Goa Assembly Election: भाजप म्हणतो 'आम्हीच मोठा पक्ष'

भाजपच्या मते राष्ट्रवादी, तृणमूल व आपने कॉंग्रेसच्या मतविभागणीला हातभार लावल्याने कॉंग्रेस स्वबळावर मोठा पक्ष बनणे शक्य नाही
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भाजपच्या सुकाणू समितीची अनधिकृत बैठक मंगळवारी होऊन अपेक्षेप्रमाणे मतदानाचा आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ नेते जरी 22 जागा मिळविण्याचा दावा करीत असले, तरी सुकाणू समिती ही अधिक वास्तववादी चित्र मांडते. ते स्वाभाविकही आहे. वस्तूनिष्ठरित्या आढावा घ्यायचा असतो. कॉंग्रेस नेते जरी भाजपला दहापेक्षा कमी जागा देत असले, तरी भाजपच्या मते ते 17 किंवा 18 जागा मिळवून गोव्यातील सर्वात मोठा पक्ष बनणार आहे. त्यांच्या मते सासष्टी तालुक्यात राष्ट्रवादी, तृणमूल व आपने कॉंग्रेसच्या मतविभागणीला हातभार लावल्याने कॉंग्रेस स्वबळावर मोठा पक्ष बनणे शक्य नाही.

भाजपच्या मते तृणमूल, आप व मगोप हे पक्ष प्रत्येकी दोन किंवा तीन जागा मिळवतील व कॉंग्रेस 13 पेक्षा जास्त जागा मिळवू शकणार नाही. हा दावा त्यांच्यादृष्टीने वास्तववादी असला, तरी शेवटी मतदारांनी काय केले हे समजायला दहा मार्चचा दिवस उजाडावा लागणार आहे. मतदारांनी मात्र सर्वांना चांगलेच संभ्रमात टाकले आहे. याबाबत कॉंग्रेस व भाजपचे एकमत आहे.

Goa Assembly Election 2022
राहुल म्हांबरे: गोव्यात ‘आप’ सरकार स्थापन करण्याचा चा दावा

भाजपमध्येही खुशी

भाजपा (BJP) जर सत्तेला निकट पोचला, तर त्यांना किमान तिघा अपक्षांची साथ सहज मिळेल, असा पक्षाच्या सुकाणू समितीचा अंदाज आहे. कुठ्ठाळी मतदारसंघाचे एसटी समाजातील अपक्ष उमेदवार ॲन्थोनी वाझ, सांगेतील सावित्री कवळेकर व काणकोणमधील इजिदोर फर्नांडिस हे तरी निश्चित भाजपला पाठिंबा देतील, असे त्यांना वाटते.

कुडतरीमध्ये अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड हे काही प्रमाणात तेथे मजल गाठू शकले असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. घोगळ येथील गृहनिर्माण वसाहतीतील प्रभाग रेजिनाल्ड यांना पाठिंबा देत आहेत. भाजपने तेथील आपला पाठीराखा वर्ग रेजिनाल्डच्या बाजूने उभा केला होता. रेजिनाल्ड यांना भाजपने मदतही केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रेजिनाल्ड जिंकून आले, तर त्यांचाही पाठिंबा भाजपला मिळेल, असे सुकाणू समितीला वाटते. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास तृणमूलने चर्चिल, वालंका व कविता कांदोळकर यांना जिंकून आणल्यास त्यांचाही पाठिंबा भाजपला मिळू शकतो. एकूण भाजपला चिंता करण्याचे कारण नाही, असाच एकूण मंगळवारच्या बैठकीतील सूर होता.

मुख्यमंत्र्यांचे काय?

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे काय होणार याची चिंता जरी साखळी वगळून इतरांना लागली असली, तरी भाजपाला मात्र याबाबत चिंता वाटत नाही. याचे कारण 2012 व 2017 मध्येही या मतदारसंघात 90 टक्के मतदान झाले होते. याहीवेळी ते तेवढेच झाले. म्हणजे कॉंग्रेसवाल्यांसाठी हर्ष होण्याचे कारण नाही. कॉंग्रेस पक्षाचे साखळीतील उमेदवार धर्मेश सगलानी यांचे तिकीट सर्वात शेवटी जाहीर झाले, तरीही त्यांनी ग्रामीण भागात चांगली मजल गाठली. शिवाय कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्यासाठी सर्व रसद पुरवली.

राहुल गांधी यांनीही तेथे जाऊन पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. तरीही कॉंग्रेसने तेथे उत्साह बाळगण्यासारखे मतदान त्यांना झाले आहे काय? हा खरा संशोधनाचा विषय आहे. काही वृत्तप्रतिनिधी जरी कॉंग्रेसचा वरचष्मा निर्माण झाल्याचा दावा करीत असले, तरी साखळीमध्ये मुख्यमंत्री फारच आरामदायी स्थितीत आहेत असे भाजपाचे नेते सांगतात. एवढे की, मंगळवारी आपल्या पत्नी सुलक्षणा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना घेऊन मुख्यमंत्री जेवणासाठी बाहेर गेले होते. मुख्यमंत्री समाधानी असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात.

Goa Assembly Election 2022
गोवा निवडणूक आयोगाचा ‘रात्रीस खेळ चाले’

सासष्टीही हातातून गेली?

सासष्टी तालुक्यात कॉंग्रेसला बहुसंख्य जागा प्राप्त होतील असा त्या पक्षाचा कयास होता, परंतु तेथे झालेली मतविभागणी कॉंग्रेसला अडचणीत आणणारी ठरू शकते. सासष्टीत भाजपचा प्रबळ उमेदवार अभावानेच होता. मडगाव व फातोर्डा हे दोन मतदारसंघ सोडले, तर इतर ठिकाणी भाजपला जिंकण्याची शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर तेथे ख्रिस्ती मतदारांची मते विभागून जातील अशी भीती बाळगली नाही असे भाजपला वाटते. त्यामुळे तृणमूल, आप व राष्ट्रवादी या पक्षांना ख्रिस्ती मते मिळाली असण्याची शक्यता आहे.

वेळ्ळी मतदारसंघात फिलिप नेरी रॉड्रीगीस या राष्ट्रवादी उमेदवाराने बरीच मजल गाठली असल्याचे भाजपला वाटते. तसे घडले तर कॉंग्रेसची सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता धूसर होईल असे भाजपच्या सुकाणू समितीचे मत बनले आहे. त्यामुळेच भाजपला सर्वात मोठा पक्ष बनून तिसऱ्या कारकिर्दीसाठी गोव्यात सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल, असे संघटनेला आता वाटू लागले आहे. एकूण काय तर प्रत्येक पक्ष या निवडणुकीत आपणच सर्वात मोठा पक्ष कसा बनेल याची गणिते मांडू लागला आहे. तृणमूललाही तसेच वाटते. यावरून ‘मनातील मांडे खाणे म्हणजे काय’ याचा प्रत्यय येऊ शकतो.

फोंड्यातील ‘चकमक’

परवा झालेल्या निवडणुकीच्या दिवशी नागझर - कुर्टी येथे फोंड्याचे मगोपचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी मारहाण केलेली तक्रार भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी फोंड्याच्या पोलिस स्टेशनवर केली, पण नंतर बोलताना डॉ. भाटीकर यांनी ही तक्रार फेटाळली आणि अप्रत्यक्षपणे यात फोंड्याचे माजी आमदार मुख्यमंत्री रवी नाईक यांचा हात असल्याचे सांगितले. त्यावेळी फोंड्यातील लोकांना चार वर्षांपूर्वी झालेल्या फोंडा नगरपालिकेची आठवण झाली. त्यावेळच्या निवडणुकीत रवी पुत्र रितेश हे पंडितवाड्यातून निवडणूक लढवीत होते व निवडणुकीच्या दिवशी तेथे आलेला रवी व मगोपचे फोंड्यातील नेते डॉ. भाटीकर यांच्यात तू तू मैं मैं झाली होती. त्यावेळीसुध्दा ते प्रकरण बरेच चर्चेत आले होते.

रवी तसेच अजातशत्रू राजकारणी म्हणून गणले जातात. एवढा प्रदीर्घ काळ राजकारणात असूनसुद्धा व अनेक निवडणूका लढवूनसुध्दा त्यांनी कधी कोणाशी ‘पंगा’ घेतल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्यकर्त्यांनासुध्दा ते शांत राहण्याचा सल्ला देत असतात. असे असूनसुद्धा त्यांची भाटीकरांशी ‘चकमक’ तीही दोन वेळा का व्हावी? फोंड्यात सध्या निवडणुकीत कोण जिंकणार कोण हरणार याच्यापेक्षा या गोष्टीची चर्चा जास्त सुरू आहे.

Goa Assembly Election 2022
बाबू आजगावकर: दिगंबर कामत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत

काँग्रेसजनांची प्रथमत:च एकी!

गोव्यातील काँग्रेसी नेत्यांत तसेच कार्यकर्त्यांत गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून नेहमीच मतभेद दिसून येत होते व त्याचाच परिणाम म्हणजे ते स्वत:चेच उमेदवार पाडण्यात योगदान देत होते, परंतु आमच्यामधील भांडणाचा लाभ उठवून शत्रुपक्ष सत्तेचा उपभोग घेत आहे.

त्यामुळे आम्हाला मात्र सत्तेची फळे चाखता येत नाहीत, अशी भावना झाल्याने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसजनांत बार्देशमध्ये तरी प्रथमत:च कमालीची एकी दिसून आली. तेथे जवळजवळ सर्वच मतदारसंघात काँग्रेसजन एकसंध राहिल्याने त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी स्थिती आहे. उमेदवारी न दिल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांत यंदाही थोडीफार बंडखोरी होतीच, परंतु ते बंडखोर फारसे प्रभावशाली नव्हते. अशा स्थितीत उमेदवार कुणीही असला तरी प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी एकदिलाने काम केले, हेही नसे थोडके!

भाजप कार्यकर्त्यांचा (अति)उत्साह!

मतदानाचा अवधी संपल्यानंतर म्हापशातील काही (अति)उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. एकंदर झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघात भाजपचा विजय होणार याची खात्री झाल्याने त्यांनी फटाके वाजवले की अन्य कोणत्या तरी कारणासाठी? हे मात्र समजू शकले नाही.

विद्यमान आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या विरोधात खुद्द काही भाजप कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांचा पराभव होणारच असल्याचे जाणवल्याने कदाचित त्यांनी ते फटाके वाजवले असावेत, असाही मतप्रवाह सध्या म्हापशातील सुजाण मतदारांत आहे. काही का असेना, म्हापशात मुख्य लढत ही भाजप व काँग्रेसमध्ये होती. त्यामुळे अशा पद्धतीने काँग्रेस समर्थकांच्या घराच्या परिसरात असे कृत्य करणे म्हणजे निवडणुकीचे वातावरण अधिक कलुषित करणे व आगीत तेल ओतण्यासारखे आहे, असा सूर यासंदर्भात सर्वसामान्य लोक व्यक्त करीत आहेत.

Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election: भाजप उमेदवाराला केली धक्काबुक्की

चिदंबरम यांचा दावा

निवडणुकीचे मतदान आटोपल्यावर त्याची टक्केवारी पाहून आपला विजय पक्का असल्याचे अनेकजण छातीठोकपणे सांगू लागले आहेत. काँग्रेसवालेही त्यात मागे नाहीत. त्यांनी यापूर्वी त्यांच्या उमेदवारांना निवडून आणल्यास फुटणार नाही अशी शपथ मंदिर, चर्च, मशिदीत नेऊन घ्यायला लावलीच, पण नंतर त्यांच्याकडून शपथपत्रही घेतले.

तरीही त्यांच्या मनात धाकधूक असावी कारण यापूर्वीचा अनुभव. म्हणूनच कदाचित चिदंबरम हे पक्षाला बहुमत मिळाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता सरकार स्थापनेचा दावा केला जाईल हे परत परत सांगत असावेत. कदाचित त्यांना 2017 प्रमाणे घडले तर ही भीती वाटत असावी, पण काँग्रेसने ती भीती बाळगू नये. कारण आता मध्ये कोलदांडा घालण्यासाठी लुईझिन नसणार ना!

उमेदवारांचे दुर्मिळ दर्शन

निवडणूक झाली, उमेदवारांचे दर्शन दुर्मिळ झाले, त्यांची कार्यालये बंद झाली. सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोपही कमी झाले, पण प्रत्येकजण मीच विजयी होणार अशा वल्गना मात्र करीत आहेत. अनेक दिग्गजांना फटका बसणार असूनही पराभव मान्य करीत नाहीत.

देवाण-घेवाणही बंदी झाली, पण काहींची देणी न फेडल्यामुळे ते उमेवारांच्या मागे लागले असून उमेदवारांनी मात्र आज, उद्या देतो, अशी टोलवाटोलवी सुरू केली आहे. त्यामुळे काहीजणांनी निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी पक्ष, उमेदवाराचा गट सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना प्रचारादरम्यान मोठी आमिषे देऊन प्रचार कार्यात झोकून देण्याचे आवाहन केले, त्यानुसार अनेकांनी पदरमोड केली. त्याची आता वसुली होत नाही. आता बोला!

Goa Assembly Election 2022
काणकोणमध्ये पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव

सावर्डेतील महाभारत

द्वापार युगात ज्यावेळी महाभारताचे युद्ध झाले, त्यावेळी अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण खंबीरपणे उभा होता. मात्र, यावेळी सावर्डे मतदारसंघात निवडणुकीचे महाभारत घडले त्यावेळी दीपक पाऊसकर यांच्या मागे खंबीरपणे अर्जुन उभा राहिला असे सांगितले जाते. या अर्जुनाच्याच पथबळावर दीपकरावांनी गणेशरावांचा डाव उधळून लावला असे सांगितले जाते. हे खरे की नाही हे कळण्यासाठी 10 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com