पणजी: तृणमूल काँग्रेसतर्फे किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी गोव्यात टीएमसीला 12 तर त्यांचा मित्रपक्ष मगोपला 7 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
मात्र, याचा स्पष्ट पडताळा 10 मार्च रोजी मतमोजणीनंतरच होणार आहे. सोमवारी गोवा विधानसभेसाठी मतदान पार पडले. निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने गोव्यातील सर्वांत जुना प्रादेशिक पक्ष मगोपसोबत युती केली आहे. टीएमसी गोवाप्रमुख किरण कांदोळकर यांनी दावा केला, की त्यांचा पक्ष ही एकमेव राजकीय संघटना आहे, ज्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला कडवी झुंज दिली.
आमचा पक्ष राज्यात किमान 12 जागा जिंकेल, तर मगोप सात जागा जिंकेल. 21 च्या बहुमताच्या तुलनेत त्यांना काही जागा कमी पडू शकतात; परंतु ते सभागृहात बहुमत सिद्ध करू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कांदोळकर पुढे म्हणाले की, मतदानाच्या निकालानंतर टीएमसी गोवा सोडणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, आमचा पक्ष येथेच राहण्यासाठी आला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी सहमत आहे की गोव्यात सध्या आमच्याकडे तळागाळातील कार्यकर्ते नाहीत.