Goa Assembly: पणजीचा निकाल 28 रोजी ?; खरी कुजबूज..

उत्पल यांचा राजकीय आलेख कोणत्या दिशेने जातो, यावर 28 जानेवारीपर्यंत बारकाईने लक्ष..
Assembly Elections 2022
Assembly Elections 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजीचा निकाल 28 रोजी (?)

उत्पल यांच्या अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या निर्णयामुळे भलेही राष्ट्रीय मीडियात खळबळ उडालेली असो, भाजपची (Goa BJP) स्थानिक सुकाणू समिती या घटनेकडे राज्यातली खळबळजनक घटना म्हणून पाहायला तयार नाही. त्यांच्या मते, हे पेल्यातले वादळही नाही. ते विचारतात, उत्पल यांचे राजकीय कर्तृत्व ते काय? त्यापेक्षा कार्यकर्ते म्हणून त्यांचे चुलत बंधू अखिल पर्रीकर हे अधिक श्रेष्ठ आहेत. ते पक्षाच्या कार्यात गेली तीन वर्षे गुंतले आहेत. उत्पल यांच्या जमेची अशी एकमेव बाजू म्हणजे, ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र. ते वगळता त्यांचे राजकीय कर्तृत्व शून्य. मात्र, असे असले तरी राजकारणात चिकाटी आणि विजिगिशु वृत्तीही महत्त्वाची असते. आता उत्पल यांची चिकाटी व विजिगिशु वृत्ती सरस ठरते, की सुकाणू समितीच्या सदस्यांचे म्हणणे, हे कळेलच म्हणा. यासंदर्भात भाजपचा एक ज्येष्ठ नेता ‘गोमन्तक’च्या संपादकांशी पणजीत उत्पल जिंकतील की हरतील, यावर पैज लावायलाही तयार होता. पण त्याचे म्हणणे असे, की पणजीचा विजयी उमेदवार कोण हे अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी ठरणार आहे. त्याच्या मते बाबूश मोन्सेरात हे कसलेले, तरबेज खेळाडू आहेत. उत्पल यांचा राजकीय आलेख कोणत्या दिशेने जातो, यावर तो 28 जानेवारीपर्यंत बारकाईने लक्ष ठेवील. उत्पलचे वजन वाढतेय असे दिसून आल्यास बाबूश कदापि भाजपच्या तिकिटावर उभे राहाणार नाहीत. ते दुसऱ्या पक्षात कोणत्याही क्षणी जाऊ शकतात. याआधीही त्यांनी कॉंग्रेसचे तिकीट घेऊन आयत्यावेळी अन्य पक्षात उडी मारलेली आहे. तात्पर्य... पणजीचा निकाल - या नेत्याच्या मते- 28 जानेवारी रोजीच निश्चित होणार आहे. ∙∙∙

उत्पलचा क्षण आला....

पणजीतून (Panjim) तिकीट नाकारलेले उत्पल पर्रीकर यांनी आज भाजपचा राजीनामा दिला आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी त्या घटनेची तात्काळ दखल घेतली. उत्पल यांच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना ‘ये क्या लडका है!’ असे उद्वेगपूर्ण उदगार काढले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: उत्पल यांची समजूत काढायचा यत्न केला. असा अपवाद त्यांनी याआधी कुणाच्याही बाबतीत केला नव्हता. अनेक ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता, मोदी आणि शहा यांनी त्यांचे मनपरिवर्तन करण्यात स्वारस्य दाखवले नव्हते. मात्र, उत्पलबाबत अपवाद राहिला तो मनोहर पर्रीकरांमुळेच. उत्पलबाबत दोन्ही नेत्यांचे बोलणे आस्थेचे होते. त्यांनी उत्पलना पक्ष संघटनेत आणि राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाची जबाबदारी देऊ केली. मात्र, उत्पलनी त्याला नकार दिला. यामागचे कारण विषद करताना उत्पलला जवळ असलेली एक राजकीय व्यक्ती म्हणाली, की राजकीय जीवनात असाही एक क्षण येतो, जो त्या माणसामधल्या धाडसाला आव्हान देतो. त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्याच्यावर स्वार होण्याची हिम्मत दाखवणारा जिगरबाज यशस्वीही होतो. उत्पल यांचा तो क्षण आलाय की नाही, हे कळायला आपल्याला महिनाभर वाट पाहावी लागेल. ∙∙∙

पर्येतला तिढा

भाजपची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पर्ये मतदारसंघाविषयी निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलेले भाष्य नव्या नाट्याची नांदी ठरते आहे. पर्येच्या उमेदवार डॉ. दिव्या राणे यांना प्रतापसिंग राणे यांच्याशी बोलून आणि त्यांच्याच सल्ल्याने उमेदवारी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या विधानाला सीनियर राणेंनी लगेच आक्षेप घेतला. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी कॉंग्रेसचे (Goa Congress) केंद्रीय नेते पी. चिदंबरम आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राणे यांची भेट घेतली आणि राणेंची उमेदवारी पक्षाने याअगोदरच जाहीर केल्याचे त्यांना सांगितले. पक्षाकडे पर्येसाठी दुसरा उमेदवारही नाही, याची जाणीव त्यांनी सीनियर राणेंना करून दिली. राणेंनी आपण या प्रस्तावावर विचार करू, असे आश्वासन उभयतांना दिले. आता यावर विश्वजीत राणेंची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. ते म्हणाले, माझे वडील जरी कॉंग्रेसचे उमेदवार असले तरी माझी पत्नी किमान दहा हजार मतांच्या फरकाने विजयी होईल. गेली २० वर्षे मीच या मतदारसंघात तळागाळात काम केले असून वडिलांना येथे फिरायचाही अनुभव नाही, असा विश्वजीत यांचा दावा आहे. ते काही असले तरी भाजपला पर्ये मतदारसंघ सोपा जाणार नाही, हेच शुक्रवारच्या घटनेने सिद्ध केलेय. ∙∙∙(Political debate in Goa State on backdrop of forthcoming Assembly elections 2022)

Assembly Elections 2022
Goa BJP: बदलत्या भाजपची ही भुमिका कितपत योग्य?

पार्सेकरांचा ‘हॅम्लेट’

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कितीही जरी आकांडतांडव केले आणि अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचीही घोषणा केली तरी ते भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षापासून खरेच विलग होतील काय? पार्सेकर भाजपच्या कार्यात 1989 पासून गुंतलेले आहेत आणि पक्षासाठी त्यांनी खस्ताही खाल्ल्या आहेत. पण पक्षाने सत्तेवर आल्यानंतर मंत्रिपद, मुख्यमंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला आहे. आताही ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते छातीठोकपणे सांगतात की, काहीही झाले तरी पार्सेकर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत. ते कदाचित रिंगणात उतरून दंड थोपटत आपण विजयी होण्याचा अंदाज घेतील. शुक्रवारी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे पार्सेकरांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी पार्सेकरांसोबत चहाही घेतला. पार्सेकरांनी आपली कैफियत त्यांच्या कानी घातली. तेथून परतताना फडणवीस यांनाही पार्सेकर पक्षातून निघून जाण्याची टोकाची भूमिका घेणार नाहीत, असेच वाटत होते. ∙∙∙

बाबूंना झाली पार्किंगची आठवण

मडगावात सर्वांत बेशिस्त मार्केट जर कोणते असेल तर ते गांधी मार्केट. बाबू आजगावकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर जागा अडवून ठेवल्याने लोकांना आपली वाहने पार्किंग करताही येत नाहीत. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी बाबू आजगावकर यांनी पिंपळकट्ट्यावर दामबाबासमोर नारळ ठेवताना दिगंबर कामत यांच्यावर सडकून टीका केली. मडगावात एवढी बेशिस्त वाढली आहे की, येथे वाहन पार्किंग करण्यासाठी जागा नाही. मी निवडून आल्यास मडगावसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था करू, असे त्यांनी सांगितले. यावर एका वाटसरूचा प्रश्न होता. नंतर तिथे तुमचे व्यापारी जागा अडवून बसतील का? ∙∙∙

Assembly Elections 2022
'अप्रामाणिक विरुद्ध चारित्र्य' पणजीतील लढतीचे राऊतांनी केले वर्णन

भोगा कर्माची फळे

भाजप सरकारच्या काळात कार्यकर्त्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना नोकऱ्यांची खिरापत वाटल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात बरीच नावेही उघड झाली आहेत. सरकारी नोकऱ्या इतरांना देण्यासाठी पैशांचा वापर झाल्याचा आरोपही होत आहे, आणि आता तर आरोग्य खात्यातील नोकऱ्यांचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोग्य खात्यातच का, इतर नोकऱ्यांबाबतही गौडबंगाल असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या नोकर भरतीचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या गौडबंगालात सावर्डे मतदारसंघाचे आमदार आणि साबांखा मंत्री दीपक पाऊसकर यांचा मात्र बळी गेला. या खात्यातील नोकऱ्यांबाबत खुद्द भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी थेट दीपक पाऊसकरांवर पैसे घेतल्याचे आरोप केले. बिचारे पाऊसकर! भाजप सरकारची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या बाबूशना उमेदवारीसाठी पायघड्या आणि ज्यांनी भाजप सरकार घडवण्यासाठी मगोला सोडचिठ्ठी दिली, ते पाऊसकर मात्र आऊट...! आता मगोवाले तर सरळ म्हणतात, ‘आमच्याशी गद्दारी केली ना, मग भोगा आपल्या कर्माची फळे.’ ∙∙∙

हेची फल काय मम तपाला?

मनोहर पर्रीकरांनंतर प्रमोद सावंत सरकारला मदतीचा हात देण्यासाठी मगोला बाय बाय करून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार बाबू आजगावकर आणि दीपक पाऊसकर हे आता कपाळावर हात मारत ‘हेची फल काय मम तपाला?’ या ओळी आळवत असतील. त्यातील बाबूंना जरी मडगावची उमेदवारी दिली गेली असली तरी तेथे तशी आशा कमीच आहे. तिथे दीपकला तर त्यांनी चक्क कचराकुंडीतच फेकून दिले आहे. भाजपने नेहमीप्रमाणे आपली ‘यूज ॲण्ड थ्रो’ची प्रचीती येथेही आणून दिली, हेच खरे. ∙∙∙

सब पंछी एक डाल के

स्वार्थी लोकांसाठी डोकी फोडणे मूर्खपणाचे आहे, हे राजकीय नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या अंध भक्तांना कोण सांगणार?ज्या पद्धतीने विचारधारा व पक्षनिष्ठा खुंटीला टांगून राजकीय नेते पक्ष बदलत आहेत, ते पाहिल्यास अशा स्वार्थी व विश्वासघातकी नेत्यांसोबत राहणे शहाणपणाचे आहे का? याचा विचार कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे. यासंदर्भात एका नेटिझनने सोशल मीडियावर छान व अर्थपूर्ण पोस्ट व्हायरल केली आहे. ‘निवडणुकीच्या भानगडीत आपली नाती खराब करू नका. निवडणुकीनंतर सगळे गब्बर, ठाकूर, जय, वीरू एकाच ठिकाणी दिसतात. लढतात सामान्य कार्यकर्ते, डोकी फोडून घेतात सामान्य कार्यकर्ते, लढतात व शिव्या खातात सामान्य कार्यकर्ते. नेते मात्र ‘हम सब साथ है’ म्हणत स्वार्थ साधतात. राजकारणाचे हे गुपित सामान्य कार्यकर्त्यांना कळेल तो सुदिन. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com