रेजिनाल्डही गेले, कोण बाकी राहिले?

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आज ना उद्या आपली कॉंग्रेसनिष्ठा खुंटीला टांगतील, अशी अटकळ होतीच....
Goa Assembly Election: Aleixo Reginaldo

Goa Assembly Election: Aleixo Reginaldo

Dainik Gomantak

Goa Assembly Election: आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आज ना उद्या आपली कॉंग्रेसनिष्ठा खुंटीला टांगतील, अशी अटकळ होतीच. पण उमेदवारी जाहीर केल्यानंतरही त्यांनी पक्षप्रतारणा करणे अशोभनीय आहे. त्यांच्या प्रतारणेला कोणतेही तात्त्विक अधिष्ठान नसून ती भाजपाच्या पथ्यावर पडणारी आहे.

कुडतरीचे आमदार आणि कॉंग्रेसमधले निरंतर असंतुष्ट आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी होय- नाही करता करता अखेर कॉंग्रेसचा राजीनामा देऊन टाकला असून त्यांचीही पावले तृणमूल कॉंग्रेसच्या दिशेने निघाली आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीच त्यांना कॉंग्रेसमध्ये आपल्याला राजकीय भवितव्य राहिले नसल्याची उबळ आली होती व ते पक्ष सोडण्याच्या गर्भित धमक्या देऊ लागले होते. याच दरम्यान त्यांच्याशी आम आदमी पक्षासह काही अन्य संघटनांनी संधान साधले होते आणि वाटाघाटीना आरंभ झाला होता.

Goa Assembly Election: Aleixo Reginaldo

'काँग्रेसची भाकरी का करपली' खरी कुजबूज..!

रेजिनाल्ड यांना थोपवून धरताना कॉंग्रेसने (Congress) त्यांच्यासमोर कार्यकारी अध्यक्षपदाचे गाजर धरले होते. त्या आमिषामुळे रेजिनाल्ड यांनी आपली तलवार म्यान केल्याचे चित्रही निर्माण झाले होते. मात्र आम्ही याच स्तंभातून त्यांचा कॉंग्रेसमध्ये राहाण्याचा निर्णय अंतिम आहे.

अशा गैरसमजात कुणी राहू नये, अशा इशारा दिला होता. संताप, उद्वेग, कांगावा, त्रागा आणि अशाच अन्य भावनांची सोयीस्कर गल्लत करत रेजिनाल्ड (Congress MLA, Aleixo Reginald) यांनी गेल्या काही वर्षांत जे राजकारण केलेय त्यात सातत्यपूर्ण असे काही असेल तर तो आहे सातत्याचा अभाव; असे म्हणतानाच काँग्रेससोबत राहाण्याचा त्यांचा ताजा निर्णय आम्हाला तात्कालिक वाटतो असे निरीक्षण आम्ही नोंदवले होते. त्यावेळी काहींना ती रेजिनाल्ड यांच्या पक्षनिष्ठेची थट्टा वाटली होती. रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्याने आमचे भाकीत खरे ठरले आहे, पण त्याचा तीळमात्रही आनंद आम्हाला नाही. राजकारणातील शुचितेचा आग्रह धरणारे कुणीच रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्याचा आणि ऐन निवडणुकीच्या (Election) धामधुमीत स्वपक्षाला अडचणीत आणणारा निर्णय योग्य होता, असे म्हणणार नाही. इतिहासही राजकीय बदफैलीचे आणखीन एक उदाहरण अशीच या राजीनाम्याची संभावना करील. अर्थात रेजिनाल्ड याना राजीनाम्यापर्यंत नेणारी दृष्य आणि अदृष्य कारणे आहेत, हेदेखील मान्य करावेच लागेल.

आमदारपद ही गोव्यासारख्या (Goa) राज्यात भरीव परतावा देणारी गुंतवणूक झालेली आहे. आमदार होण्याआधी काही लाखांची मालमत्ता असलेले सत्ता मिळाली की पाच वर्षांत हजार कोटींची माया जमवतात, हे उघड गुपीत आहे. पाच वर्षांआधी सतरा आमदार असलेल्या कॉंग्रेसकडे कालपर्यंत केवळ तिघेच शिल्लक राहिले होते, यामागचे कारण याच अर्थकारणात लपले आहे. रेजिनाल्ड यांच्या विरोधाच्या राजकारणाने त्याना ती संधी दिली नाही. त्यांनी काही काळ मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) यांच्याशी संधान बांधूनही पाहिले. बिचारे सावंत यांच्या वाढदिवशी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही पोहोचले.

यातून कुडतरी मतदारसंघातली काही कामे मार्गी लागलीही असतील, पण नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत गुंतवणूक करण्याजोगी क्षमता काही त्या अनुनयाने येऊ शकत नव्हती. काँग्रेस आपल्याला काहीच हमी देत नाही याचा अंदाज आल्यावर रेजिनाल्ड यांनी आम आदमी पक्षाचा पर्याय चाचपून पाहिला, पण तेथेही त्यांच्या मागण्या केजरीवालाच्या पक्षाला अवास्तव वाटल्याने डाळ शिजली नाही. तृणमूलकडे ती पोकळी भरून काढण्यासाठी लागणारी संसाधने निश्चितपणे आहेत आणि त्यांनीच रेजिनाल्ड याना आकृष्ट केले आहे. आपल्या पक्षत्यागाला सैद्धांतिक मतभेदाचा मुलामा चिकटवायचे कितीही प्रयत्न रेजिनाल्ड करोत, त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय भविष्य सुकर करण्यासाठी लागणारा अर्थविचारच आहे. त्याचबरोबर अस्थैर्याचा शाप असलेल्या गोव्याच्या राजकारणात स्वतःला सत्तासन्मुख करण्याचा त्यांचा हा यत्न असल्याचेही लपत नाही. कॉंग्रेसने चार दिवसांआधी जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या यादीत रेजिनाल्ड यांचे नाव समाविष्ट होते, यावरून त्यांच्या राजीनाम्यामागे किती घायकुत होती, याचा अंदाज यावा.

कॉंग्रेसवर यासंदर्भांत काय टिप्पणी करायची? त्यांच्या निवडणूक प्रचार समितीचा अध्यक्ष (लुईझिन फालेरो) नियुक्तीनंतर आठवड्याभरातच पक्ष सोडतो तर कार्यकारी अध्यक्ष चक्क उमेदवारी नाकारून नव्यानेच गोव्यात आलेल्या व कोणतेही संघटनात्मक बळ नसलेल्या पक्षांत जातो, यावरून एक पक्ष म्हणून काँग्रेसला काय किंमत राहिली आहे, हे कळते. भरवशाची माणसे अशी पक्ष का सोडू लागली आहेत, याचे उत्तर कॉंग्रेसने आपल्या मतदाराना द्यायला हवे, कार्यकर्त्यांनी नेत्याना जाब विचारून ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायची सक्ती करायला हवी.

Goa Assembly Election: Aleixo Reginaldo

लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राज्यात ‘आप’ हाच उपाय; प्रसाद शहापूरकर

तृणमूलच्या शिडांत हवा भरण्यासाठी काँग्रेसमधले असंतुष्ट यापुढेही तिकडे जातील, पण तिकीट मिळालेला पक्षपदाधिकारी ते धाडस करतो, याला विशेष महत्त्व आहे. बिनीचे नेते जर अशा प्रकारे पक्षाला गाफिल ठेवून जाऊ लागले तर कॉंग्रेस केवळ गिरीश चोडणकर आणि दिगंबर कामत यांची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी म्हणून तर गोव्यात शिल्लक राहाणार नाही ना? तृणमूल राज्य स्तरावर काय फरक पाडू शकेल, हे अद्याप जरी स्पष्ट व्हायचे असले तरी कॉंग्रेसच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या सासष्टी तालुक्यातल्या अल्पसंख्याक मतपेढीचे विभाजन त्या पक्षाने घडवून आणलेले आहे हे मान्य करायलाच हवे. त्याचा फायदा भाजपाला होणे वा न होणे ही वेगळी बाब,पण तोटा निश्चितपणे काँग्रेसचा होणार आहे. तो टाळायचा असेल तर आता युतीच्या वाटाघाटींत तृणमूलला आवतण द्यावे लागेल आणि या वाटाघाटींत अर्थांतच तृणमूलचा वरचष्मा राहील. स्थानिक नेतृत्वाचे दारुण अपयश यातून स्पष्ट दिसते, पण ते पाहाण्यासाठी लागणारा तटस्थ चष्मा पक्षश्रेष्ठींकडे आहे काय?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com