होत्या; परंतु अमित शहा काही घरांना भेटी देतील, ही अप्रूप अशी घटना आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे वास्को येथे होणारी त्यांची सभा १५ ते १६ ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित केली जाईल. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सतत कार्यरत ठेवताना नवनवीन कार्यक्रम दिले. परंतु ते स्वत:ही प्रचाराची, अंग मेहनतीची कामे अंगावर घेण्यात कुचराई करत नाहीत. पक्षात केवळ पदे पाहिजे, असा हट्ट धरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हे आगळे उदाहरण ठरावे. ∙∙∙
मोदींनी यावे, ही इच्छा!
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेते गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. स्वत: अमित शहा उत्तर गोव्याच्या प्रचार मोहिमेवर दुसऱ्या फेरीत राज्यात येतील. परंतु अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा निश्चित झालेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी अधिक मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात जास्त वेळ खर्ची घालवू शकतात. परंतु गोवा राज्य छोटे असले तरी भाजपच्या वतीने येथे सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले जातील. त्या तत्त्वानुसार पंतप्रधान मोदी एक दिवस का होईना, गोव्यासाठी वेळ काढतील. स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोदी यांच्या दौऱ्यासाठी आग्रही आहेत. कारण मागच्या वेळी त्यांनी प्रमोदजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली होती. त्यामुळे त्यांना स्फुरण आले आहे. आता यावेळेला पंतप्रधान मोदींच्या तोंडून त्यांना आणखीही काही गोष्टी वदवून घ्यायच्या असतील! ∙∙∙मोदींनी यावे, ही इच्छा!
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेते गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. स्वत: अमित शहा उत्तर गोव्याच्या प्रचार मोहिमेवर दुसऱ्या फेरीत राज्यात येतील. परंतु अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा निश्चित झालेला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी अधिक मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात जास्त वेळ खर्ची घालवू शकतात. परंतु गोवा राज्य छोटे असले तरी भाजपच्या वतीने येथे सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले जातील. त्या तत्त्वानुसार पंतप्रधान मोदी एक दिवस का होईना, गोव्यासाठी वेळ काढतील. स्वत: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोदी यांच्या दौऱ्यासाठी आग्रही आहेत. कारण मागच्या वेळी त्यांनी प्रमोदजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली होती. त्यामुळे त्यांना स्फुरण आले आहे. आता यावेळेला पंतप्रधान मोदींच्या तोंडून त्यांना आणखीही काही गोष्टी वदवून घ्यायच्या असतील! ∙∙∙
त्यांना मानाचा पाट!
‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असे वर्तन भाजपच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आहे, अशी टीका आम्ही नव्हे, भाजपचे काही सक्रिय कार्यकर्तेच करू लागले आहेत. हे कार्यकर्ते फक्त मानाचा पाट मिळविण्यासाठी पक्ष नेत्यांशी वाद घालतात, अशी भावना सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. मी मनोहरभाई, धोंडभाई, दोतोर सावंत यांच्याबरोबर काम केले म्हणून त्यांना काम नको, मान हवाय म्हणून जेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते भाजपच्या बैठकीसाठी येतात, तेव्हा या महाराजांना मानाचा पाट मिळतो आणि त्यांना बसायला खुर्ची मिळते आणि जे काम करतात त्या बुजुर्ग कार्यकर्त्यांवर मात्र उभे राहण्याची वेळ येते. याला म्हणतात ‘बॉर्न विथ गोल्डन स्पून इन माऊथ.’ ∙∙∙
संतोषला भेटले मुख्यमंत्री!
माणसाने आशावादी असायला हवे आणि राजकारण तर आशावादावरच टिकून आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत CM Pramod Sawant पुन्हा एकदा भाजपची सत्ता गोव्यात आणण्यासाठी धडपडत आहेत. बंडखोरांचे रुसवे-फुगवे काढण्यासाठी मुख्यमंत्री अथक परिश्रम घेत आहेत. परवा मुख्यमंत्री कुंकळ्ळी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे संतोष फळदेसाई यांना समजावण्यासाठी साखळीतून बाळ्ळीला आले. संतोषने भाजपच्या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, भाजपने त्यांना पूर्वी गंभीरतेने घेतले नव्हते. आता संतोषला मिळणारा पाठिंबा बघून भाजपच्या उरात धडकी भरली, हे मात्र खरे. काही भाजपवाले संतोषला जरी राजकारणातले बालक समजत असले आणि संतोषची साथ शंभरीपर्यंत, असे जरी म्हणत असले तर मग या बालकाच्या घरी मुख्यमंत्री काय बारशाचे पेढे खायला आले होते? असा प्रश्न संतोष समर्थक विचारू लागले आहेत. संतोषने मुख्यमंत्री सावंत यांना स्पष्टच सुनावले, की ‘साहेब, आपण वेळ केली.’ ∙∙∙
पुन्हा आश्वासने
राज्यात मगो-तृणमूलची निवडणूकपूर्व युती झाली असून त्यांच्याकडून आश्वासनांवर आश्वासने देण्यात येत आहेत. आता जाहीरनाम्यात तर चक्क 250 दिवसांत खाण व्यवसाय सुरू करण्याचे अभिवचन तृणमूलने दिले आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही खाण व्यवसाय लवकरच सुरू करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपसह तृणमूलही खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साहजिकच निकाल काहीही लागला तरी निवडून येणारा पक्ष खाणी सुरू करणारच आहे, ही खाण व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कदाचित ‘आप’ही आपल्या घोषणापत्रात काही तरी तरतूद करेलच, पण जर ही फक्त आश्वासनेच असतील तर पुन्हा आश्वासनांसाठीही पाच वर्षे वाट पाहावी लागले, हे निश्चित. ∙∙∙
संतोषला भेटले मुख्यमंत्री!
माणसाने आशावादी असायला हवे आणि राजकारण तर आशावादावरच टिकून आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा एकदा भाजपची सत्ता गोव्यात आणण्यासाठी धडपडत आहेत. बंडखोरांचे रुसवे-फुगवे काढण्यासाठी मुख्यमंत्री अथक परिश्रम घेत आहेत. परवा मुख्यमंत्री कुंकळ्ळी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे संतोष फळदेसाई यांना समजावण्यासाठी साखळीतून बाळ्ळीला आले. संतोषने भाजपच्या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, भाजपने त्यांना पूर्वी गंभीरतेने घेतले नव्हते. आता संतोषला मिळणारा पाठिंबा बघून भाजपच्या उरात धडकी भरली, हे मात्र खरे. काही भाजपवाले संतोषला जरी राजकारणातले बालक समजत असले आणि संतोषची साथ शंभरीपर्यंत, असे जरी म्हणत असले तर मग या बालकाच्या घरी मुख्यमंत्री काय बारशाचे पेढे खायला आले होते? असा प्रश्न संतोष समर्थक विचारू लागले आहेत. संतोषने मुख्यमंत्री सावंत यांना स्पष्टच सुनावले, की ‘साहेब, आपण वेळ केली.’ ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.