मडगाव: आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने खुल्या झालेल्या कुडतरीच्या काँग्रेस उमेदवारीवर अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो पुन्हा दावा करणार का, असा प्रश्न चर्चेत असतानाच ‘मी निवडणूक लढविली तर भाजपच्याच उमेदवारीवर’ असे आज रिबेलो त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर विश्वास ठेवून भाजपने मला पक्षात सामील करून घेतले आहे. त्या समारंभाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित होते. माझ्यावर विश्वास ठेवलेल्या पक्षाचा मी विश्वासघात करणार नाही. भाजपने उमेदवारी दिली तर जरूर निवडणूक लढवेन, असेही रिेबेलो यांनी स्पष्ट केले.
मोरेन रिबेलो यांच्या जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या पत्नी मिशेल या काँग्रेस (Congress) पक्षावर निवडणूक (Goa Elections 2022) लढतील अशी जी चर्चा सुरू होती, तिलाही विराम देताना आपली पत्नी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार आहे. ती काँग्रेस उमेदवार म्हणून जिंकून आली होती व त्या पक्षातच राहणार, असे रिबेलो म्हणाले. कुडतरीत मतदार तुम्हाला भाजप उमेदवार म्हणून स्वीकारतील का, असा प्रश्न विचारला असता, जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आपण जे काम केले आहे ते कुडतरीच्या लोकांना माहीत आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना कुडतरीसाठीही आपण 12 मागण्या केल्या आहेत. त्यात काही युवकांना सरकारी नोकऱ्या देण्याचीही मागणी आहे. काही जण मी भाजपचा (BJP) उमेदवार म्हणून अपप्रचारही कारतील. मात्र गोव्यात येणारे सरकार भाजपचेच असणार हे जाणण्याएवढे कुडतरीचे मतदार सुज्ञ आहेत व याची आपल्याला खात्री आहे असे रिबेलो म्हणाले.
काँग्रेसच्या आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) यांनी आमदारकीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच आपल्यापदाचा राजीनामा देऊन कुडतरीतील मतदारांचा विश्वासघात केला आहे. शिवाय त्यांनी लोकांना पोरके करून सोडले आहे. मतदार त्यांना आगामी निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील, असे मत मोरेन रिबेलो व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.