गोवा निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अनेक मातब्बर नेते यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या अपक्षांचे वर्णन ‘एक से बढकर एक’ असे करावे लागेल. यातील बहुतेक उमेदवार हे भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे रिंगणात असून ते भाजपच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देऊ लागले आहेत.एकंदर अपक्ष उमेदवारांचा सर्वत्र बोलबाला असून हाय होल्टेज गणल्या जात असलेल्या लढतीत मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर, पणजीत उत्पल पर्रीकर यांची नावे चर्चेत आहेत, तर शिवोलीत पालयेकर, मयेत प्रवीण झांट्ये, डिचोलीत डॉ.चंद्रकांत शेट्ये यांनी तर दक्षिण गोव्यात नुवेत विल्फ्रेड डीसा,कुडतरीत आलेक्स रेजिनाल्ड,सांगेत सावित्री कवळेकर,काणकोणात इजिदोर फर्नांडिस पक्षीय उमेदवारांसमोर आव्हान उभे केले असून धोबी पछाड देण्याच्या तयारीत आहेत. (Independent Candidates for Goa Assembly Elections News Updates)
मांद्रे मतदारसंघात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपपासून फारकत घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांची वाट बिकट झाली आहे.पणजीत उमेदवारी न मिळालेले मनोहर पर्रीकर पुत्र उत्पल यांनी तर भाजप उमेदवार बाबूश मोन्सरात यांचा जीव मेटाकुटीला आणला आहेत. शिवोलीत गोवा फॉरवर्ड-कॉंग्रेसच्या युतीमुळे बाहेर पडलेले माजी आमदार विनोद पालयेकर हे सध्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांचाही प्रभाव वाढताना दिसत आहे.
मयेत माजी आमदार प्रवीण झांट्ये यांना भाजपने (BJP) उमेदवारी न दिल्यामुळे खवळलेले त्यांचे कार्यकर्ते आता भाजपचे उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचा पराभव करण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसताहेत. डिचोलीत अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकात शेट्ये यांनी पक्षीय उमेदवारासमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. फोंड्यात भाजपमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार दाखल केलेले संदीप खांडेपारकर हे भाजपच्या रवी नाईकांना त्रासदायक ठरू शकतात असे दिसायला लागले आहे.
प्रियोळात (Priol) तीच परिस्थिती आहे. तिथे भाजपच्याच संदीप निगळ्ये यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून भाजपचे उमेदवार माजी मंत्री गोविंद गावडे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कुंभारजुवेत भाजपचेच रोहन हरमलकर हे पक्षत्याग करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्याची ‘तकलीफ’ भाजपच्या उमेदवार जेनिता मडकईकर यांना होऊ शकते असा रंग दिसतो आहे. नुवेत माजी आमदार विल्फ्रेड डिसा व उर्फ बाबाशान यांनी भाजपतर्फे निवडणूक न लढविता अपक्ष म्हणून लढविल्यामुळे इतर उमेदवारांसमोर चुरस निर्माण झाली आहे.
कुडतरीत रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेस (Congress) उमेदवाराला कात्रीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सांगेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर याच्या पत्नी सावित्री या भाजप त्याग करून अपक्ष म्हणून रिगणात असून त्यांनी सांगेत चांगलीच ‘हवा’ निर्माण केली आहे. त्यामुळे सध्या भाजपचे उमेदवार तथा माजी आमदार सुभाष फळदेसाई व कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार प्रसाद गावकर यांच्यासमोर ‘प्रश्नचिन्ह’ उभे केले आहे. सावर्डेत उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून भाजपचे उमेदवार माजी आमदार गणेश गावकर यांना ‘धोबीपछाड’ करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
भाजपला पक्षांची सर्वाधिक ‘वाळवी’ !
2012 साली पाच अपक्ष, तर 2017 साली तीन अपक्ष विधानसभेत होते. यावेळी यात किती भर पडते ते बघावे लागेल. काही ‘छुपे रुस्तम’ अपक्ष म्हणून रिंगणात उतरले नसले तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अपशकून करण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपला अपक्षांची जास्त ‘वाळवी’ लागली असून प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले तरी पक्षातील बंडखोरी टळलेली नाही. फक्त साळगावात परूळेकर व कुंभारजुवेत सिध्देश यांचे बंड मोडण्यात तेवढे भाजपला यश आले आहे. पण याच साळगावात भाजपचेच रुपेश नाईक यांनी उभे केलेले आव्हान मात्र भाजपश्रेष्ठींना मोडता आलेले नाही.
काणकोणात तवडकरांना ‘इथे आड तिथे विहिर’
काणकोणात भाजपचे विजय पै खोत यांनी अपक्ष भूमिकेत उतरून भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांना नाकीनऊ आणले आहे. इथेच माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे ही अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यामुळे तवडकरांची अवस्था सध्या ‘इथे आड तिथे विहिर’ अशी झाल्यासारखी दिसते आहे. आता एवढे मातब्बर अपक्ष रिंगणात उतरल्यामुळे सध्या या मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची संकेत मिळायला लागले आहेत. काही अपक्ष तर पक्षीय उमेदवारांपेक्षा सरस ठरत असल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मतदारसंघात अधिक दिसू लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.