मडगाव: कॉंग्रेसने यंदा आक्रमक; पण पद्धतशीर प्रचारशैली राबविल्याने त्याचा प्रभाव आता मतदारांवर पडत असल्याचे दिसून येत आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल तसेच समाज माध्यमांवरील कॉंग्रेसच्या जाहिरातींनी कळीचे मुद्दे उपस्थित केल्याने सत्ताधारी भाजप (BJP) तसेच इतर पक्ष सध्या बॅकफुटवर गेल्याचे संकेत मिळू लागले आहेत. (Congress Goa News)
गोव्यातील अनेक भागांत कॉंग्रेसने हॉर्डिंग्स व फ्लेक्स बोर्डचा वापर करून मागील दहा वर्षांत भाजपला आलेले अपयश लोकांसमोर मांडण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला असून गोमंतकीयांकडूनही आता कॉंग्रेसला योग्य प्रतिसाद मिळत आहे. एलईडी गाड्यांवरूनही प्रत्येक मतदारसंघात दृकश्राव्य माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. आम्ही लोकभावनांचा आदर करूनच प्रचार आखला असून, राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) 4 फेब्रुवारीच्या भेटीनंतर कॉंग्रेसने जाहीरनाम्यावर आधारीत जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. त्याच दिवशी ‘गोंयकारांच्या हातांत गोंयचो फुडार, नवें वर्सा कॉंग्रेस सरकार’ हे गाणे प्रसिद्ध केले. सरकारचे अपयश लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला असून आता पुढील आठ दिवस कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर लोकांसाठी काय करेल, यावर आम्ही भर देणार आहोत असे कॉंग्रेसच्या प्रचाराची आखणी करणारे विशाल पै काकोडे यांनी सांगितले.
कॉंग्रेस प्रचाराची रणनीती आखताना ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतरांचे मार्गदर्शन व पाठिंबा मिळाल्यानेच निवडणूक प्रचार पद्धतशीरपणे पुढे जात असल्याचे काकोडे म्हणाले.
महत्त्वाच्या समस्यांवर कॉंग्रेसचे बोट
वाढती महागाई, नेटवर्क समस्या, गोव्याच्या पर्यावरणाचा नाश, थ्री लिनियर प्रकल्प, कोविड गैरव्यवस्थापन, लाडली लक्ष्मी. गृहआधार लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळण्यास होणार विलंब, बेरोजगारी व सरकारी नोकऱ्यांतील भ्रष्टाचार अशा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर कॉंग्रेस पक्षाने जाहिराती तयार करून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेटवर्क समस्या भाजपला झोंबली
कॉंग्रेसने (Congress) यंदाच्या निवडणुकीत शास्त्रोक्त पद्धतीने प्रचाराची रणनीती आखल्याचे स्पष्टपणे दिसत असून, मोबाईल नेटवर्क समस्येवर कॉंग्रेसच्या जाहिरातीवर स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपने चक्क समाज माध्यमांवर सारवासारव करणारी एक चित्रफित अपलोड केली.
गाण्यांमधून सरकारवर ‘आसूड’
‘कॉंग्रेसीचें सरकार हाडून गोंय सांबाळया’ हे गाणे सुमारे चार महिन्यांपूर्वी कॉंग्रेसने जारी केले. या गाण्यात भ्रष्टाचार, कोविड काळातील आजाराचा बाजार, म्हादई प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, शो मस्ट गो ऑन, भिवपाची गरज ना, शेळ मेळावली आंदोलन, कोसळलेली अर्थव्यवस्था, कोलमडलेली कायदा व सुव्यवस्था, नेटवर्क समस्येमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान अशा विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात कॉंग्रेस पक्ष यशस्वी ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.