Goa Election भारतीय जनता पक्षाच्या पतीतपावन मोहीमेचा श्रीगणेशा..!
Goa Election भारतीय जनता पक्षाच्या पतीतपावन मोहीमेचा श्रीगणेशा..!Dainik Gomantak

भारतीय जनता पक्षाच्या पतीतपावन मोहीमेचा श्रीगणेशा..!

भारतीय जनता पक्षाची पतीतपावन मोहीम काहीशा विलंबानेच का होईना, मार्गी लागलीय!
Published on

Goa Election : चला, भारतीय जनता पक्षाची (BJP) पतीतपावन मोहीम काहीशा विलंबानेच का होईना, मार्गी लागलीय! वास्कोच्या दाजी साळकरांपासून तडाखेबंद सुरुवात करून आता साळगांवचे आमदार जयेश साळगांवकरांना पावन करून घेण्यात आले आहे. पुढचा अध्याय फोंड्यात (Ponda) रचला जाणार असल्याचे संकेत मिळताहेत. रवी नाईकांनी दोन्ही पुत्रांना आपल्याआधी मार्गस्थ करून झाडलोट उरकून घेतली आहे.

आता रवींचा दुसरा गृहप्रवेश सुकर होईल. तिकडे शिवोलीचे विनोद पालयेकरही गाठोडं बांधून बसल्याचे कळते. पण त्यानी तिकिटाच्या आश्वासनाविना यावे, असे सुचवले गेल्याने प्रवेश किंचित लांबला आहे.

Goa Election भारतीय जनता पक्षाच्या पतीतपावन मोहीमेचा श्रीगणेशा..!
तिसऱ्या आघाडीचा चौथा कोन

तेथेही काही तोडगा निघेलच, दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीसानी तो पत्कर घेतलेला आहे. मजामजा आहे म्हणायची एकूण! पण त्या धांदलीत बिचाऱ्या कार्लुस आल्मेदा (वास्को), सुनील देसाई (फोंडा), दिलीप परुळेकर (साळगाव) याना भोयांची भूमिका बजावत नवागतांची पालखी तर उचलावी लागणार नाही ना? साळगांवचे निष्ठावंतांचे बंड शमवण्यासाठी मतदारसंघ समिती गुंडाळण्याचा बडगा उचलला, अन्यत्रही कुरबुरी असतीलच. नव्याना आणायचे तर जागा करण्यासाठी नकोसे झालेल्या जुन्याना खो द्यावाच लागतो. सत्तेपुढे शहाणपण खपत नसते, हेच खरे! जुन्या जाणत्या भाजपाजनांना एक रुखरुख बराच काळ लागून राहिलेली होती, पक्षाचे जे कॉंग्रेसीकरण होऊ घातलेय ते शिताफीने पूर्णत्वास का नेले जात नाही..? आता त्याना उत्तर मिळाले असेल.

भाजपा खऱ्या अर्थाने गोव्याच्या राजकारणात रुळल्याची ही निर्विवाद ग्वाही आहे. हमखास यशाची ही हमी आहे की नाही, हे निवडणुकीच्या वेदीवर ठरेलच, पण राजकारणात शिवाशिव बाळगायची नसते हे सिद्ध करणारे पुरोगामित्व रामनामाचा जप करणाऱ्यानी अचंबित करणाऱ्या जलदगतीने आत्मसात केल्याची नोंद राजकीय इतिहासाला घ्यावीच लागेल. कॉंग्रेसच्या स्थानिक कळपांत जे कुणी शिल्लक नेते असतील, त्यानाही भाजपाच्या या आवकीविषयीच्या कळवळ्यामुळे दिलासा मिळाला असेल. आता ते आपल्या निवडणूक विजयाची तयारी करता करता पक्षांतराच्या नव्या अध्यायासाठीही गळाबंद सुटांची ऑर्डर देण्यास मोकळे होतील.

हिंदू मतांचे धृवीकरण करायची आस बाळगून राजकारणात उतरलेल्या भाजपाचे हिंदुबहुल उत्तर गोव्यातील बहुतेक मतदारसंघातले संभाव्य उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. यात एकमेव साखळी मतदारसंघांत ''ओरिजिनल'' भाजपा म्हणण्यासारखा चेहरा दिसतो. शिवोलीचेही तसेच म्हणता येईल. मये, हळदोणे अशा मतदारसंघाविषयी थोडीशी चलबिचल आहे.

पण अन्यत्र दिसते ती थेट कॉंग्रेसीतून (Congress) झालेली आवक. म्हणजे ऐंशी टक्के आयात उमेदवार भाजपाचे कमळ घेऊन या निवडणुकीत उतरण्याची शक्यता दिसते. यात कॉंग्रेस ते भाजपा ते परत कॉंग्रेस व परत भाजपा असा चौकोनी प्रवास केलेलेही आहेत. मनोहर पर्रीकरांचे राजकारण कॉंग्रेसीतल्या पैलवानांनाच भगवी संथा देण्यापुरते मर्यादित होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी आता जिंकून यायची क्षमता हा एकमेव निकष लावून आयात सुरू केली आहे. मनोहर पर्रीकरांनी समांतररित्या पक्षातून नवे चेहरे पुढे येतील आणि निवडणुकीत यश मिळवतील, याचीही खबरदारी घेतली होती. तसा यत्न आता होणे नाही. ही नेतृत्वाची मर्यादा आहे, असे आम्ही म्हणणार नाही. पण यातून संघटनशक्तीची, केडरची, नियोजनाची मिरास सांगणाऱ्यांचे पितळ उघडे पडते, हे कसे लपावे?

राजकीय पक्ष म्हणजे एक विचार असतो, असे आजवर सांगितले जायचे. जुनी परंपरा अशी की वैचारिक मतभेद होऊनही कुणी पक्ष सोडत नसत. राजकारण म्हणजे लाजलज्जा सोडून केलेले सत्ताकारण नव्हे असे मानण्याचे ते दिवस होते. आज पक्ष सोडण्यासाठी निवडणुकीतल्या तिकिटाची नुसती हमी पुरेशी असते.

Goa Election भारतीय जनता पक्षाच्या पतीतपावन मोहीमेचा श्रीगणेशा..!
काँग्रेस-फॉरवर्ड युती महाविश्वासघातकी

हे वैचारिक अधःपतन असेल तर याची जबाबदारी केवळ राजकीय पक्षांचीच का? एकेकाळी आजच्या भाजपाकडे संसदेत दोनच खासदार होते. कल्पना करा, त्यानी पक्ष नेऊन सत्ताधारी पक्षांत विसर्जित केला असता, तर? पण तसे झाले नाही, पक्षद्रोह त्यांच्या मनालाही शिवला नाही. याचे कारण त्याना वैयक्तिक स्वार्थापेक्षा वैचारिक धारणा महत्त्वाची वाटायची. आज त्यांचा वारसा सांगणारे विचारांना तिलांजली देत घाऊक आयातीचीं दुकाने उघडून बसले आहेत! यातून खरेच का पक्ष सुदृढ होईल? खुंटावर कावळे येऊन बसले म्हणून कुंपण मजबुत झाल्याचे कुणी ऐकलेय का? अर्थात हे प्रश्न फुरसतीने विचारात घ्यायचे असतात आणि निवडणुकीच्या धबडग्यांत फुरसत कुठली मिळायची? पण मतदारही आता बेरकी झालाय, तो सातत्याने प्रस्थापिताना पांच पांच वर्षांची फुरसत देत आला आहे आणि येती निवडणूकही त्याला अपवाद नसेल.

असो, भाजपाच्या या पतीतपावन मोहिमेला आम्ही सुयश चिंतितो. पक्षाने ही मोहीम जलदगतीने तडीस न्यावी आणि मग या एकत्रीकरणातून गोव्याला काय मिळणार आहे, हेही सांगावे. पक्षाचा जाहीरनामा मतदानाचा चार दिवस असताना प्रकाशित न करता मतदारांना विचार करण्यास अवधी मिळावा अशा रितीने आताच देणे इश्ट ठरेल. राज्यातील सर्वच बलाढ्य नेते एकत्र आले तर राज्याचे कल्याण कसे होईल, हे जाणण्याची मतदारानाही उत्सुकता आहेच!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com